राजेंद्र श्रीकृष्ण भट

राज्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सर्वानाच भेडसावणार. पाण्याची बचत करण्याची सवय आताच लावून घ्यायला हवी. डाळ, तांदूळ, भाज्या धुतलेले पाणी झाडांना घालावे. हे पाणी झाडांना घातल्याने झाडे छान वाढतात. तांदूळ, डाळ धुताना निघणाऱ्या पाण्यात मिसळलेला अंश झाडांच्या वाढीसाठी फारच उपयुक्त असतो. मांसाहारींनी मासे किंवा मटण धुतलेले पाणी झाडांना घालावे. झाडांना ते फारच आवडते. आजपासून आपण घरातील वाया जाणारे पाणी झाडांना घालण्याची सवय लावून घेऊ.

येत्या काळात पाण्याअभावी बाजारात येणाऱ्या भाज्या, फळांचे प्रमाण घटणाार आहे. जी उत्पादने बाजारात येतील, तीदेखील फार महाग असतील. पालेभाज्यांच्या बाबतीत ही समस्या फारच गंभीर होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी गटारे, नाल्यांच्या काठांवर पालेभाज्या पिकवल्या जातात. मळ्यांतून येणाऱ्या पालेभाज्यांचे प्रमाण घटले की साहजिकच या गटारांवर पिकवलेल्या भाज्या आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता दाट आहे. हे टाळण्यासाठी इमारतीच्या आवारात, गच्चीवर, घराच्या सज्जात भाज्या लावणे उत्तम.

चार बोट उंच, दीड फूट रुंद आणि दोन फूट लांब ट्रे घेऊन त्यात पालेभाजी वाढवणे सहज शक्य आहे. बाल्कनीत आताच वेली, झुम्डपे लावूया. हिवाळ्यात ही झाडे चांगली वाढतील आणि उन्हाळ्यात घरातील तापमान नियंत्रित राखतील. पाणी आणि तापमानाची काळजी घेऊया.