26 September 2020

News Flash

नवं काय? : बदलते दिवे

 सर्व प्रवासी गाडय़ांचे हेडलाईट हे सहसा प्लास्टिक मोल्डिंगद्वारे बनवलेले असतात.

मिलिंद गांगल

गाडीचे दिवे अर्थातच गाडीतील एक महत्त्वाचा भाग हेडलाईट्स. सूर्यास्तानंतर दिव्यांशिवाय गाडी चालवणे कठीण होऊन बसते. अगदी सुरुवातीच्या काळापासून नव्हे, तर स्वयंचलित वाहनाच्या पूर्वसुरी असलेल्या बग्गी, व्हिक्टोरिया प्रकारच्या घोडागाडीतसुद्धा तेलाचे दिवे होतेच.

सुरुवातीच्या काळात गाडय़ांचे दिवे हे वर्तुळाकार होते. गाडय़ांच्या फेंडर अथवा मडगार्डवर दिवे बसवले जायचे. हे दिवे बरेच वेळा गाडीच्या आकाराशी संबंधित नसायचे. पुढे गाडीच्या उत्क्रांतीच्या काळात गाडीचे दिवे गाडीच्या आकाराचा एक भाग बनले. त्याला बॉडिफिट अथवा बॉडीशेप हेडलॅम्प्स किंवा आर्किटेरर हेडलॅम्प्स म्हटले जाते.

रात्रीच्या वेळी हेडलाईटची लो बीम अन् हाय बीम अशी उजेडाचा फोकस किंवा दिशा बदलणारी यंत्रणा विकसित करण्यात आली. त्यासाठी दोन फिलॅमेंट असलेले बल्ब वापरले जाऊ  लागले.  १९४० सालापासून अमेरिकेत ७ इंच व्यासाचे गोल आकाराचे सीलबीम पद्धतीचे दिवे असणे बंधनकारक होते. सीलबीम पद्धतीच्या दिव्यात संपूर्ण हेडलॅम्पमध्ये गॅस भरलेला असतो आणि लाईटची फिलॅमेंट असते. १९५७ सालानंतर ५.७५ इंच व्यासाच्या दिव्यांना परवानगी दिली गेली. १९७४ नंतर आयताकृती दिव्यांना परवानगी दिली गेली. युरोपमध्ये मात्र सीलबीम किंवा ७ इंच व्यासाचे बंधन न पाळता त्यांनी बदलता येणारे बल्ब लावण्याची सोय असलेले आणि गाडीच्या डिझाइनला शोभून दिसणाऱ्या आकाराचे दिवे वापरले.  युरोपमध्ये १९६०-१९६२ साली हॅलोजन बल्बप्रणाली विकसित करण्यात आली. पहिला हॅलोजन बल्ब एच १ अस्तित्वात आला. पुढे अमेरिकन वाहन निर्मात्यांनी तत्कालीन अमेरिकी आस्थापनांना हॅलोजन बल्ब तसेच आर्किटेक्चर हेडलॅम्प्स किंवा एरोडायनॅमिक हेडलॅम्प्सना परवानगी देणे भाग पाडले. पुढे १९८३ सालापासून बहुतेक सर्व वाहन उत्पादक देशांनी बदलता येणारा बल्ब आणि वाहनाच्या डिझाइनला संयुक्तिक आकार असलेल्या  हेड लाईट्सना मान्यता दिली. भारतात हेडलाईट्स आणि त्यातले बदल प्रथमत: मारुतीच्या गाडय़ांमधून दिसायला लागले. चौकोनी हेडलाईट्स मारुती ८००, वॅनमध्ये तसेच जिप्सीपर्यंत दिसत होते. मारुती १००० पासून बॉडिशेप हेडलॅम्प यायला सुरुवात झाली.

आपल्या देशात गाडीच्या हेडलाईट्सला ५५ ते ६० वॅटची क्षमता असणारे बल्ब असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र काही वाहनचालक बुस्टर रिले किट लावून बल्ब वापरतात. प्रसंगी हे धोकादायक ठरू शकते.

सध्या वाहन उत्पादक अधिक सक्षम आणि प्रखर प्रकाश देणारे हेडलाईट्स वाहनांमध्ये बसवित आहेत. झेनॉन हेडलाईट्स, एचआयडी हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज इलेक्ट्रिकली चार्ज केलेला झेनॉन गॅस यात भरलेला असतो. या हेड लाईटचा प्रकाश निळसर पांढरा असतो.

गाडय़ांचा वाढत जाणारा वेग, वाढती प्रवासाची अंतरे हे लक्षात घेऊन वाहन उत्पादक अनेक प्रकारचे सुधारित हेडलाईट्स आणि हेडलाईट ब्लब आपल्या वाहनात वापरत आहेत. भारतात सध्या बऱ्याच गाडय़ांमध्ये ‘डीआरएल’डे टाईम रनिंग लाईटची एक पट्टी हेडलाईटमध्ये लावलेली असते. गाडीचे इंजिन चालू झाल्याबरोबर हे ‘डीआरएल’ आपोआप सुरू होतात.

सर्व प्रवासी गाडय़ांचे हेडलाईट हे सहसा प्लास्टिक मोल्डिंगद्वारे बनवलेले असतात. प्लास्टिक मोल्डिंगमुळे हव्या त्या आकारात हेडलाईट बनवणे शक्य आहे. मात्र अशा लाईटमध्ये उजेड पाडण्यासाठी रिफ्लेक्टेरची रचना मात्र गुंतागुंतीची असते. सध्या हे लाईट लेव्हलिंग मोटर, पार्किंग लॅम्प सर्किट तसेच टर्न इंडिकेटर हे हेड लॅम्प युनिटमध्येच एकत्रितरीत्या बसवलेले आढळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 3:17 am

Web Title: article about car headlights
Next Stories
1 व्हिंटेज वॉर : वैर नावीन्याचे
2 मंदिरे, किनाऱ्यांचे महाबलीपूरम
3 उडिसाचा छेना पोडा
Just Now!
X