मायदेशात कला सादर करणं आणि परदेशात जाऊन ती आविष्कृत करणं यात निश्चितच फरक आहे. म्हणजे ते आव्हानात्मक असतं. कला सादर करताना देशाचं नेतृत्व करीत असल्याची भावना त्यामागे असते. काही कलाकार आणि खेळाडूंनी परदेशात स्पर्धामध्ये ठसा उमटवणाऱ्या व भारतीय कला-संस्कृतीचे वाहक ठरलेल्या तरुण-तरुणींविषयी परदेशी जाताना कुटुंबाकडून आणि मित्रपरिवाराकडून बराच पाठिंबा असतो, मात्र मानसिक, आर्थिक आणि शारीरिक समस्यांवर मात करून पुढे जाणे सोपे नाही.

पहिली गोष्ट आर्थिक नियोजन करणे. परदेशात महाराष्ट्र मंडळ वा संस्थेकडून गायन, वादन आणि संगीत यांचे कार्यक्रम होतात. तेव्हा कलाकारांचा प्रवासाचा खर्च संबंधित संस्था करते. काही खेळाडू परदेशातील स्पर्धामध्ये सहभागी होणार असल्यास प्रायोजकत्व याद्वारे आर्थिक साह्य़ होते. परदेशातील हवामानाशी, संस्कृतीशी जुळवून घेणे हीसुद्धा आव्हानात्मक बाब असते. या सगळ्यांचा सामना करत कलाकार, खेळाडू, विद्यार्थी परदेशात कला सादर करतात आणि स्पर्धामध्ये भाग घेतात. परदेशात गेल्यावर तेथील नागरिकांमध्ये देशाविषयी अनेक गैरसमजुती असतात. भारतीय वक्तशीर नाहीत आणि कोठेही कचरा टाकतात. यांसारख्या गैरसमजुती दूर करण्याचे कामही याद्वारे होते. याचबरोबर भारतातील संस्कृती, रूढी, परंपरा आणि वेशभूषा या सर्व गोष्टींबद्दल तेथील लोकांना कुतूहल आणि आकर्षण दिसून येते. परंतु त्यानं  माहिती पुरेपूर आणि योग्यच असेल असं नाही. या वेळेस हे भारताचे प्रतिनिधी सांस्कृतिक वैशिष्टय़ांसह गोष्टी समजावून सांगतात. यामुळे कलेची देवाणघेवाण होते आणि माणसेसुद्धा जोडली जातात.

कलेबरोबरच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात. स्वत:च्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अत्यंत अभिमानाची बाब असते. तेथील स्पर्धामध्ये खेळताना प्रेक्षक जेव्हा भारताचे नाव घेतात ते प्रेरणादायी असते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळाल्यावर देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाते. याबाबत विश्वजीत सांगळेचे उदाहरण बोलके आहे. सानिया मिर्झा, महेश भूपती आणि लिअँडर पेस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत टेनिसपटू विश्वजीत सांगळे हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. कोल्हापूर आणि रशिया येथील टेनिस सामन्यांत विश्वजीत सहभागी झाला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाठीला दुखापत झाल्याने व्यायाम आणि आहार याच्या मदतीने पुन्हा टेनिस स्पर्धा खेळू लागला.

आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळाडूंच्या नावाच्या आधी भारताचे नाव आणि राष्ट्रध्वज लागणे विश्वजीतला जबाबदारीची आणि अभिमानाची भावना वाटते. परदेशात खेळाडूची शैली, वागण्याची पद्धत, या गोष्टींकडे प्रेक्षकांचे बारकाईने लक्ष असते. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळल्याने त्याला  प्रायोजक मिळण्यास मदत झाली. टेनिसमध्ये भारतीय खेळाडू मोठय़ा संख्येने नाही. टेनिस हा फक्त उच्चभ्रूंचा खेळ म्हणून ओळखला जातो. हा गैरसमज यानिमित्ताने दूर करायचा आहे, असे त्याने सांगितले.

