राजेंद्र श्रीकृष्ण भट

ऋतुबदलाच्या संधीकाळात सर्दी, खोकला, कणकण असे विकार सामान्यपणे होतात. त्यावर उपाय म्हणून आपण विविध वनस्पतींची पाने, साल, बिया इत्यादी वापरून काढे करतो. या सर्व वनस्पती गॅलरीतील कुंडय़ांमध्ये लावता येतात.

गवती चहाची लागवड रोपापासून केली जाते. या रोपांना बाजूने नवे फुटावे येतात. काही वेळा गवती चहासारख्याच दिसणाऱ्या वनस्पतीला ओडोमॉससारखा गंध येतो. रोपवाटिकेतून खरेदी करताना पान चुरडून त्याचा वास घेऊन खात्री करून घ्यावी. गवती चहा ही भरभर वाढणारी, मुळे भरपूर पसरणारी, गवतवर्गीय वनस्पती आहे. तिच्या रोपांचा गठ्ठा फार लवकर तयार होतो. त्याचे जमिनीवरील सर्व भाग वापरता येतात. याचे खोड जाडसर असते. थाई पद्धतीच्या जेवणात त्याचा वापर करातात. उदा. थाई करी.  पानांना कुसे असतात. ती जिभेवर रुतून बसतात. त्यामुळे पदार्थात पानांऐवजी खोड वापरतात. त्या खोडाचे गुणधर्म आणि गंध पदार्थात येतो. पाने काढा करून वापरतात.  गवती चहाच्या रोपांना बुरशीजन्य आजार लवकर होतात. १-२ वर्षांत मातीत बुरशी वाढून सर्व रोपांचा समूह सुकत जातो. बुरशीच्या नियंत्रणासाठी योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक असते. पाण्यात अधुनमधून गोमूत्र किंवा हळद मिसळावी. ट्रायकोडर्मा नावाची मित्र बुरशी कृषी केंद्रात मिळते. ती फवारावी. झाडे चांगली वाढण्यासाठी निरोगी राहण्यासाठी ती फार उपयुक्त आहे. एक लिटर पाण्यात चमचाभर पावडर किंवा द्रव मिसळून ते कुंडीत ओतावे. शक्य असल्यास फवारणीसुद्धा करावी. ही बुरशी मातीतील सेंद्रिय घटक कुजवण्यास मदत करतेच, त्या घटकांतील अन्नद्रव्य झाडांच्या मुळांना शोषता येतील, अशा अवस्थेत आणते.