आत्माराम परब

अमेरिका म्हटले की डोळ्यासमोर येतात त्या गगनचुंबी इमारती, दिव्यांचा झगमगाट. पण याच अमेरिकेतील वाळवंटी भागांना भेट दिल्यावर त्या रखरखाटातील निसर्गसौंदर्याने डोळे विस्फारतील. मैलोन् मैल पसरलेले ते शुष्क, रखरखीत डोंगर आणि त्यामधून जाणारा कधीही संपणारा नाही, असे वाटणारा काळा कुळकुळीत रस्ता. कॅलिफोर्निया, अ‍ॅरिझोना, उताह, लास व्हेगास या परिसरातील अ‍ॅरिझोना वेव्ह्ज, अँटिलोप, ब्राइस नॅशनल पार्क, झिऑन नॅशनल पार्क, डेथ व्हॅली, येसोमिटी नॅशनल पार्क आणि ग्रॅण्ड कॅन्यनला भेट दिल्यास एका वेगळ्याच जगाशी ओळख होते.

एका वाक्यात सांगायचे तर ब्राइस नॅशनल पार्क म्हणजे मातीच्या सुळक्यांची लांबवर पसरलेली अद्भुत अशी रचना. दाटीवाटीने उभ्या असलेल्या अनेक इमारतींच्या शहराचे जर लॅण्डस्केप छायाचित्र घेतले तर कसे वाटेल तसेच या मातीच्या पिवळसर, लालसर, गुलाबी अशा असंख्य सुळक्यांकडे पाहिल्यावर वाटते. पण  एक घनघोर शांतता दाटलेली असते. त्यामुळेच की काय पण तेथील एका जागेला ‘सायलेंट सिटी’ असेच नाव आहे. तर काही जागांना ‘अ‍ॅम्फी थिएटर’ म्हटले जाते. असे १४ ‘अ‍ॅम्फी थिएटर’ येथे आहेत. इतर ‘कॅन्यन’प्रमाणे या डोंगरात तयार झालेल्या रचना नदीच्या अथवा पुराच्या प्रवाहाने तयार झालेल्या नाहीत. बर्फवृष्टी आणि पावसामुळे धूप होऊन या रचना तयार झाल्या आहेत. वर्षांतील साधारण १०० दिवस सोडले तर एरव्ही हा भाग बर्फाच्छादित असतो. बर्फ वितळणे आणि गोठणे, त्यात पुन्हा कार्बनडाय ऑक्सॉइड असणारा पाऊस यातून डोंगरात या रचना घडल्या आहेत. त्यांना हूडू असे म्हटले जाते. वर्षांनुवर्षे रचना तयार होतात आणि नष्टदेखील होतात. या हूडूंना त्यांच्या आकारानुसार थोरचा हातोडा, व्हिक्टोरिया, क्वीन्स हेड अशी नावे दिलेली आहेत. अर्थात प्रत्येकाच्या नजरेतून आणखीनही नावं ठेवता येतीलच.

ब्राइस नॅशनल पार्कचा परिसर ३५ हजार चौरस किमी आहे. भटकण्यासाठी आखीव असे भरपूर ट्रेल/ट्रेक रूट तयार केलेले आहेत. धावती भेट द्यायची तर एका दिवसातच पाहता येईल, पण अगदी रममाण व्हायचे असेल तर दोन दिवस हाताशी असणे उत्तम. ही जागा आठ हजार फूट उंचीवर आहे. वस्ती नसल्यामुळे आकाशदर्शनासाठी उत्तम मानली जाते. वर्षभरात येथे आकाशदर्शनाचे अनेक कार्यक्रम होतात.

‘ब्राइस नॅशनल पार्क’वरून पुढे ‘अ‍ॅन्टिलोप नॅशनल पार्क’ पाहायलाच जावे. ही तशी अगदीच छोटी आहे. पण तिचे म्हणून स्वत:चे असे वेगळे सौंदर्य आहे. ‘लोअर’ आणि ‘अप्पर कॅन्यन’ असे त्याचे दोन भाग पर्यटकांच्या सोयीसाठी केले आहेत. दोन्ही भागांची भटकंती एका दिवसात आरामात होते. अचानक येणारे पूर आणि वारा यामुळे ‘अ‍ॅन्टिलोप’चे अनोखे आकार तयार झाले आहेत. डोंगराच्या पोटात पीळदार वळणे घेतलेले हे आकार पाहताना एका भल्या मोठय़ा लोखंडी स्क्रूची किंवा वाइनच्या बाटल्या उघडण्यासाठी असलेल्या क्वार्कची आठवण येते. ‘अप्पर अ‍ॅन्टिलोप’वरून खाली जाण्यासाठी शिडय़ा आहेत. ‘अप्पर अ‍ॅन्टिलोप’एवढंच ‘लोअर अ‍ॅन्टिलोप’ प्रेक्षणीय आहे. त्यातही जेव्हा सूर्य अगदी माथ्यावर येतो तेव्हा लोअर कॅन्यनच्या आतून भटकताना सूर्यप्रकाशाचे जे काही अवर्णीनय असे विभ्रम सुरू होतात ते कॅमेऱ्यात टिपण्याची धडपड प्रत्येक फोटोग्राफर करतोच. लोअर अ‍ॅन्टिलोपमध्ये काही ठिकाणी तर वर्षांतील ठरावीक काळातच ठरावीक प्रकाशरचना दिसते. एखाद्या निष्णात प्रकाशयोजनाकारासारखी निसर्गाची ही प्रकाशयोजना रखरखाटातदेखील सौंदर्याची एक अनोखी अनुभूती देते.

जवळच असणारे अ‍ॅरिझोना वेव्ह्ज हे ठिकाणदेखील आवर्जून भेट देण्यासारखे आहे. समुद्राच्या उसळत्या लाटांचे जणू मातीतील प्रतिरूप वाटावे असा निसर्गाचा भूगर्भीय आविष्कार म्हणता येईल.

अमेरिकेतल्या नेहमीच्या टिपिकल पर्यटन स्थळांऐवजी जरा वाट वाकडी करून या ठिकाणी गेलात तर निसर्गाची ही अद्भुत रूपे पाहायला मिळतील. हे आयुष्यात एकदा तरी अनुभवयालाच हवे!

कसे जाल ?

ल्ल सॅनफ्रॅन्सिस्को आणि लास व्हेगास हे जवळचे विमानतळ आहेत. केवळ एकाच पार्कला जाण्याऐवजी योसेमिटी नॅशनल पार्क, ब्राइस नॅशनल पार्क, अ‍ॅन्टिलोप कॅन्यन, ग्रॅण्ड कॅन्यन अशा ठिकाणी जाता येईल. लास व्हेगास मध्यवर्ती ठेवले तर आधी ब्राइस, झिऑन आणि अ‍ॅन्टिलोपला जाऊन पुन्हा लास व्हेगासला येता येते. लास व्हेगासमध्ये एक-दोन दिवस भटकून तेथील पर्यटनाचा आनंददेखील घेता येईल. त्यानंतर मग सॅनफ्रान्सिस्कोच्या दिशेने जाताना डेथ व्हॅली आणि योसेमिटी नॅशनल पार्कला जाता येते. साधारण सात ते आठ दिवसांत हे सर्व आरामात पाहून होते.

*  केव्हा जाल? : ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान