गेल्या काही दिवसांमध्ये मोठय़ा शहरांमध्ये कार चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळेस या चोरी झालेल्या गाडय़ांचा मागोवा घेणे पोलिसांना देखील कठीण होऊन जाते. गाडी परत मिळाल्यावर देखील त्यातील काही भाग गायब असतात किंवा गाडी ओळखू येऊ नये यासाठी चोरांकडून त्यात मॉडिफिकेशन केले जाते. त्यामुळे आपल्या गाडीच्या सुरक्षेबाबत सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

गाडी चोरी होण्याचा किंवा गाडीचा एखादा भाग चोरी होण्याचा प्रसंग अनेकांवर ओढवतो. शहरातील काही ठरावीक ठिकाणे गाडी उभी करण्यासाठी धोक्याची असतात, तर काही वेळा आपण राहतो त्या परिसरातूनच आपली गाडी किंवा गाडीचे भाग चोरीला जातात.

कार चोरीच्या प्रकरणामध्ये केवळ नव्या गाडय़ा नाहीत, तर जुन्या गाडयांना देखील लक्ष्य केले जाते. त्यामुळे चोरांच्या नजरेत आपली गाडी येऊ  द्यायची नसेल तर आपल्या गाडीची योग्य काळजी घ्या. बऱ्याच वेळा चोर हे एका ठरावीक गाडीवर पाळत ठेवून असतात. एखादी गाडी चोरणे त्यांना सोपे वाटत असल्यास त्या वाहनास लक्ष्य केले जाते. तुमची गाडी जर एकाच ठिकाणी खूप दिवस उभी असेल, तिला रोज साफ केले जात नसेल, त्यावर धूळ साचली असेल किंवा गाडीतील बिघाड खूप दिवस दुरुस्त न करता तशीच उभी ठेवण्यात आली असेल तर तुमची गाडी चोरीला जाण्याचा धोका उद्भवू शकतो. गाडीला अशा स्थितीत ठेवल्यास गाडी मालक गाडीची काळजी घेत नाही हे लगेच कळून येते. अशा गाडय़ांना सहज लक्ष्य केले जाते. त्यामुळे तुमची गाडी सुस्थितीत आणि स्वच्छ ठेवा.

गाडी सांभाळण्याची काळजी घेण्याबरोबरच महत्त्वाचे असते ते म्हणजे गाडीत सुरक्षा प्रणाली बसवून घेणे. जर तुम्ही नवी गाडी घेत असाल तर त्यात इंजिन इमोबिलायझर, अँटी थेफ्ट सिक्युरिटी अलार्म आणि सेंट्रल लॉकिंग दिले जात आहे का ते पाहा. सध्या सर्वच गाडय़ांमध्ये सुरक्षेचे हे सर्व पर्याय उपलब्ध असतातच परंतु एकदा खात्री करून घ्या, ही वैशिष्टय़े तुमच्या गाडीला चोरी होण्यापासून वाचवू शकतात. इंजिन इमोबिलायझर ही एक चांगली सुरक्षा प्रणाली आहे. यात जोपर्यंत गाडीची ओरिजिनल की ही गाडीच्या ठरावीक अंतरात नसेल तोपर्यंत गाडीचे इंजिन सुरू होत नाही. गाडीला चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी बाजारात विविध सुरक्षा यंत्रणा उपलब्ध आहेत.

त्यातील एक म्हणजे जीपीएस ट्रेकिंग डिवाइस. यामुळे तुमची गाडी चोरी झाल्यास तुम्ही तिचा ठावठिकाणा शोधू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाइलवरून एक संदेश पाठवून गाडीचे इंजिन बंद करू शकता आणि गाडीचे दरवाजे लॉक करू शकता. गाडीच्या ठावठिकाण्यासह गाडीने किती प्रवास केला, तिचा वेग काय होता, गाडी किती वेळ थांबून होती हे सर्व तपशील देखील तुम्हाला जीपीएस ट्रेकिंग डिवाइसमुळे मिळू शकतात.

