16 February 2019

News Flash

शहरशेती : बियाणे खरेदी

घरातील बाल्कनीत लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणाच्या तुलनेत बियाण्यांची ही पाकिटे फार मोठी असतात.

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र श्रीकृष्ण भट

सर्व फळभाज्यांची लागवड रोपे करूनच केली जाते. बिया पेरून रोपे करणे आणि त्यांची तीन-चार आठवडय़ांत भाजीच्या प्रकारानुसार पुनर्लागवड करायची असते. रोपवाटिकेत फळभाज्यांची तयार रोपेसुद्धा मिळतात. ती चांगल्या पद्धतीने वाढवलेली असतात, मात्र ती ठरावीक जातींचीच असतात. बियाण्यांच्या दुकानांत विविध प्रजातींची बियाणी उपलब्ध असतात. त्यापैकी सुधारित जातींचे बियाणे विकत घ्यावे. म्हणजे त्यांच्या फळांपासून बियाणे तयार करून पुन्हा रोपांची लागवड करू शकतो.

घरातील बाल्कनीत लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणाच्या तुलनेत बियाण्यांची ही पाकिटे फार मोठी असतात. त्यामुळे शेजारी किंवा मित्रमंडळींनी गट करून एकाने वांगी, दुसऱ्याने मिरची असे एक-एक पाकीट घेऊन नंतर त्यातील बियाणे आपसात वाटून घ्यावे किंवा रोपे करून ती वाटून घ्यावीत. त्यामुळे प्रत्येकालाच आवश्यकतेप्रमाणे रोपे मिळतील.

असा गट असल्यास एकमेकांना भाजी लागवडीत येणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय इत्यादी अनुभवांचेही आदान-प्रदान करता येईल.

या भागात आपण रोपांची लागवड आणि संवर्धनाविषयी माहिती घेऊ.

आपण स्वयंपाकात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरतो, उदा. -बेडगी, संकेश्वरी, काश्मिरी, पांडी इत्यादी. त्यांची देठे काढून, धुवून वाळवतो आणि नंतर त्यांचा वापर मसाल्यासाठी करतो. तेव्हा त्यांच्या ज्या बिया पडतात त्या साठवून ठेवून त्यापासून त्या जातीच्या मिरच्यांची रोपे बनवू शकतो.

रोपांची पुनर्लागवड नेहमी संध्याकाळी करावी. रोपे लावल्यानंतर त्यांना हलके पाणी द्यावे. रोपांची वाढ होत जाईल, तसा त्यांना आधार द्यावा.

टोमॅटोचे खोड पोकळ असते. ते ताठ उभे राहात नाही. फळे लागल्यावर त्यांच्या वजनाने झाड वाकते. त्यामुळे वाढ होत जाईल, तसा त्याला आधार द्यावा. टोमॅटो हे झुडूप आणि वेल अशा दोन्ही प्रकारांत असतात.

First Published on August 31, 2018 3:28 am

Web Title: article about farming