याशिवाय भारताचे उगमस्थान असलेले खो-खो, कबड्डी, कुस्ती, मल्लखांब आणि योगासने हे क्रीडाप्रकार परदेशात सादर केले जात आहेत. त्यांचा प्रचार आणि प्रसार करताना काही मुले अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि कॅनडामधील मुलांना प्रशिक्षण देत आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत  मल्लखांबाचे प्रात्यक्षिक

शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा हा मल्लखांब आणि रोपमल्लखांब हा खेळ देशात लोकप्रिय आहे. राजेश बबन अमराळे हा वयाच्या अकराव्या वर्षांपासून मल्लखांबाचे शिक्षण घेत आहे. मल्लखांब खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०१०-११ ला शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. राजेश आणि त्याचे सहकारी इंडिया गॉट टॅलेंट या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. हा शो बघून राजेशकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर साहसी खेळ आयोजित करणाऱ्या कंपनीने विचारणा केली. आतापर्यंत राजेशने लेबनिन, मेक्सिको, हंगेरी आणि इस्तंबूल या देशांतील सर्कस आणि महोत्सवात मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले आहे.  परदेशात राजेश आणि त्याचे सहकारी तीस मिनिटांचा मल्लखांब सादर करतात. यामध्ये या क्रीडा प्रकाराची माहिती सांगितली जाते. ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटनाच्या समारंभात सादर करण्याची संधी मिळाली आहे. परदेशात या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेश यांनी सांगितले.   ||राजेश अमराळे

हिंदी नाटक जपानी भाषेतून सादर

अर्चना आपटे यांनी जपानमधील टोकियो येथील ओसाका आणि भारतीय वकिलातीच्या सभागृहात सर्वप्रथम हिंदी नाटकांचे जपानी भाषेतून सादरीकरण केले. जपानमध्ये २००५ मध्ये द इंडियन सोशल सोसायटी, इंडियन क्लब आणि ओकायामा गाकूघेईकान हायस्कूल येथे फिरोदिया या नाटकाच्या प्रकाराचे प्रयोग करण्यात आले. तसेच एशियन लायब्ररी आणि कम्युनिकेशन सेंटर येथे २००८ मध्ये विविध हिंदी विषयावरील नाटके सादर केली. अर्चना इयत्ता पाचवीपासून जपानी भाषा शिकत असल्याने त्याबद्दल आवड निर्माण झाली. देशात नोकरी आणि शिक्षणानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या जपानी लोकांच्या वार्षिक समारंभात त्यांनी हिंदी नाटकाचे सादरीकरण करताना पाहिले. जपानी लोक हिंदीमधून नाटकाचे सादरीकरण करत असताना अर्चना पाटील यांना हिंदी नाटक जपानी भाषेतून सादर करण्याची  कल्पना सुचली. पुणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जपानी भाषा आणि अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी आजवर ओमितोतात्सु, ओम शांती आणि गणपती ते दिवाळी हे कार्यक्रम सादर केले आहेत. याला जपानी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी विशेष कौतुक केले.  |अर्चना आपटे

ऑस्ट्रियात शास्त्रीय पदन्यास

कथक हा नृत्यप्रकार  जगभरात पोहोचवण्यासाठी अमीरा पाटणकर प्रयत्नशील आहेत. त्यांनी नादरूप या संस्थेतर्फे २००३ मध्ये कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘पिड पराई जाने रे’ हा कार्यक्रम ऑस्ट्रिया येथे सादर केला. हा कार्यक्रम कथक नृत्यांगना शमा भाटे यांनी दिग्दर्शित केला होता. १५ सदस्यांनी रंगमंचावर नृत्याच्या साथीने कस्तुरबांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन या संस्थेतर्फे या कार्यक्रमास आर्थिक सहकार्य देण्यात आले. पुढे त्याच संस्थेतर्फे कतार आणि दक्षिण कोरिया या देशांत कथ्थक नृत्य सादर करण्याची संधी अमीरा यांना मिळाली. ||अमीरा पाटणकर

चीनमधील अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभ्यास

रोहित शेळके हा नवी मुंबई येथील लोकमान्य टिळक या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. त्याच्यासह दहा विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वाहनाची निवड चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. चिखल, अस्थिर जमीन आणि वाळवंटात चालणारे हे वाहन असून त्याचे रेखांकन व बांधणी विद्यार्थ्यांनीच केले आहे. ताशी ४० ते ५० किलोमीटर वेग असणाऱ्या या वाहनात फायबर एक्सेल ड्रायव्हरचा समावेश करण्यात आला आहे. प्रथमच चीनमध्ये जाणार असल्याचा अनुभव अनोखा आहे.     ||रोहित शेळके संकलन : मानसी जोशी, शामल भंडारे