‘हे काम करण्यास तर मी एका पायावर तयार आहे’ असा वाक्प्रचार नेहमीच वापरला जातो. मात्र एका पायावर उभे राहणे सोपे नाही. शरीराचा सर्व तोल एका पायावर सांभाळणे तसे कठीण आहे. मात्र आज जो व्यायाम करणार आहोत, तो ‘एका पायावर’ करावयाचा आहे. शरीराचा तोल सांभाळणे सोपे जावे यासाठी हा व्यायाम करायचा आहे.

कसे कराल?

सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये केवळ दोन ते तीन इंचांचे अंतर ठेवा. मात्र दोन्ही पाय एकमेकांस समांतर असावेत. खांदे मागच्या बाजूस खाली ओढून घ्या.

त्यानंतर एक पाय हळूहळू तीन ते सहा इंचांनी वर उचला. शरीर स्थिर ठेवून तोल जाऊ न देण्याचा प्रयत्न करा. वर उचललेला पाय गुडघ्यात काटकोनामध्ये वाकवा.आता शरीराचा सर्व भार एका पायावर येईल. मात्र हा पाय हलवण्याचा जराही प्रयत्न करू नका. १० ते १५ मिनिटे याच स्थितीत राहा.

आता वर उचलेला पाय खाली ठेवून दुसऱ्या पायाने हीच कृती करा.