बाजारात अनेक प्रकारचे लॉक उपलब्ध आहेत. याचा वापर करून तुम्ही गाडीची चाके लॉक करू शकता, गाडीचे स्टिअरिंग लॉक करू शकता, गाडीचे स्टिअरिंग आणि पेडल याना एकत्रित लॉक करू शकता. गियर किंवा हॅण्डब्रेक लॉक करू शकता, गाडीच्या हूडला लॉक करू शकता. हे लॉक अत्यंत फायदेशीर असून चोर तुमच्या गाडीत शिरला तरीही या लॉकमुळे त्याला तुमची गाडी ‘पळवता’ येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही गाडीत सिक्युरिटी अलार्म बसवू शकता. सहसा बरेच कारमालक या सुरक्षा उपायाचा वापर करतात. अशा प्रकारचा अलार्म गाडीत बसवला असेल किंवा बसवून घ्यायचा असल्यास त्याला पॉवर सप्लायही कारच्या बॅटरीने न होता स्वतंत्र बॅटरीने होईल याची काळजी घ्या. अलार्म हा गाडीच्या बॅटरीला जोडलेला नसावा. त्याची स्वतंत्र बॅटरी असल्यास अधिक फायद्याचे ठरते. कारण सहसा चोर गाडीत शिरल्यावर अशा प्रकारचे अलार्म वाजू नये म्हणून गाडीची बॅटरी डिस्कनेक्ट करतात. जर गाडीचा अलार्म हा कारच्या बॅटरीवर  काम करणारा असेल तर हूड लॉक लावण्याचा पर्याय फायद्याचा आहे. अशा प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा गाडीत लावताना त्या चांगल्या कंपनीच्या किंवा ब्रॅण्डच्या असल्याची खात्री करा.

गाडी जुनी झाल्यावर गाडी मालक गाडीची जास्त काळजी घेत नाही अशा गाडय़ा चोरांकडून लक्ष्य केल्या जातात. त्याचप्रमाणे अशा जुन्या गाडय़ांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांचा अभाव असतो. त्यामुळे त्यात सुरक्षा यंत्रणा बसवून घेणे गरजेचे आहे. गाडीत जीपीएस डिवाइस लावताना अशा ठिकाणी लावा की ते गाडी चोरी झाल्यास चोराला पटकन शोधता येणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या गाडीमध्ये जीपीएस सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली असल्याचा इशारा देणारे स्टिकर तुम्ही गाडीच्या विण्डशिल्डवर लावू शकता. गाडीमध्ये काही बिघाड आल्यास काही लोक तो दुरुस्त न करता घरच्या परिसरात किंवा कार्यालयाच्या परिसरात कित्येक दिवस गाडी तशीच उभी करून ठेवतात. असे करणे टाळा.

गाडी पार्क करताना

* गाडी कधीही निर्मनुष्य वस्तीत पार्क करू नका.

*  गाडीवर लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी ती उभी करा.

*  तुम्ही गाडी उभी करत असलेल्या परिसरात सीसीटीव्ही असल्यास त्याच्या दृष्टीपथात येईल अशा ठिकाणीच गाडी उभी करा.

*  बाहेरगावी प्रवासाला जाताना बरेच वेळा अनोळखी ठिकाणी गाडी उभी करायची वेळ येऊ  शकते अशा वेळी गाडीचा फ्युज काढून घ्या.

*  पेड पार्किंग करताना पार्किंग तिकीट गाडीत ठेवू नका.

*  उन्हाळ्यात काही लोक गाडी आतून जास्त गरम होऊ  नये म्हणून खिडकीच्या काचा पूर्णपणे बंद करीत नाही असे करणे टाळा.

*  तुम्ही थोडय़ा वेळासाठी जरी गाडी सोडून जात असाल तर गाडी लॉक करायला विसरू नका.

*  गाडीत सेंट्रल लॉकिंग असो वा मॅन्युअल लॉकिंग गाडीचे खिडकी, दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत का याची खात्री करा.

*   गाडीत पाकीट, लॅपटॉप किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवून जाऊ नका.

*   गाडीचे मूळ कागदपत्र स्वत:कडे ठेवा आणि गाडीत त्यांच्या डुप्लिकेट प्रती ठेवा.