27 May 2020

News Flash

प्राचीन जलव्यवस्थापन सप्तेश्वर

अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.

(संग्रहित छायाचित्र)

आशुतोष बापट

कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की, शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काही तरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. संगमेश्वरजवळचं सप्तेश्वरही अशाच सुंदर ठिकाणांपैकी एक. अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.

मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगला डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर.

डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे. जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्यासमोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडातले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूंना खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा

वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहांत विभागून ते परत मोठय़ा कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे; पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेलमधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षांने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळं बांधकाम देखणंसुद्धा आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात. ३० फूट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढय़ाला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.

सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्य़ाद्रीची मुख्य रांग  आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे. इथून खरोखरच पाय निघत नाही.

कर्णराजाच्या पदरी असलेल्या कविराज शेषाने ‘संगमेश्वर माहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात तो संगमेश्वर परिसराचे माहात्म्य आणि तिथल्या ठिकाणांचे वर्णन करतो. त्यात त्याने सप्तेश्वराचा उल्लेख केलेला आहे. तसंच परिसरात कोणकोणती देवळे आहेत याचंही वर्णन ‘संगमेश्वर माहात्म्य’मध्ये शेषाने दिलेलं आहे. या ग्रंथात कविराज या स्थानाचे श्रेष्ठत्व वर्णन करतो. त्या ग्रंथात कर्णेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी नेमून दिलेल्या गावांची नावं येतात. त्यात धर्मपूर (आजचे धामापूर), शिवनी (शिवने), धमणी (धामणी), लवल (लोवले), तुर्वरी (तिवरे) अशी गावे दिसतात. सप्तेश्वरपासून वाहणारी अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर कसबा इथे कर्णेश्वराचे शिल्पसमृद्ध शिवालय उभे आहे. दगडी बांधणीचे हे शिवालय आणि त्यात असलेली शिल्पकला बघण्यासारखी आहे. मंदिराचे खांब आणि मुख्यत्वे मंदिराच्या पोर्चचे छत आणि त्याच्या द्वारशाखा फारच अप्रतिम आहेत. पोर्चवर अष्टदिक्पालांचे केलेले शिल्पांकन अफाट आहे. दरवाजावर शेषशायी विष्णू आणि त्याचे दशावतार बघत राहावेत असे आहेत. कर्णेश्वर मंदिर परिसरसुद्धा रमणीय आहे. परिसरात काही प्राचीन मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. कसबा गावात असलेले काशीविश्वेश्वर आणि काळभैरव मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेले प्रचंड मोठे पाण्याचे तळे आवर्जून पाहावे. संगमेश्वर माहात्म्यात हे क्षेत्र भक्ती आणि मुक्ती देणारे आहे, तसेच याच्याभोवती सर्वत्र शक्तीची स्थळे आहेत. याच्या अष्टदिशांना आठ तीर्थे आहेत असे उल्लेख येतात. सप्तेश्वर मंदिर पाहून खाली कसबा संगमेश्वरी यावे किंवा उलट करावे; पण ही दोन्ही ठिकाणे बघणे अनिवार्य आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 12:07 am

Web Title: ancient water management sapteshwar abn 97
Next Stories
1 स्टायरियाचे वाइन स्ट्रीट
2 टेस्टी टिफिन : पॅटीस
3 शहरशेती : भुईमूग
Just Now!
X