X

हसत खेळत कसरत : नितंबाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी..

या व्यायामामुळे नितंब, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाने पाठदुखीपासून सुटका होऊ शकते.

माणसाच्या नितंबावर असलेले स्नायू ‘ग्लुटल मसल’ या नावाने ओळखले जातात. तीन प्रकारचे हे स्नायू असतात. खाली बसताना किंवा उभे राहताना हे स्नायू आखडतात. या स्नायूंच्या बळकटीसाठी ‘ग्लुट ब्रिज’ या नावाचा व्यायाम आपण करणार आहोत. या व्यायामामुळे नितंब, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाने पाठदुखीपासून सुटका होऊ शकते. खुर्चीवर बसून कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे.

कसे कराल?

* जमिनीवर झोपा. पाय गुडघ्यातून वाकवून वर घ्या. दोन्ही हात पायांच्या बाजूने सरळ ठेवा.

* तुमचे नितंब, कंबर आणि पाठीचा खालचा भाग वर उचला. लक्षात घ्या, पाठीचा वरचा भाग मात्र जमिनीवरच पाहिजे.

* आता नितंब आणि कंबर पुन्हा खाली घ्या. असे पुन:पुन्हा करा.

* हा व्यायाम करताना पायाचा गुडघ्याखालील भाग म्हणजे पोटऱ्या आणि पावले स्थिर ठेवा. पाय न हलता जमिनीवर स्थिर राहिला तरच या व्यायामाचा उपयोग आहे.

* हा व्यायाम योग्य प्रकारे करा. योग्य प्रकारे व्यायाम केला नाही तर ते हानीकारक ठरू शकते.