एआयएस १०० वाहनांमध्ये नवी सुरक्षाप्रणाली

बाबासाहेब यमगर

कार उत्पादक कंपन्यांकडून वाहनांच्या सुरक्षाप्रणालीवर भर  देत अनेक मोटारी सध्या बाजारात येत आहेत. यात एअरबॅगसह अनेक प्रणालींचा वापर होत आहे, यामुळे वाहनचालक किंवा प्रवाशांची सुरक्षा अधोरेखित होते. मात्र रस्ते अपघातात मरण पावलेल्यांमध्ये ५० टक्के लोक हे पादचारी असतात. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पादचारी सुरक्षेसाठी ‘एआयएस १००’ ही नवी सुरक्षा प्रणाली आणली आहे. या नव्या प्रणालीचा वापर १ ऑक्टोबर २०२० पासून मोटारींमध्ये बंधनकारक केला आहे. या सुरक्षाप्रणाली विषयी..

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी १.५ लाखांपेक्षा जास्त लोक रस्त्यांवरील अपघातांत आपला जीव गमावतात. त्यापैकी साधारण ४० ते ५० टक्के लोक हे पादचारी असतात. तसेच जगात दरवर्षी १२.५ लाखांपेक्षा जास्त लोक रस्त्यांवरील अपघातांत आपला जीव गमावतात. त्यापैकी साधारण २२ टक्के लोक हे पादचारी असतात आणि या २२ टक्के लोकांपैकी साधारण २० टक्के लोक भारतातील असतात. यात जखमी अथवा अपंगत्व येणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. यावरून पादचारी सुरक्षा महत्त्वाची असल्याने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही नवी सुरक्षाप्रणाली बंधनकारक केली आहे.

भारत सरकारने १ ऑक्टोबर २०२० पर्यंत निर्मिती करून नोंदणी होणाऱ्या व २ हजार ५०० किलोपेक्षा कमी वजनाच्या सर्व मोटारींना पादचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी नियमनाचे पालन करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी ‘एआयएससी’(ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज स्टॅन्डर्ड समिती) प्रकाशित केलेले व भारत सरकारने सूचित केलेले ‘एआयएस १००’ हे मानक निश्चित केले आहे. हे मानक जागतिक स्तरावरील जीटीआर ९ व यूरोपमधील ‘ईसीईआय १२७’ या मानकाशी समांतर आहे. त्यानुसार येणाऱ्या काळात भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व भारतीय व जागतिक स्तरावरील मोटारी पादचाऱ्यांच्या सुरक्षेचे पालन करणाऱ्या असतील.

