अ‍ॅरोमा या शब्दाचा अर्थ आहे सुगंध. अ‍ॅरोमाथेरपी म्हणजे नैसर्गिक सुगंधच्या मदतीने केली जाणार उपचारपद्धती. यामध्ये विविध सुगंधी तेल, फुले यांचा वापर उपचारासाठी केला जातो. अ‍ॅरोमाथेरपी या उपचारपद्धतीमुळे त्वचा निरोगी राहते आणि विविध विकारांसाठी या उपचारपद्धतीचा वापर केला जातो, असे तज्ज्ञ सांगतात.

या उपचारपद्धतीत साधारण दोन प्रकारचे तेल वापरले जाते. एक म्हणजे बेस ऑइल आणि दुसरे म्हणजे प्रभावी तेल. या तेलाचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून त्याने शरीरावर उपचार केले जातात. बहुतेक तेल हे फुलांचे असते.

इजिप्तमध्ये अनेक वर्षांपासून टिकून राहिलेल्या ममीज अ‍ॅरोमा तेलामुळे टिकून राहिल्या, असा इतिहास सांगतो. पूर्वीच्या काळी राजघराण्यातील स्त्रिया आपले सौंदर्य टिकून राहण्यासाठी अ‍ॅरोमाथेरपीचा वापर करीत होत्या, असा उल्लेख इतिहासात आहे. ही उपचार पद्धती सौंदर्य आणि उपचार या दोन्हींसाठी वापरली जाते.

या उपचार पद्धतीत सुगंधी तेलाच्या मदतीने शरीराचा, डोक्याचा मसाज केला जातो. त्वचेचे सौंदर्य टिकवणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे, ताणतणाव दूर करणे, सांधेदुखीवर मात असे फायदे या उपचार पद्धतीचे आहेत. मात्र ही उपचार पद्धती तज्ज्ञांच्या मदतीने करणेच आवश्यक आहे.