पोट आणि कंबरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी चक्की चलनासन या व्यायामाचा उपयोग होतो. या व्यायामाने पोट आणि कंबरेसह हात व पायांच्या स्नायूंचाही व्यायाम होतो. वजन कमी करण्यासाठीही हा महत्त्वपूर्ण व्यायाम प्रकार आहे. ग्रामीण भागात पूर्वी जात्यावर धान्य दळले जायचे. जाते चालवताना जी हालचाल केली जायची, तीच हालचाल हा व्यायाम करताना होते, म्हणून त्यास चक्की चलनासन म्हटले जाते.

कसे कराल?

* पाय समोर पूर्णपणे पसरवून बसा. दोन्ही हात सरळ करा. हातांची बोटे एकमेकांत गुंफवा आणि हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा.

* दीर्घ श्वास घेत शरीराचा वरील भाग पुढे आणा आणि एक काल्पनिक वर्तुळ बनवत उजवीकडून डावीकडे गोल फिरणे सुरू करा.

* शरीराचा वरचा भाग आणि हातही उजवीकडून डावीकडे फिरवत राहा. शरीराचा वरील भाग फिरवताना मागे-पुढे होत राहील.

* पाय मात्र स्थिर ठेवा आणि संपूर्ण लक्ष हातावर केंद्रित करा. शरीर फिरवत असताना पोटावर ताण येईल.

* एका बाजूने १० ते २० वेळा फिरवल्यावर आता विरुद्ध बाजूने शरीर फिरवा. (डावीकडून उवजीकडे)

* पाय सरळ ठेवूनही हा व्यायाम करता येतो.