ऋषिकेश बामणे

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातील मुलाखत हार्दिक पंडय़ा आणि के. एल. राहुल यांना चांगलीच भोवली असली तरी, कॅमेऱ्यावर झळकण्याची क्रिकेटपटूंची हौस काही कमी होताना दिसत नाही. वेगवेगळय़ा जाहिराती, प्रायोजित कार्यक्रम किंवा मुलाखतींमधून झळकणाऱ्या क्रिकेटपटूंनी आता चक्क स्वत:चे ‘चॅट शो’ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

‘नमस्कार दर्शकों, मे युजवेंद्र चहल आप सभी का स्वागत करता हूँ, आपके मनपसंद शो मे जिसका नाम है ‘चहल-पहल’ ऐकायला हे एका वृत्तवाहिनीच्या निवेदकाचे बोल वाटतात ना? पण प्रत्यक्षात हा कार्यक्रम रंगतो तो स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीवरील ‘चहल टीव्ही’ येथे.

चहलव्यतिरिक्त इतर खेळांतील खेळाडूंमध्ये सुद्धा अशाच प्रकारे काही गमतीदार चॅट शोचे वेड मोठय़ा प्रमाणावर आहे. मात्र सध्या भारतीय क्रिकेटपटूंना चहलच्याच कार्यक्रमाची क्रेज सर्वाधिक आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक सामन्यानंतर चहल माईक हातात घेत काही खेळाडूंना मजेदार प्रश्न विचारतो. त्याशिवाय खुमासदार शैलीत निवेदनही करतो.

या ‘टीव्ही’वर आतापर्यंत विराट कोहली, कुलदीप यादव, रोहित शर्मा व खुद्द चहल यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंच्या मुलाखती झाल्या असून काही गमतीदार प्रसंगसुद्धा प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. भारताने न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यावर चहलने महेंद्रसिंह धोनीला संभाषणासाठी आमंत्रित केले. मात्र चहलला आपल्या दिशेने येताना पाहतानाच धोनीने ड्रेसिंग रूमच्या दिशेने पळ काढला. ट्विटरवर ही चित्रफीत वाऱ्याच्या वेगाने पसरली. ‘आपण शतक ठोकल्यानंतरच ‘चहल टीव्ही’वर येऊ’ असे सांगत धोनीने वेळ मारून नेली. मग रोहित शर्मा त्याच्या तावडीत सापडला. पण रोहितने चहलचीच फिरकी घेत या मुलाखतीला रंगत आणली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळणार का? असा प्रश्न चहलने विचारला असता, ‘आम्ही फलंदाजी करताना फक्त दहा जणांचाच विचार करतो’ असे उत्तर देत रोहितने चहलचीच विकेट काढली.

‘फॉलो द ब्लूज’ या आणखी एका क्रिकेटशीच संबंधित कार्यक्रमात विराट कोहलीसुद्दा रोहितशी मुलाखत घेताना आढळला होता.

याव्यतिरिक्त टेनिसपटू राफेल नदाललाही मागे अशा प्रकारे सामन्यानंतर चाहत्यांमध्ये जाऊन त्यांच्या अनुभव जाणून घेण्याचा मोह झाला. २०१७च्या विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररने तर ‘बॉल बॉय’ म्हणून काम करणाऱ्या त्याच्या चाहत्याशीच थेट संवाद साधला. यामुळे तो मुलगा तर भारावलाच शिवाय फेडररने त्याला चेंडू देत त्याचा आनंद आणखी द्विगुणित केला.

बरं हे झाले खेळाडूंविषयी. मात्र खेळाडूंवर आधारित काही खास कार्यक्रम यूटय़ूब आणि असंख्य क्रीडा वाहिन्यांवरदेखील लोकप्रिय आहेत. गौरव कपूरचा ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’, विक्रम साठेचा ‘वॉट द डक’यांसारखी अनेक शोजचा आनंद चाहते मोठय़ा प्रमाणावर लुटत आहेत. एकूणच सध्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे चाहत्यांचेदेखील मनोरंजन होत आहे.