– डॉ. अरुणा टिळक arunatilak@gmail.com

बोलणे हा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे आपण सतत बोलत असलो तरी बोलणे हा व्यवसाय असलेल्या शिक्षकांचा, महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा आहार कसा असावा यावर बोलूया.

शाळा, महाविद्यालयांत शिक्षकांना सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात जावे लागते. मुलांना शिकवताना त्यांना नेहमी वरच्या पट्टीत बोलावे लागते. त्यामुळे घरी बोलतानाही कधी कधी त्यांचा आवाज मोठा राहतो. सतत बोलण्यामुळे त्यांच्या घशाला कोरड पडते. आवाज बसणे, कोरडा खोकला येणे असे आजार होऊ शकतात. त्यांना दिवसातील बराच वेळ उभे राहावे लागते. त्यामुळे पाय दुखणे, पोटऱ्यांत गोळे येणे हा त्रास बऱ्याच जणांना असतो.

काही वर्षांपर्यंत फळ्यावर खडूने लिहिणे, फळा पुसणे यांमुळे खडूची धूळ नाका-तोंडात जाऊन सतत अ‍ॅलर्जी, खोकला व श्वसनाचे त्रास होत असत. पण आता धूळविरहित खडूमुळे (no dust chalk) हा त्रास खूप कमी झाला आहे. अजून एक महत्त्वाचा त्रास म्हणजे सतत फळ्यावर मान उंच करून लिहावे लागते. तसेच पेपर तपासताना मान मोडून काम करावे लागते. त्यामुळे बहुतेकांना मानदुखी, पाठदुखी हे विकार होतात. आजच्या संगणकाच्या जगात त्याचा अतिवापर झाल्यास डोळ्यावरही अतिताण येणे, डोळे कोरडे होणे हे विकार उद्भवू शकतात.

काळजी कशी घ्यावी?

आयुर्वेदात दिनचर्येत अभ्यंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याने वर्ण, स्वर, कांती सुधारते. त्यामुळे अशा सर्वानी जेव्हा जमेल, तेव्हा तेलाने मालीश जरूर करावी. शक्य होईल तेव्हा गरम पाण्याचा जरूर वापर करावा. शिक्षकांना एक लिटर पाण्याच्या बाटलीत पाव ते अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर घालून ते पाणी थोडे थोडे प्यावे. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

गरम भातावर साजूक तूप टाकून घ्यावे. खडीसाखर, कंकोळ चघळावी. थंडगार ताक, लस्सी, लिंबू सरबत शक्यतो टाळावे. घशाला तोठरा बसेल अशी तुरट रसाची फळे जास्त खाऊ नयेत. जसे की विलायती चिंच, बोरे. नाकात दोन थेंब तुपाचे घालावेत. (नस्य)

शाळेत शिकवताना जसे वेळापत्रक असते, तसे आहाराचेपण नियोजन करावे. सकाळी शाळेसाठी जाताना त्यांना लवकर उठावे लागते. स्त्रिया घरातील सर्व आवरून सर्वाचे डबे भरून देतात, पण स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शाळेतील मधल्या सुटीत घरचे आरोग्यदायी पदार्थच खावेत. जंक फूडपेक्षा घरातील पोळी किंवा भाकरीचा रोल केला, त्याला तूप-साखर, कोरडी चटणी लावली तर तो उत्तम आहार होऊ शकतो.

अनेकदा भूक मारण्यासाठी अधिक वेळा चहा, कॉफीचे सेवन करतात. ते नक्कीच टाळले पाहिजे. कारण त्यामुळे अतिरिक्त साखर, कॅफीन, टॅनिन पोटात जाते.

ज्वारीच्या लाह्या, भाताच्या लाह्यांना तूप-जिऱ्याची फोडणी देऊन तो नाश्ता म्हणून खावा. जेवणामध्ये अतितेलकट भाज्या टाळाव्यात. कोहय़ाची भाजी ही मेंदूवर चांगले काम करते. त्याचा वापर करावा. हळदीचे दूध जरूर घ्यावे.