नवीन वर्षांची सुरुवात आनंदमय आणि काहीतरी हटके व्हावी यासाठी अनेकजण वेगवेगळे नियोजन करताना पाहायला मिळतात. नवीन वर्षांत पुस्तके वाचणे, गड-किल्ले फिरणे, व्यायाम करणे अशा वेगवेगळ्या संकल्पना राबवत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ‘लाँग ट्रिप’ या संकल्पनेचीदेखील यामध्ये भर पडलेली पाहायला मिळत आहे. दरवर्षी कोणत्या तरी नविन ठिकाणी फिरायला जायचे अशी अनेकांची संकल्पना असते. मित्रमैत्रिणींसोबत लाँग ट्रिपला जाण्याची वेगळीच मज्जा आहे. ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला. या सिनेमामध्ये मित्रमैत्रिणींचा एक समूह दाखवला आहे. यामध्ये हा समूह मनाली या ठिकाणी लाँग ट्रिपला जातो. त्या वेळी तेथे घडणाऱ्या विविध घटनांनी, त्या प्रवासाने अनेकांना आकर्षित केले. खरेतर या चित्रपटापासूनच समूहाने लाँग ट्रिपला जाण्याचे फॅड सुरू झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्या तरुणाई वर्षभर पैसे साठवून वर्षांच्या शेवटी डिसेंबर किंवा नव्या वर्षांत जानेवारी महिन्यात ‘लाँग ट्रिपला’ जाण्याचे नियोजन आखते. तरुणाईच्या या लाँग ट्रिपच्या आर्थिक नियोजनाविषयी जाणून घेऊयात..

भटकंती ही मनुष्य प्राण्याची आवडती गोष्ट. अनेकांना निरनिराळ्या ठिकाणी भटकायला आवडते. त्यातही जगभरात फिरण्यासाठी थंडीचे दिवस हे उत्तम दिवस मानले जातात. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या कालावधीत अनेक प्रवास संस्थांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना सवलतीदेखील दिल्या जातात. मात्र यामध्ये समूहाने ‘लाँग ट्रिप’ करणाऱ्या तरुणाईचे प्रमाण अधिक असते. भारतात दरवर्षी जम्मू-काश्मीर, केरळ, गोवा, मनाली, राजस्थान अशा विविध ठिकाणी समूहाने जाण्याचे नियोजन तरुणाईकडून आखले जाते. याचे नियोजन फिरायला जाण्याच्या वर्षभर अगोदरच होत असते. त्यासाठी अनेकजण कुठे जायचे, कसे जायचे हे ठरवतात. साधारणत या बैठका कॉलेजच्या कट्टय़ावर, ऑफिसच्या बाहेर किंवा एखाद्या सुट्टीला हॉटेल किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी होतात. त्या वेळी समूहातील विविध व्यक्ती ही अमुक एखाद्या ठिकाणी फिरायला का जावे याचे इतरांना विश्लेषण करत असतात. या बैठकीदरम्यान काहीजण तिथल्या ठिकाणावर करण्यात आलेले विशेष ब्लॉग पाहतात आणि अखेर बैठकीतून निघालेल्या निष्कर्षांतून लाँग ट्रिपचे ठिकाण ठरते. या ठिकाणासाठी पैसे नियोजनाकरिता साधारणत वर्षभराचा कालावधी असतो.

महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांना मिळालेल्या ‘पॉकेटमनी’च्या माध्यमातून हे पैसे साठवत असतात. तर काही तरुण त्यांच्या मासिक वेतनातील काही हिस्सा हा महिन्याला बाजूला काढत असतात. तर काहीजण ट्रिपसाठीचे पैसे जमा व्हावेत याकरिता दोन-तीन महिने अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात. ठाण्यात राहणाऱ्या हर्षदा निकमला लाँग ट्रिपला जाण्याची फार आवड आहे. गेल्या वर्षी राजस्थान येथे ट्रिपला जाण्याचे तिच्या मित्रमैत्रिणींनी ठरवले होते. त्या वेळेस एका ठिकाणी नोकरी करून राजस्थानला जाण्यासाठी रक्कम जमा केल्याचे हर्षदा निकम हिने सांगितले. यंदा ती तिच्या मित्रमैत्रीणींसह गोव्याला जाणार आहे.

