वैभव भाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या चारचाकी किंवा दुचाकीचे आयुष्य चांगले राहावे यासाठी तिला नियमितपणे सव्‍‌र्हिसिंगला देणे अत्यंत महत्त्वाचे आहे; परंतु गाडीची सव्‍‌र्हिसिंग झाल्यानंतरदेखील एकच समस्या पुन्हा उद्भवते. बऱ्याच वेळा गाडीच्या छोटय़ामोठय़ा कुरकुरीकडे आपण दुर्लक्ष करतो. अशामुळे वाहनात बिघाड होण्याची शक्यता बळावते. म्हणून गाडी सव्‍‌र्हिसिंगला देताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

गाडी सव्‍‌र्हिसिंगला देताना स्थानिक सव्‍‌र्हिस सेंटरच्या तुलनेत अधिकृत सव्‍‌र्हिस सेंटरकडे गाडी देण्याचा पर्याय फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला गाडी आणि तिच्या भागांबाबत व्यवस्थित माहिती असेल, तर तुम्ही स्थानिक सव्‍‌र्हिस सेन्टरमध्ये गाडी देऊ  शकता. नवीनच गाडी खरेदी केलेल्या गाडीमालकांच्या मनात सव्‍‌र्हिसिंगबाबत बऱ्याच शंका असतात. त्यातच सव्‍‌र्हिस सेंटरला गेल्यावर तिथे वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक शब्दांमुळे नवख्या व्यक्तीचा अधिकच गोंधळ उडतो. म्हणून केवळ जॉब शीट हातात घेऊन गाडीला तिथेच सोडून जाण्याआधी काही गोष्टींची व्यवस्थित चौकशी करा.

जर प्रथमच गाडी सव्‍‌र्हिसिंगला देत असाल तर कंपनीने नमूद केलेल्या कालावधीतच सव्‍‌र्हिसिंग करून घ्या. या वेळेस गाडीतील कोणतेही भाग बदलण्याची गरज नसते, त्याचप्रमाणे इंजिन ऑइल वगैरे बदलण्याचीदेखील आवश्यकता नसते. पहिल्या सव्‍‌र्हिसिंगमध्ये केवळ गाडीचे नट, टायर तपासले जातात. गाडीचे सस्पेन्शन व्यवस्थित  काम करीत आहेत का हे पाहिले जाते. त्यामुळे या सव्‍‌र्हिसिंगच्या वेळी जास्त काही कामे करून घेण्याची आवश्यकता नसते. इंजिनचे टय़ुनिंग पाहणे, स्टीअरिंग व्हील पाहणे ही कामे केली जातात. त्यामुळे कोणतेही बदल सव्‍‌र्हिस सेंटरकडून सांगण्यात आल्यास त्याबद्दल विचारणा करा. हे का? हवे किंवा हे का नको? याबाबत सखोल चौकशी करा. आपली गाडी जो मेकॅनिक दुरुस्त करणार आहे त्याला हे सर्व प्रश्न विचारा. तो व्यक्ती आपल्याला समाधानकारक उत्तर देतोय का ते पाहा. सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये येणाऱ्या इतर लोकांकडून सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये कशा प्रकारे काम केले जाते याची चौकशी करा. तेथे चांगला मेकॅनिक कोण आहे हे माहिती करून घ्या. एकाच मेकॅनिककडे गाडी दिल्यास त्याला तुमच्या गाडीची, त्यात येणाऱ्या समस्यांची माहिती होते. त्यामुळे पुढच्या वेळेस गाडी देताना तुम्हाला गाडीत काय काय समस्या येतात याची उजळणी करावी लागत नाही. म्हणून आपली गाडी प्रत्येक सव्‍‌र्हिसिंगच्या वेळेस नवीन मेकॅनिककडे देऊ  नका.

पहिल्या सव्‍‌र्हिसिंगला गियर ऑइल, कूलंट, स्पार्क प्लग, कार्बनेशन करण्याची किंवा कुठल्याही प्रकारची कोटिंगची आवश्यकता नसते. सव्‍‌र्हिस सेंटरकडून जर तुम्हाला अमुक करणे गरजेचे आहे ते करून घ्या, अमुक करणे फायद्याचे राहील अशा प्रकारच्या गोष्टींचा आग्रह होत असेल, तर सेंटरकडून सव्‍‌र्हिस मॅन्युअलची मागणी करा. प्रत्येक सव्‍‌र्हिस सेंटरकडे गाडीचे सव्‍‌र्हिस मॅन्युअल असते. सव्‍‌र्हिस मॅन्युअलमध्ये पहिल्या सव्‍‌र्हिसमध्ये, दुसऱ्या सव्‍‌र्हिसमध्ये काय करावे लागते याची माहिती कंपनीकडून दिली जाते. आपल्याला गाडीच्या सव्‍‌र्हिसिंगबाबत, नियमांबाबत माहिती आहे हे सव्‍‌र्हिस सेंटरला जाणवू द्या. अशाने तुमच्या गाडीकडे व्यवस्थित लक्ष दिले जाईल.

