नमिता धुरी

फार पूर्वी ‘एक-दोन-तीन-चार…गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणा देत श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जन दोन्ही पार पडायचे. मधल्या काळात डीजेचे वेड पसरले. पण अलीकडच्या काळात हा ट्रेण्ड कमी-अधिक प्रमाणात बदलताना दिसतोय. डीजेची जागा ढोलपथकांनी घेतलीय. ही ढोलताशांची संस्कृती नक्की आली तरी कुठून ? तरुणांची मोठी फौज या ढोलताशा पथकात दिसते. अभ्यास, कार्यालय सांभाळून ही मंडळी ढोलताशाचा सराव करतात. गणेशोत्सव जवळ आल्यावर कशी तयारी सुरू होते याविषयी पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर येथील तरुणांशी साधलेला संवाद.

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई

या ढोलताशा पथकांची सुरुवात सर्वप्रथम पुण्यात झाली. त्यापूर्वी गावागावांत सणासुदीला ढोल, ताशा आणि इतरही काही वाद्ये वाजवली जात होती. पण शिस्तबद्ध आणि रुबाबदार ढोलपथकांमुळे पारंपरिक मिरवणुकीकडे तरुणाईचा ओढा वाढला. हेच वारे मग मुंबई, नाशिक, नागपूरसारख्या शहरांच्या दिशेनेही वाहू लागले आणि बघता बघता इथे एकामागून एक ढोलताशा पथके तयार होऊ  लागली. शिवजयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सव या सणांदिवशी ढोलपथकांना सर्वाधिक मागणी असते. मुख्य वादनाच्या काही महिने आधीपासूनच सरावाला सुरुवात होते. सराव बऱ्याचदा उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेत किंवा मिळेल त्या जागेत केला जातो.

ढोलताशाची डागडुजी

वर्षांतील पहिल्या वादनापूर्वी वाद्यांची डागडुजी केली जाते. अ‍ॅल्युमिनिअमच्या टाकीला दोन्ही बाजूंना चामडय़ाचे गोलाकार आवरण असते. याला पान असे म्हणतात. टाकीच्या कडय़ांना दोरीने घट्ट ताणून पान बांधले जातात. उजव्या बाजूच्या पानाला मध्ये शाई लावलेली असते. डाव्या बाजूचे पान हाताने वाजवले जाते.  शाई लावलेले पान ज्या काठीने वाजवले जाते. तिला टिपूर किंवा टिपरी असे म्हणतात. ठेका धरून ठेवणे हे ढोलाचे काम असले तरीही त्याला सोबत असते ती ताशाची. सरावाला सुरुवात करण्यापूर्वी वाद्यपूजन होते, प्रार्थना होते. ढोल घेऊन चालण्याचा सराव होतो. यात सहभागी होणारे तरुण आपले शिक्षण, नोकरीधंदा सगळे सांभाळून हे काम करत असतात. वयाची अट नसते. वादनाच्या दिवशीचा त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. ढोलाची झिंग नसानसांत भिनलेली असते. यात भर घालतो तो पारंपरिक पेहराव. गांधीटोपी किंवा फेटा, कपाळावर चंद्रकोर, पांढरा सदरा-लेंगा, पांढरे बूट असा साधारण पोशाख असतो. महिलांच्या सदऱ्यावर कोठी असते. यातही भगव्या रंगाला प्राधान्य असते. काही पथकांतील महिला नऊवारी साडय़ा नेसून ढोल वाजवतात. या सगळ्या तयारीसाठी वादनाच्या दोन तास आधीच सर्व वादकांना हजर राहावे लागते. वाद्य वजनदार असल्याने ते कंमरेला बांधले जाते. सलग तीन ते चार तास चालत वादन केले जाते. काही वेळा आठ-आठ तासही वादन चालते. अशा वेळी दर काही तासांनी वादक बदलतात. पण वादनात मुळीच फरक पडत नाही.  कारण उत्साह तोच असतो. सोबतीला भगवा ध्वज नाचवणारे आणि झांज वाजवणारेही असतात.

