आशुतोष बापट

ashutosh.treks@gmail.com

शनिवार

वाई परिसर मोहक आहे. कृष्णा नदीच्या काठावरची देवळे सुंदर आहेत. धुंडी विनायक, ढोल्या गणपती, काशीविश्वेश्वर ही मंदिरे पहावीत. काशीविश्वेश्वर मंदिरात असलेल्या दीपमाळा आणि नंदी निव्वळ सुंदर आहेत. तिथून मेणवलीला जावे. नाना फडणवीसांचा वाडा आणि नितांतसुंदर मेणवलेश्वर मंदिर, तिथली पोर्तुगीज घंटा अवश्य पहावी. तिथून यमक्या वामनाची समाधी असलेल्या भोगावला जावे. तसेच पुढे धोम गावी जावे. कृष्णेवर बांधलेले धरण सुंदर आहे. धोमेश्वराचे मंदिर देखणे आहे. कासवाच्या पाठीवर असलेला नंदी, लक्ष्मी-नृसिंहाचे देऊळ पाहावे.

रविवार

वाईजवळच १० किमी वर पांडवगड हा छोटेखानी सुंदर किल्ला आहे. आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो. किल्ला चढायला एक तास पुरतो. खाली आल्यावर दोन पर्याय आहेत. सरळ जाऊन मांढरदेवी घाटाने मांढरदेवीला जावे. दर्शन घेऊन भोरकडे उतरून पुण्याला यावे. नाहीतर कृष्णेच्या खोऱ्यात जावे. वाटेत जांभळी गाव लागते. इथून केंजळगड-रायरेश्वर खिंडीत यावे. केंजळगड पाहावा. मागे येऊन रायरेश्वरला जावे. सध्याच्या काळात तिथे भरपूर रानफुले फुललेली असतात. याच खिंडीतून वाईला जाता येते किंवा कोर्ले गावी उतरता येते. अन्यथा जांभळीवरून सरळ वासोळेला जावे. कमळगडाच्या पायथ्याला हे गाव आहे. किल्ला पाहून यायला तीन तास लागतात.