या मोटारी पादचारी सुसंगत (Pedestrian Friendly) बनवताना इंजिन बॉनेट, इंजिन, बंपर, बॅटरी व इतर त्या संबंधित अंतर्गत रचना खूप महत्त्वाची असते. या सर्वाची रचना अशा प्रकारे ठेवली जाते की, अपघात झाल्यानंतर पादचाऱ्याला कमीत कमी इजा होईल. यामध्ये प्रामुख्याने फ्रंट कॅमेरा व इन्फ्रारेड किरणांचा वापर केला जातो. ज्यामुळे वाहनासमोर येणारा अडथळा हा पादचारी आहे किंवा नाही हे ओळखलं जातं. या प्रणालीला पेडेस्टरिन डिटेक्शन सिस्टम (PDS) असं म्हणतात. कारच्या पुढील भागात बसवलेले फ्रंट कॅमेरा, इन्फ्रारेड डिवाईसमुळे नॉर्मल आणि इमर्जन्सी ब्रेक्सचा वापर करून होणारा अपघात टाळला जातो. आणि जर त्यानंतर अपघात झालाच तर माणसाच्या पायांमुळे बंपरच्या मागच्या बाजूला बसवलेला एअर सेन्सर दाबला जातो. त्यामुळे त्या सेन्सरकडून निघालेला संदेश कारमधील कंप्युटरला दिला जातो व पदाचाऱ्याला वाचविण्या संदर्भातील कार्यप्रणाली सुरू केली जाते. ज्यामध्ये प्रामुख्याने बॉनेट हवेत उचलणे, बॉनेटची एअर बॅग फुगणे इत्यादी घडते. यामुळे अपघातात माणसाचे डोके हे केवळ बॉनेटवरच आपटले जाईल आणि त्याला कमीत कमी इजा होईल याची दक्षता घेतली गेली आहे. पायरोटेकनिक डिवाईसमधून आलेल्या संदेशामुळे हे डिवाईस कार्यान्वित होत बॉनेटला हवेत उचलते. या तंत्रज्ञानाला अ‍ॅक्टिव्ह बॉनेट असे म्हणतात. काही उच्च श्रेणीतील मोटारींमध्ये अ‍ॅक्टिव्ह बोनेट्स विथ एअर बॅगचीसुद्धा सुविधा दिलेली असते. एन्ट्री लेव्हल मोटारींत अ‍ॅक्टिव्ह बोनेट्स दिले जात नाहीत. परंतु एन्ट्री लेव्हल मोटारींमध्ये बॉनेट हे जास्त सॉफ्ट केले जातात तसेच इंजिन आणि बॉनेटमधील अंतर कमी ठेवले जाते. बंपर हे योग्य प्रमाणात दाबले जाऊन माणसाच्या पायांना आणि शरीराला कमी इजा पोहचवते. या सर्व तंत्रज्ञानांचा वापर करून मोटार ही  पादचाऱ्यांसाठी जास्त सुरक्षित केली जाते.

१३ वर्षांपर्यंतच्या मुलांचीही सुरक्षा         

तपासणी प्रयोगशाळेत कारची तपासणी करताना कार मशीनच्या समोर उभी केली जाते. डमी पादचारी हा ४० किमी प्रति तास या वेगाने कारच्या बम्परवर हवेतून फेकला जातो. डमीच्या वेगवेगळ्या भागात म्हणजेच डोके, कंबर आणि पाय यात इलेक्ट्रॉनिक्सवर चलणारे सेन्सर बसवलेले असतात. त्यांना हेड इम्पाकॉटर, अप्पर आणि लोअर लेग इम्पॅक्टर असे म्हणतात. त्यांचे वजन हे ३.५, ४.५, ९.५ व १३.५ किलो असते. या मध्ये मोठय़ा माणसांबरोबर १३ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांच्या सुरक्षेचा सुद्धा विचार केलेला आहे. या प्रणालीमुळे पादचाऱ्यांची सुरक्षा वाढणार असली, तरी जेव्हा ४० किमी प्रति तासपेक्षा जास्त वेगाने पदाचाऱ्याला उडवल्यास त्याच्या जिवाला धोका होऊ  शकतो.

– लेखक ‘एआरएआय’ (ऑटोमोईव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ) संस्थेत महाव्यवस्थापक आहेत.

पादचारी सुरक्षेसाठी हेही महत्त्वाचे

’ पादचाऱ्यांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयीचे मार्गदर्शन करून जबाबदारीची जाणीव करून देणे.

’ रस्त्यांवर स्वतंत्र पादचारी मार्ग तसेच इलेवेटेड क्रॉस वॉक वे असावेत.

’ रस्ता केवळ झेब्रा क्रॉसिंगवरून किंवा सिंगलच्या चौकातूनच ओलांडावा.

’ रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चालताना रिफ्लेक्टिव्ह कपडे (Conspicuity Markings) घालणे, जेणे करून चालकाला पादचारी असल्याचं आकलन होईल.

’ शहर, गाव तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांच्या जवळ वाहनांची वेग मर्यादा ३० किमी प्रति तास असावी.

’ कारमध्ये इनबिल्ट कॅमेरा, इन्फ्रारेड सिस्टम असावी त्यामुळे अपघात कमी होतील.