रवीश निमकर 

पॅरिस ही केवळ फ्रान्सचीच नव्हे, तर ‘फूड’,‘फॅशन’ आणि ‘फ्रेग्रन्स’चीही राजधानी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथं वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. हिवाळ्यात त्या तुलनेत ही संख्या घटते, मात्र नाताळसाठी सजलेलं पॅरिस पाहायचं असेल, तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच जायला हवं. एरवीही, आपला इतिहास मनापासून जपणारं हे शहर सर्वकाळ भुरळ घालतं.

हिवाळ्यात पॅरिसला गेलात, तर विमानतळाबाहेर पडताच मेपलच्या पानांचा पाचोळा पानगळीची जाणीव करून देतो. या काळात ख्रिसमचा उत्साह पाहण्यासारखा असतो. प्रत्येक गल्लीबोळ सजलेले असतात. पानगळीतही छोटय़ामोठय़ा दुकानदारांच्या सर्जनशीलतेला पालवी फुटलेली असते.

इथं गगनचुंबी टॉवर्स नाहीत. प्रत्येक इमारत सौंदर्यशास्त्राचे नियम जपते. दगडी कौलारू घरांनी हे शहर सजलं आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलं तरी या शहराने स्वत:ची ऐतिहासिक ओळख मात्र अजूनही जपली आहे. त्यामुळेच पॅरिस इतरांपेक्षा वेगळं ठरतं. इमारती दीडशे ते तीनशे र्वष जुन्या असल्या, तरी जुनाट मात्र वाटत नाहीत. इथल्या नियमांप्रमाणे घरमालकांना दर १० वर्षांनी आपली घरं रंगवावीच लागतात आणि त्यासाठी आधीचेच रंग वापरावे लागतात. इतरांपेक्षा वेगळं काही करायचं, म्हणून शहराच्या पारंपरिक सौंदर्याला कुणीही फाटा देत नाही. प्रशासनाकडून यासाठी मुबलक निधीही उपलब्ध होतो. सीन नदीमुळे शहराचे लेफ्ट बँक आणि राइट बँक असे भाग पडले आहेत. नदीवर ३६ पूल आहेत, त्यातला सर्वात ‘नवा’ पूल १६०६मध्ये बांधण्यात आला.

दगडी बांधकामांच्या या सदाबहार नगरीमध्ये वेगळी ठरणारी ऐतिहासिक वास्तू म्हणजे ‘आयफेल टॉवर’! आज पॅरिसची ओळख ठरलेला हा पोलादी सांगाडा आधी पॅरिसमधल्या लोकांना आवडला नव्हता. पण आज तो जगभरातील पर्यटकांचं आकर्षणस्थळ आहे.

इथे कधीही पाऊस पडतो, पण या सबबीखाली फॅशनमध्ये अजिबात तडजोड दिसत नाही. पावसाळी आणि हिवाळी फॅशनची सांगड घातलेले लोक रस्त्यांवर फिरताना पाहणं हे पॅरिसचं स्थापत्य पाहण्याइतकंच आल्हाददायक असतं. स्टायलिश जॅकेट्स, रंगीबेरंगी आणि खुलून दिसणारे स्कार्फ, शूज आणि तितक्याच आकर्षक छत्र्या. इथले वयोवृद्धही शहराप्रमाणेच आपलं तारुण्य जपत इकडून तिकडे धावत असतात. मरगळ नावालाही दिसत नाही.