पैशाचे गणित

एवढे सगळे जुळवून आणायचे म्हणजे पैसा पाहिजे. हा पैसा येतो कुठून तर पथक सुरू करणारे सुरुवातीला स्वत:च्या खिशातून आर्थिक तजवीज करतात. समाजमाध्यमे आणि मौखिक प्रसिद्धीने वादनाच्या सुपाऱ्या मिळवल्या जातात. हळू हळू मानधनातून काही पैसे जमा होतात. जमा झालेल्या पैशांतून सर्वात आधी वाद्यांची निगा राखण्याला प्राधान्य असते. काही ठिकाणी वादकांना मानधन दिले जाते तर काही पथकांमध्ये वादक कोणत्याही मानधनाशिवाय वादन करत असतात. काही पथके मिळालेल्या मानधनातून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, दानधर्म अशा प्रकारची सामाजिक कार्येही करतात. गणपतींचे आगमन तर पार पडले आहे. पण म्हणून ढोलपथकांचे काम संपलेले नाही. विसर्जनालाही या पथकांना तेवढीच मागणी असते. सध्या या ढोलताशापथकांमध्ये विसर्जनासाठीचा सराव सुरू आहे. त्यामुळे ढोलपथकांना आता विश्रांती मिळेल ती थेट अनंत चतुर्दशीनंतरच.

स्पेन, अमेरिकेतही तडतड.

फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर इतर राज्यांमधल्या काही सणांनाही या ढोलपथकांना मोठी मागणी असते. महाशिवरात्रीला मध्यप्रदेशात आणि सुरतला जैन धर्मीयांच्या संन्यास यात्रेसाठी ढोलपथकांना निमंत्रित केले जाते. याशिवाय चेन्नई येथेही ढोलपथके जातात. मुंबईच्या स्वरगंधार ढोलताशापथकाने तर स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवातही वादन केले आहे. पुण्याच्या रुद्रगर्जना ढोलताशापथकाची एक शाखा शिकागोतही कार्यरत आहे.

हिले मुंबईकर पथक

मुंबईतले पहिले पथक म्हणून गिरगाव ध्वजपथकाचे नाव घेतले जाते. पुणे ढोलताशा पथकाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गाडगीळ यांनी १६ मुलांना एकत्र आणून २००५ साली या पथकाची सुरुवात केली. आज ही संख्या ७००वर गेली आहे, ज्यात डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांचाही समावेश आहे. त्यांचा सराव गणोशोत्सवाच्या साधारण तीन महिने आधीपासून सुट्टीच्या दिवशी मुंबईतल्या काही शाळांच्या पटांगणात चालतो.

आमचे पथक विदर्भातील सर्वात मोठे पथक म्हणून ओळखले जाते. या पथकाच्या एकूण ६ शाखा आहेत. एकूण वादकसंख्या ३२० आहे. आम्ही आसाम, बिहार, झारखंड अशा विविध राज्यांमध्ये जाऊन वादन करतो.

–  किशोर दिकोंडवार, शिवप्रताप पथक, नागपूर

महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन तरुण पिढीला व्हावे हीच संकल्पना ढोलताशापथक स्थापन करण्यामागे असते. येत्या काळात अधिकाधिक तरुणांनी शिवकालीन वाद्यांकडे वळावे आणि मराठी मातीची परंपरा मराठी मनामनांत रुजावी हीच इच्छा आहे.

– केतन पालवे, रामनगरीपथक, नाशिक

आमच्या पथकात सध्या साधारण २५० वादकसंख्या आहे. यामध्ये मुलींची संख्याही मोठय़ा प्रमाणावर आहे. आधुनिक जगात महाराष्ट्राची संस्कृती कायम राहावी हाच यामागचा उद्देश आहे.

– तुषार मानकर, रुद्रगर्जना ढोलताशापथक, पुणे

ढोल हे मुळात रणवाद्य आहे. त्यानंतर ते धार्मिक कारणांसाठी वापरले जाऊ  लागले. या ढोलपथकांचा पोषाख, त्यांचे वादनाचे फोटो हे सगळे पाहून तरुण मुले या पथकांकडे आकर्षित होतात. गेल्या काही वर्षांत संपूर्ण महिला ढोलपथकेही तयार होऊ  लागली आहेत.

– निखिल काळवींट, गिरगाव ध्वजपथक