राजेंद्र भट

मागील आठवडय़ात आपण कीडनियंत्रणाचे काही सोपे उपाय जाणून घेतले. त्यांनी कीड नियंत्रणात राहिली नाही, तर करण्याचे थोडे अवघड उपाय पाहू या. हे उपाय नेहमी एकात्मिक असणे आवश्यक असते. इंग्रजीत याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणातात. यात क्रमाक्रमाने जास्त तीव्र कीडनियंत्रकांचा वापर अपेक्षित असतो. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, कीडनियंत्रणाच्या काही रचना असतात ज्यांना आपण अन्नसाखळी म्हणतो. ‘जीवो जीवस्य जीवनम्’च्या धर्तीवर कीटकांचे शत्रू किंवा मित्र असलेले कीटक येतातच.

लसूण मिरची अर्क

साल न काढलेला १०० ग्रॅम लसूण घ्यावा. तो ठेचून वाटीत ठेवावा. तो बुडेल एवढे रॉकेल त्यावर ओतावे. लसणाचा अर्क रॉकेलमध्ये उतरतो. त्यात उडून जाणारे तेल असते. पाव किलो तिखट मिरचीची चटणी करून ती एक लिटर पाण्यात १२ तास भिजत ठेवावी. नंतर गाळून घ्यावी. रॉकेलमधील लसूण ठेचा गाळून घ्यावा आणि त्यात कोणत्याही साबणाचा चुरा चमचाभर मिसळून घोटावा. हे मिश्रण मिरचीच्या अर्कात मिसळून बाटलीत भरून ठेवावे. यातील चमचाभर अर्क एक लिटर पाण्यातून झाडावर फवारावा. फवारताना गॉगल किंवा चष्मा लावावा. या अर्कामुळे सर्व अळ्यांचे नियंत्रण होते.

सध्या भेडसावणारी महत्त्वाची कीड पिठय़ा ढेकूण (मिलीबग) ही आहे. याचे नियंत्रण आवघड जाते. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यावर वेगाने पाणी फवारावे. त्यानंतर १० लिटर पाण्यात एक शॅम्पू पाऊच मिसळून फवारावे. १० ग्रॅम तंबाखू चुरा पाच लिटर पाण्यात रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी गाळून फवारणी करावी. यातील निकोटीन कीटकांना हानीकारक असते.

अगदी आंबट झालेले ताक झाडावर फवारावे. त्यामुळे झाडांवरील किडींचे आणि रोगांचे प्रमाण कमी होते. झाडे कणखर होतात. फवारणीच्या पाण्याला आंबटसर चव येईल, एवढेच ताक मिसळावे. एक कप कच्चे दूध १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यामुळे व्हायरस प्रतिकारक क्षमता निर्माण होते.

‘क’ अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या वनस्पतींची पाने, शेवगा आणि पपईचा पाला, गणपतीच्या पत्री, पान तोडल्यास पांढरा चीक येतो अशा वनस्पती यांची पाने एकत्र करून त्यात पाणी घालावे. त्यात अर्धा लिटर गोमूत्र आणि वाटीभर शेण घालावे. या मिश्रणाला तीव्र दरुगध येतो त्यामुळे लांब ठेवावे. महिनाभर तसेच ठेवून दिल्यानंतर ते वापरासाठी योग्य होते. त्यानंतर ते गाळून बाटलीत भरून ठेवावे. ४ मिलिलिटर अर्क प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावा. हा अर्क कीटकांना परावृत्त करतो आणि आधीपासून असलेल्या कीटकांना अपायकारक ठरतो. यात अन्नघटक असल्यामुळे ४ मिलिलिटरपेक्षा जास्त घातल्यास पाने जळू शकतात.