राजेंद्र श्रीकृष्ण भट

सिमला मिरची

सिमला मिरचीच्या रोपांची लागवड झाल्यानंतर तिला लवकर फुले व फळे येतात. फळे झाडावर ठेवल्यास, त्याची नीट वाढ होत नाही. त्यामुळे पहिली काही फळे बोटाच्या पेराएवढी झाल्यावर काढून टाकावीत. झाडाची योग्य वाढ झाल्यावर फळे ठेवण्यास सुरुवात करावी. काठीचा आधार दिल्यास फळे अधिक चांगली येतात.

रोपे लावल्यापासून साधारण ४०-४५ दिवसांत मिरची येऊ लागते. झाडे लहान असताना फुले आणि फळे लागतात. मोकळ्या वातावरणात दिवसाचे तापमान ३० ते ३५ अंशांच्या पुढे गेल्यास पराग जळतात. दोन-तीन महिन्यांत चार-पाच तोडे होतात.

नवलकोल

नवलकोलची पूर्ण वाढ होण्यासाठी ४५ ते ६० दिवस पुरेसे असतात. त्यानंतरही तो न काढल्यास जून होतो. त्याच्या पानांची भाजी छान होते. ताज्या कोवळ्या पानांची भाजी करावी आणि नंतर कंदाची भाजी करावी. यात पर्पल व्हिएन्ना आणि व्हाइट व्हिएन्ना अशा दोन प्रजाती आहेत.

वांगी

वांग्यांमध्ये विविध प्रकार आहेत. छोटी जांभळी वांगी, पांढरी वांगी, जांभळ्या रंगावर पांढऱ्या रेषा असणारी (ही भरली वांगी करण्यासाठी वापरतात.) भरीताची वांगी काळपट जांभळी आणि फिकट हिरवी अशा दोन रंगांत येतात. ज्याचे काप करतात ती वांगी लांबट असतात.

वांगी लावल्यापासून ७० ते ८० दिवसांत फळे काढणीला येतात. वांग्याचे झाड पुढे वर्षभर फळे देऊ शकते. एक झाड साधारण दोन वर्षे ठेवता येते. वर्षभरानंतर छाटणी करावी. विस्तार कमी करावा. त्यानंतर पुन्हा नव्या फांद्या येतात आणि त्यावर उत्पादन सुरू होते. भरीत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वांग्यांचे वजन जास्त असते. त्याच्या झाडाला आधार न दिल्यास फांदी मोडण्याची शक्यता असते.