23 February 2019

News Flash

ताणमुक्तीची तान : संगीत आणि प्राणायाममुळे तणावमुक्ती

ताण-तणावाचे निवारण करण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे, चांगल्या गोष्टी पाहिल्या, वाचल्या पाहिजेत.

(संग्रहित छायाचित्र)

अनिता दाते-केळकर, अभिनेत्री

दिवस सुरू झाल्यावर ठरवल्याप्रमाणे काम करायला आवडते. आयुष्यात संगीत हा महत्त्वाचा घटक असून संगीतातून मनाला शांतता मिळते. प्राणायाम आरोग्यासाठीही चांगला आहे. त्यामुळे संगीत आणि प्राणायाम या दोन्हींमुळे मन शांत होते. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐक ण्याला माझे प्राधान्य असते. नेहमी आनंदी राहण्याचा माझा प्रयत्न असतो. अर्थात हे सगळे करत असताना मध्ये काही अडथळे येतात, कधी आपण नाराज होतो, भांडतो, वाद-विवाद होतात. हे सगळे करत असताना आपल्याला जे वाटते आणि जे पटते ते आपण स्पष्ट बोलून नंतर ते विसरून जावे. मला काही पटले नाही तर मी बोलून मोकळी होते, ती गोष्ट मनात ठेवत नाही. स्पष्ट बोलल्याने मनावरील ताण निघून जातो.

ताण-तणावाचे निवारण करण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे, चांगल्या गोष्टी पाहिल्या, वाचल्या पाहिजेत. आपल्या मित्र-मैत्रिणींजवळ आपले मन मोकळे करणेही गरजेचे आहे. सध्याच्या जीवनशैलीत प्रचंड स्पर्धा असून या स्पर्धेत फक्त पैशाला महत्त्व दिले जाते. पण पैसा मिळवतानाही योग्य आणि अयोग्य काय?  याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. स्पर्धेत वाहवत न जाता आपले शरीर, मन सांभाळून योग्य वाटेल तेवढेच आपण केले पाहिजे.

अभिनय क्षेत्रात असल्यामुळे चित्रीकरण करताना काहीही ठरलेले किंवा नक्की नसणार, असे मनाला बजावले आहे.  कारण हे कार्यालय नाही. इथे वेगवेगळ्या वेळांमध्ये आणि कमी- अधिक तास काम करावे लागते. अशा वेळी काय खावे, प्यावे याचा विचार करून आणि शरीराला त्रास होणार नाही, याची काळजी घेते. शरीराला हानिकारक पदार्थ टाळते. त्यामुळे वेळापत्रक बदलले गेले तरी त्याचा त्रास करून घेत नाही.

मुळात मी शांत स्वभावाची आहे. कोणत्याही गोष्टीचा पटकन धसका घेत नाही किंवा नाहक काळजी करत नाही. माझे कधी चुकले असेल तर चूक कबूल करून टाकते. यातूनही अनेक प्रश्न सुटतात. ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद आणि शांतता मिळते, त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. इतर करतात म्हणून त्यांचे अनुकरण करू नये. मन आणि शरीर चांगले ठेवले तर अनेक गोष्टी साध्य होऊ  शकतात. त्यामुळे स्वत:ला ओळखा आणि शरीराला, मनाला निरोगी ठेवा, आनंदी राहा.

(शब्दांकन – भक्ती परब)

First Published on September 6, 2018 4:51 am

Web Title: anita daate kelkar article about stress