‘अ‍ॅव्हेन्यू दी शॉन्स एलिझे’ हा शहराचा आयफेल टॉवरइतकाच प्रसिद्ध आकर्षणबिंदू. जगभरात नावाजलेल्या ब्रॅण्ड्सची दुकानं या रस्त्यावर आहेत. शहराचा इतिहास चाळताना वारंवार उल्लेख होतो, तो लुई चौदावा, लुई सोळावा आणि नेपोलियनचा. या राज्यकर्त्यांचा पॅरिसच्या जडणघडणीवर विलक्षण प्रभाव आहे. शॉन्स एलिझेजवळच ‘आर्क दी त्रिऑम्फ’ ही नेपोलियनने युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेली कमान आहे. ती ‘इंडिया गेट’ची आठवण करून देते. पॅरिसमधील लुव्र म्युझियम हे ‘डॅन ब्राऊन’च्या ‘दा विन्ची कोड’ पुस्तकाने आणखी प्रसिद्ध केलं आहे. हा एके काळी राजवाडा होता. तिथे जगप्रसिद्ध शिल्पं, चित्रं पाहायला मिळतात. मोनालिसा भेटते. हे म्युझियम व्यवस्थित पाहायचं ठरवलं, तर सुमारे तीन महिने लागतात, एवढं भव्य आहे. व्हिक्टर ‘नोत्रे दम’ चर्च ही देखील एक नेत्रदीपक रचना! फ्रान्समध्ये इंग्रजी बोलायला फार कुणी तयार नसतं. पण इथल्या सोव्हिनेअर शॉप्सप्रमाणेच पर्यटकांना भावतं ते शेक्सपिअर शॉप. इंग्रजी पुस्तकांच्या या ऐतिहासिक दुकानाला अनेक जगप्रसिद्ध लेखकांनी भेट दिली आहे. इथे पुस्तक विकत घेऊन त्यावर ‘द शेक्सपिअर शॉप’चा शिक्का मारून घ्या.

नदीचा काठ, इतिहासाच्या खुणा, साहित्यातील संदर्भ या सर्वाचं एक मिश्रण हे शहर आपल्या अंगाखांद्यांवर मिरवत असतं. इथे रोमान्स आहे, फॅशन आहे, स्टाइल आहे. भारावून टाकणारं स्थापत्य आहे. पण त्याहून जास्त आकर्षक आहेत, इथली माणसं. शहराची संस्कृती त्यांच्यात पाझरली आहे आणि तिचा सुगंध इथल्या वातावरणात दरवळत राहतो, जो पॅरिसला युरोपातील इतर शहरांपेक्षा आकर्षक बनवतो, त्याचं वेगळेपण जपून ठेवतो.

परफ्युमचे कारखाने

फॅशनप्रमाणेच सुगंध हा या शहराचा विशेष गुणधर्म आहे. फ्रेगोनार्ड ही परफ्युम फॅक्टरी आवर्जून पाहावी. पॅरिसचे परफ्युम्स जगभरात प्रसिद्ध आहेत. ही उंची अत्तरं कशी तयार होतात, हे पाहणंसुद्धा तितकंच भारावून टाकणारं असतं. फुलांची निवड, त्यांचे अर्क, त्यांचे प्रकार, परफ्युम्स कशी निवडावीत, पुरुषांनी ती कशी फवारावी, महिलांनी कशी फवारावी इत्यादी माहिती फ्रेगोनार्डमधील महिला प्रात्यक्षिकांसह देतात. इथं मिळणारी ‘एक्स्लुझिव्ह’ परफ्युम्स ही जगात इतरत्र कुठेही मिळत नाहीत. अगदी ‘डय़ुटी फ्री’मध्येही नाहीत. त्यामुळे परफ्युम्स आवर्जून विकत घ्या.

चीझ आणि वाइन..

चीझ आणि वाइन हे इथल्या आहारातले मुख्य पदार्थ. न्याहरी असो वा रात्रीचं भोजन, वाइन हा येथील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण वाइनमुळे इतल्या हॉट चॉकलेटवर फार अन्याय होतो. इथल्या थंड हवेत हॉट चॉकलेट पिण्यासारखं सुख नाही. पॅरिसच्या हवेप्रमाणेच इथला आहारही थंडगारच असतो. पावाचं प्रमाण लक्षणीय असतं. पावांचे विविध प्रकार येथील रेस्त्राँमध्ये उपलब्ध असतात. क्रोऑसाँ, बागेत, मकारून्स यांसारखे काही कुरकुरीत तर काही तोंडात टाकताच विरघळून जाणारे लुसलुशीत पदार्थ आवर्जून खाऊन पाहा.