कमाईमधून फिरस्ती

मी सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे मला सिनेमात जी काही ठिकाणे असतात ती विशेषकरून पाहायला आवडतात. गेल्या वर्षी कम्बलैंगी नाइट्स या सिनेमातील कम्बलैंगी गाव पाहण्यासाठी मी केरळला गेलो होतो. या सिनेमॅटोग्राफरच्या व्यवसायतून जी काही कमाई होते त्यामधून काही रक्कम मी, लाँग ट्रिपसाठी वापरत असतो. यंदाच्या वर्षी आसामला जाण्याचे नियोजन केले आहे.

– समीर गुडेकर, डोंबिवली

व्यवसायातूनही..

मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन छायाचित्रण करण्यास फार आवडते. यासाठी मी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो. आमच्या मित्रमैत्रिणींच्या चमूचे कोणत्याही ठिकाणी जाण्याचे महिनाभर अगोदर ठरते. मग अशा वेळी पैसे जमा करणे कठीण होते. मात्र काहीतरी करून आम्ही सर्व ट्रिपसाठीचे पैसे जमा करतो. मी आमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये असल्याने महिनाकाठी काही रक्कम बाजूला काढून लाँग ट्रिपचे नियोजन करतो. गेल्या वर्षी मी हिमाचल प्रदेशला गेलो होतो. तर, यंदाच्या वर्षी मित्रांसोबत गोव्याला जाण्याचे नियोजन केले आहे. यासाठी माझ्या व्यवसायातून अगोदरच काही रक्कम बाजूला काढून ठेवली आहे.

– आकाश गोडबोले, बदलापूर

पॉकेटमनीमधून बचत

दरवर्षी मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो. यासाठी मी सात ते आठ महिना पूर्वीपासूनच पैसे जमवायला सुरुवात करतो. मी नोकरीला नसल्यामुळे मला घरातून दर महिन्याला पॉकेटमनी मिळत असतो. या पॉकेटमनीमधील थोडी रक्कम मी लाँग ट्रिपसाठी बाजूला काढतो. गेल्या वर्षी मी शिमला-मनाली येथे गेलो होतो. तर, यंदाच्या वर्षी लेह- लडाखला जाण्याचे नियोजन केले आहे. या ट्रिपसाठीदेखील मी पैसे साठविण्यास सुरुवात केली आहे.

– रोहन ढवळे, कल्याण</strong>

पगारातील काही रक्कम लाँग ट्रिपसाठी

दरवर्षी नवीन वर्षांच्या सुरूवातीला मित्रमैत्रिणींसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यास आवडते. २०१९ ला दिल्ली येथे गेलो होतो. दर महिन्याचा पगारातून मी २ ते ३ हजार रुपये वेगळे काढतो. तसेच रोजच्या वापरातील माझा जो काही खर्च असतो, तो मी ट्रिपजवळ आल्यावर कमी करतो. हे साठविलेले पैसे मी फिरायला जाण्यासाठी वापरतो. यंदाच्या वर्षी मनाली येथे जाण्याचे मी नियोजन केले आहे. कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी गूगलवर त्या ठिकाणाच्या आजूबाजूला असलेले हॉटेल शोधत असतो. तसेच एक वेळापत्रक तयार करून त्या वेळापत्रकानुसार मी त्या ठिकाणी फिरण्याचे नियोजन करतो.- ओमकार शेलार, ठाणे</p>

तरुणांच्या समूहासाठी विशेष सवलती

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने लाँग ट्रिपसाठी अनुकूल असतात. थंडीच्या कालावधीत लाँग ट्रिपला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. यासाठी या कालावधीत अनेक प्रवासी कंपन्यांकडून ग्राहकांना काही सवलती दिल्या जातात. यामध्ये खासकरून तरुणांच्या समूहांना निरनिराळ्या प्रवासी पॅकेजमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. अनेक तरुणांना लाँग ट्रिपला जाऊन साहसी खेळ खेळण्यास आवडत असतात. या पॅकेजमध्ये दुचाकी चालवण्यासह, गिर्यारोहण, सायकल चालवणे, व्हॅली क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंगसारख्या गोष्टींचा समावेश असतो.

संकलन : पूर्वा साडविलकर