|| मकरंद जोशी

भारताचे हृदयस्थान असलेल्या मध्य प्रदेशच्या हृदयामध्ये भारतीय कला परंपरा आणि निसर्ग संपदायाचा मोठा खजिनाच सामावलेला आहे. आज जगभरातील पर्यटकांच्या नकाशावर मध्य प्रदेश हे राज्य ठळकपणे आले आहे; ते इथल्या अप्रतिम कलाकुसरीने नटलेल्या खजुराहोच्या मंदिर समूहामुळे. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात खजुराहोच्या मंदिरांचा समूह हजारो वर्षांचा कलेचा इतिहास सांभाळत उभा आहे. या भागात चंदेल राजवटीचा उदय झाला तो दहाव्या शतकात. आपले साम्राज्य प्रस्थापित करतानाच या राजांनी भव्य मंदिर समूहाची उभारणी सुरू केली. त्यामुळे सन ९०० ते ११३० या काळात टप्प्याटप्प्यात ही मंदिरे निर्माण करण्यात आली. अल बिरुनी, इब्नबतुता या परदेशी प्रवाशांच्या लेखनात या मंदिरांचा उल्लेख आढळतो. चंदेल साम्राज्य ऐन भरात असताना इथे एकूण ८५ मंदिरे उभारली होती, काळाच्या ओघात त्यातली फक्त २५ शिल्लक राहिली आहेत. चंदेल राजवटीचा अस्त झाल्यानंतर आक्रमकांनी अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली तसेच खजुराहो गावातील लोकांनी स्थलांतर केले आणि ही मंदिरे विस्मृतीत गेली. इंग्रजी राजवटीत सन १८३८ मध्ये कॅप्टन टी. एस.ब्रुट याला स्थानिकांच्या मदतीने या मंदिरांचा शोध लागला आणि हा कला खजिना जगासमोर आला.

या ठिकाणी हिंदू आणि जैन अशी दोन प्रकारची मंदिरे आहेत. चतुर्भुज मंदिराचा अपवाद सोडला तर बाकी सगळी मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. शिव, विष्णू आणि जैन र्तीथकरांना ही मंदिरे समर्पित आहेत. सगळीच मंदिरे अव्वल दर्जाच्या कोरीव कामाने नटलेली आहेत. अप्सरा आणि यक्ष, देवीदेवता याबरोबरच हत्ती, सिंह, वराह असे प्राणी सजावटीसाठी कोरले आहेत. खंडरिया महादेव मंदिर, लक्ष्मण मंदिर, विश्वनाथ मंदिर, वामन मंदिर, वराह मंडप, आदिनाथ मंदिर, पाश्र्वनाथ मंदिर ही मंदिरे आवर्जून पाहण्यासारखी आहेत. खजुराहोचे नाव जोडले गेले आहे ते शृंगारिक शिल्पांशी. मात्र या समूहातील फक्त १० टक्के शिल्पे शृंगारिक आहेत. काही अभ्यासकांच्या मते ‘तांत्रिक’ उपासना पंथामुळे ही शिल्पे इथे आली आहेत तर काही अभ्यासकांच्या मते चार पुरुषार्थातील ‘काम’चे महत्त्व सांगण्यासाठी ही शिल्पे इथे कोरली आहेत. खजुराहोला भेट दिल्यावर इथल्या संध्याकाळी होणारा साउंड अ‍ॅन्ड लाइट शो अवश्य पाहावा. इथल्या पश्चिम मंदिर समूहात सादर होणाऱ्या या शोमध्ये खजुराहोचा इतिहास, दंतकथा आणि कला परंपरा याची माहिती मिळते. तसेच दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘खजुराहो कला महोत्सव’ आयोजित केला जातो. खजुराहो येथे लहानसे विमानतळ आहे आणि दिल्ली, मुंबई, वाराणसी येथून हवाई मार्गाने खजुराहो गाठता येते.  मुंबई-अलाहाबाद मार्गावरील सतना हे रेल्वे स्थानक खजुराहोपासून ११७ कि.मी. वर आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, ग्वाल्हेर या शहरांशी खजुराहो महामार्गाने जोडलेले आहे.

‘पन्ना’तील जंगल सफारी

खजुराहोसोबत मध्य प्रदेशातील पन्ना राष्ट्रीय उद्यानाची  सफारी करता येते. खजुराहोहून पन्ना फक्त अर्ध्या  तासाच्या अंतरावर आहे. विंध्य पर्वताच्या रांगेत पसरलेल्या या जंगलाला १९८१ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला तर इथल्या पट्टेरी वाघांचे संवर्धन व्हावे म्हणून १९९४ साली पन्नाचा समावेश व्याघ्र प्रकल्पांमध्ये करण्यात आला. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी केन नदी या राष्ट्रीय उद्यानाची जीवनदायिनी आहे. याच नदीतील घडियल वाचवण्यासाठी पन्नाच्या अंतर्गत केन अभयारण्य तयार करण्यात आले आहे. मात्र फेब्रुवारी २००९ मध्ये पन्नाच्या जंगलातले पट्टेरी वाघ नष्ट झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या जंगलात बांधवगड आणि कान्हामधून एकेक मादी वाघ आणण्यात आले तर पेंचमधून नर वाघ आणण्यात आला. आता याच वाघांची प्रजा पन्नामध्ये वाढते आहे. पानगळी अरण्य आणि गवताळ कुरणे यामुळे पन्नाच्या जंगलात बिबटय़ा, रानकुत्रे, तरस, अस्वल, सांबर, चितळ, चिंकारा असे वन्यजीव पाहायला मिळतात. गिधाडांपासून ते पॅराडाइज फ्लायकॅचरपर्यंत सुमारे दोनशे प्रकारचे पक्षी इथे दिसतात. वन खात्याची आणि मध्य प्रदेश पर्यटन मंडळाची निवासस्थाने तसेच खासगी हॉटेल्स असल्याने पार्कजवळ उत्तम निवास व्यवस्था उपलब्ध आहे. केन सँक्च्युअरीमधील बोटिंग आणि पन्नामधील जिप्सी सफारी असा दोन्हीचा आनंद इथे घेता येतो. डिसेंबर ते मे हा काळ पन्ना भेटीसाठी योग्य मानला जातो.

makarandvj@gmail.com