गाडीची सव्‍‌र्हिसिंग ही वारंवार करावी लागत नाही. ठरावीक कालावधीनंतर किंवा गाडीने ठरावीक अंतर पूर्ण केल्यानंतर करावी लागते. त्यामुळे सव्‍‌र्हिसिंगला टाळाटाळ करू नका. शक्य असल्यास शनिवारी किंवा रविवारी सव्‍‌र्हिसिंग करणे टाळा. या दोन दिवसांत सव्‍‌र्हिस सेंटरवर भरपूर गर्दी असते. हे शक्य नसल्यास एका सुट्टीच्या दिवशी  गाडीची सव्‍‌र्हिसिंग करा. लक्षात ठेवा, जेवढी तुम्ही गाडीची काळजी घ्याल, तेवढी गाडी तुमची काळजी घेईल.

या गोष्टींकडे लक्ष द्या

जॉब शीट

तुम्ही कोणत्याही सव्‍‌र्हिस सेंटरवर गेलात तर तुम्हाला गाडीच्या सव्‍‌र्हिसिंगसाठी जॉब शीट दिली जाते. ही शीट म्हणजे सव्‍‌र्हिस अ‍ॅडवायजर आणि मेकॅनिक यांच्यामधील संपर्काचे माध्यम. मेकॅनिक जेव्हा तुमच्या गाडीची तपासणी करेल तेव्हा तो या शीटवर गाडीत कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीची नोंद करणार. सव्‍‌र्हिसिंग पूर्ण झाल्यावर जॉब शीटवरील सर्व गोष्टी पूर्ण झाल्या आहेत का ते पाहा.

बिल

गाडीचे ऑइल किंवा इतर भाग बदलले असल्यास ते बिलात नमूद केले जाते. तेव्हा बिलात नमूद केलेले बदल झाले आहेत का हे तपासून पाहा. त्यांची किंमत सव्‍‌र्हिस अ‍ॅडवायजरने सांगितली तेवढीच आहे का ते पाहा. ऑइल टॉप अप केल्यास पैसे भरावे लागत नाही. त्यामुळे ऑइल बदल केल्याचा बिलात उल्लेख आहे का ते लक्षपूर्वक  पाहा. सव्‍‌र्हिस सेन्टरमध्ये बऱ्याच वेळेस शेकडो गाडय़ा एकत्र येत असल्यामुळे काही वेळा बिलात चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिल तपासताना सजग राहणे गरजेचे आहे.

ब्रेक ऑइल

गाडीने काही हजार किमी अंतर पूर्ण केल्यानंतर कूलंट बदलणे गरजेचे असते. तुमच्या गाडीच्या मॉडेलनुसार ते कधी बदलावे याची माहिती कंपनीकडून दिली जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला ब्रेक ऑइल बदलावे लागते. हे बदल केले आहेत का नाही याची खात्री तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे हे बदल करताना शक्य असल्यास तिथे हजर राहा.

पेट्रोल

गाडी सव्‍‌र्हिसिंगला देताना पेट्रोल आणि डिझेलची पातळी तपासून पाहा. गरज असल्यास जॉब शीटवर त्याची नोंद करून ठेवा. आपल्या पेट्रोल, डिझेलचा गैरवापर तर होत नाही ना हे पाहा. त्याचप्रमाणे गाडीचे ओडोमीटरवर किती अंतर झाले आहे ते पहा. इंजिन आणि इतर दुरुस्ती तपासण्यासाठी गाडी एक ते दोन किमी चालवली जाते. त्यापेक्षा अधिक अंतर असेल, तर त्याची चौकशी करा.

इंजिन ऑइल

गाडीचे आयुष्य वाढवण्यासाठी इंजिन ऑइल आणि फिल्टर बदलणे आवश्यक आहे. ट्रांसमिशन ऑइल बदलणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. ऑइल बदल करण्याआधी आणि नंतर त्याचा रंग तपासून पाहा. नवीन ऑइल हे स्वच्छ दिसेल आणि त्याचा रंग गडद नसेल.

vaibhavbhakare1689@gmail.com

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about car surviving
First published on: 15-09-2018 at 03:57 IST