17 July 2019

News Flash

शहरशेती : कुडा, रिठय़ाचे उपयोग

कुडा नावाचे छोटे झाड सर्वत्र आढळते. आपल्या पूर्वजांनी कडू चवीच्या वनस्पतींची नावे ‘क’ आद्याक्षरावरून ठेवली आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र श्रीकृष्ण भट

कुडा नावाचे छोटे झाड सर्वत्र आढळते. आपल्या पूर्वजांनी कडू चवीच्या वनस्पतींची नावे ‘क’ आद्याक्षरावरून ठेवली आहेत. उदा. कडुनिंब, कोरफड, कारले. कुडय़ाचे पांढरा कुडा आणि काळा कुडा असे दोन प्रकार आहेत. कुडा कृमीनाशक आहे. लहान मुलांना पोटदुखीसाठी कुडा उगाळून देतात. कुडय़ाच्या शेंगांना इंद्रजव म्हणतात. आयुर्वेदातील कुटजारिष्ट हे औषध कुडय़ापासून तयार करण्यात आले असून ते अनेक आजारांवरील उपचारांत वापरतात. कुडय़ाला पांढऱ्या सुवासिक फुलांचे घोस लगडतात. त्यांचा सुगंध वातावरणात दरवळतो. कुडय़ाच्या फुलांची भाजी करतात. ती डायरिया, मूळव्याध, रक्ती आव, त्वचाविकार यावर उपयुक्त आहे. सर्व प्रकारचे ताप, हृदयरोग, मधुमेहावर कुटजारिष्ट गुणकारी ठरते. कुडय़ाच्या पानांचा उपयोग खत म्हणूनही केला जातो.  रिठा या मध्यम आकाराच्या उपयुक्त वृक्षाला इंग्रजीत सोप नट ट्री म्हणतात. भांडी, कपडे धुण्याच्या साबणामुळे होणारे जलप्रदूषण ही मोठी पण दुर्लक्षित समस्या आहे. पूर्वी मौल्यवान वस्तू धुण्यासाठी रिठा वापरला जात असे. हा वृक्ष हिवाळ्यात फुलतो. उन्हाळ्यात त्याची फळे मिळतात. आत टपोरे, काळे बी असते. फळाचा बाहेरील भाग उपयुक्त असतो. घर किंवा सोसायटीभोवतीच्या मोकळ्या जागेत रिठय़ाला अवश्य जागा द्यावी. हे झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत कोणतीही निगा न राखता छान वाढते. साबण, शाम्पू, टूथपेस्ट तयार करण्यासाठी आणि औषधांसाठी याचा वापर करतात. मूळ आणि फळे औषधांत वापरतात. ताजे बी लावून सहज लागवड करता येते.

First Published on December 7, 2018 1:42 am

Web Title: article about city farming 2