|| तेजस बर्वे, अभिनेता

मी हार्डकोर पुणेकर. शाळा टिळक रोडवरची गोळवलकर विद्यालय आणि कॉलेज स. प. महाविद्यालय. कॉलेजचा पहिला दिवस नव्‍‌र्हसनेस मधला गेला. मी अतिशय फिल्मी पण साधा मुलगा आहे. वेगवेगळ्या चित्रपटांत कॉलेजचं वातावरण पाहिलं होतं. त्यामुळे कॉलेजबद्दल एक वेगळंच चित्र डोक्यात होतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी कॉलेजच्या गेटमधून आत पाऊल टाकल्यावर सुद्धा मी जरा थरथरत होतो. कॉलेजचा पहिला संपूर्ण दिवस मी माझ्या निरीक्षण कौशल्यांवर भर देऊन कॉलेज ही संकल्पना नेमकी कशी साधी असते हे जाणून घेण्यात गेला. नंतर मी माझ्या मनातून कॉलेजबद्दलची उगाचची  नकारात्मकता झटकून टाकली.

शाळेत असताना मी तबला वाजवायचो. अभिनयाशी फारसा संबंध नव्हता. संबंध आला तो थेट कॉलेजमध्येच. आमच्या कॉलेजचं कलामंडळ हे सर्वश्रुत आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर अकरावीला असताना मी फिरोदियाच्या निमित्ताने कलामंडळात दाखल झालो आणि नंतर इथलाच होऊन गेलो. कॉलेजची तीन र्वष मी ९० टक्के कलामंडळाच्या स्टुडंट हॉलमध्येच काढली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पदवी शिक्षणासाठी मी बीकॉमची वाट निवडली. ती केवळ कलाउपासनेसाठी. सोपे विषय घेऊन अभ्यास सांभाळून मी तबला आणि अभिनयावर फोकस ठेवला. पहिल्या वर्षांला असताना मी बऱ्याच एकांकिका केल्या. सुमन करंडक, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया वगैरे वगैरे. दुसऱ्या वर्षी मी एक्स्टर्नल कॉलेज करण्याचा निर्णय घेतला. कारण माझ्या डोक्यात काही वेगळी गणितं पिंगा घालत होती. घरच्यांनी सांगितलं होतं की, केवळ पदवीने काहीही होत नाही. अनुभव महत्त्वाचा. म्हणून मी पदवी शिक्षणाचं दुसरं आणि तिसरं र्वष पूर्ण करत असतानाच जॉब करण्याचा निर्णय घेतला. पण माझा हा निर्णय फार काही वेळ टिकला नाही. पदवी शिक्षणाचं दुसरं र्वष संपत असतानाच मला झी युवावर मालिका चालून आली. पदवी शिक्षणाचं तिसर र्वष तर मी मालिका आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी सांभाळून पूर्ण केल्या.

कॉलेजमध्ये अकरावीला असताना मित्रांच्या नादात मी एका प्रायव्हेट क्लासच्या सीएच्या डेमो लेक्चरला गेलो होतो. मित्रांमुळेच मला सीए या पदवीची मोहिनी पडली होती. आपल्या नावाआधी सी.ए. असेल तर केवढं भारी, वगैरे तर्क लावून मी खुशीत गाजर खात होतो. पण त्या लेक्चरने माझे डोळे चांगलेच उघडले. कोणतीही मोठी पदवी मिळवायची असेल, तर त्यासाठी तासन्तास तपश्चर्येसारखा अभ्यास करायला हवा. जो मला जमणारा नव्हता. सहजासहजी काहीच गोष्टी शक्य नाहीत. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं आणि तेव्हापासून कानाला खडा लावला कोणत्याही परिस्थितीचा गहन अभ्यास करूनच त्यावर व्यक्त व्हायचं.

कॉलेजमध्ये असताना मी अफाट खाबूगिरी केली आहे. मी मुळात चोखंदळ खवय्या. कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या नागनाथ, उदय विहार, ग्राहक पेठ, खादाडी, मधुची गाडी या सगळ्या जागा मी पालथ्या घातल्या आहेत. मधु आमच्यासाठी खास होता. मधुकर शानभाग त्याचं नाव. टिपिकल कोकणी पण पुणेरी माणूस. या गाडीवर मिळणारी मटार उसळ म्हणजे आम्हा खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारा पदार्थ. मल्टिक्युझिनच्या जमान्यात मटार उसळ मिळणारी पुण्यातील हक्काची ठिकाणं कमी होत चालली आहेत. पण मधुची गाडी अजूनही त्याच तोऱ्यात उभी आहे. आलं, लसूण, ओल खोबरं, कोथिंबीर यांचं विशिष्ट पद्धतीने वाटण करून ते इथल्या मटार उसळीमध्ये वापरले जाते. त्यासोबत काही वेगळे मसाले घातल्यामुळे मटार उसळीला उत्तम चव येते. मटार उसळबरोबरच इथे इडली सांबार, उडीद वडा सांबार, काकडी खिचडी, कोबीची भजी, अननसाचा गोड शिरा चाखायला मिळतो. संकष्टी चतुर्थीला वरीलपैकी कोणताच खाद्यपदार्थ या गाडीवर अजूनही मिळत नाही. केवळ काकडी खिचडी आणि उपवासाची मिसळ एवढे दोनच पदार्थ मधूकडे मिळतात. जे खाण्यासाठी आम्ही कधीही रेडी असायचो.

कॉलेजच्या स्टुडंट हॉलमध्ये मी १८ तास असायचो. आमचा कट्टाच होता तो. अभ्यास, तालीम, भांडण, भविष्याचे प्लॅन्स सगळं काही स्टुडंट हॉलमध्येच व्हायचे. आजही मला जर वाटलं की मला एनर्जी हवी आहे तर मी जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा स्टुडंट हॉलच्या पायऱ्यांवर जाऊन बसतो. स्टुडंट हॉलची स्पंदने आजही हवीहवीशी वाटतात. या वास्तूने मला घडवलं, माझ्या आयुष्याला कलाटणी दिली.

शब्दांकन : मितेश जोशी