ऋषिकेश बामणे

टेनिस या क्रीडा प्रकारात मानाची समजली जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेला खेळ रंगत असला तरी, त्याहीपेक्षा तापमान आणि फॅशन या दोन गोष्टींमुळे ही स्पर्धा अधिक ‘हॉट’ ठरत आहे. ३८ अंश सेल्सियसवर गेलेल्या तापमानामुळे खेळाडूंचा अक्षरश: घामटा निघत आहे. गेल्या आठवडय़ाच्या उत्तरार्धात वादळी वाऱ्यांनी तापमान कमी केले असले तरी, मंगळवारपासून पारा पुन्हा चढणीला लागला असून येत्या गुरुवारनंतर तो आणखी वर जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे वेळापत्रक टेनिसपटूंना नेहमीच त्रासदायक ठरत असते. ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या या स्पर्धेत हवामान, आद्र्रता, वाऱ्यांचा वेग आणि उन्हाच्या झळा हे घटक खेळावर नेहमीच परिणाम घडवत असतात. त्यामुळे गेल्याच वर्षी नोव्हाक जोकोविचसारख्या खेळाडूने स्पर्धेच्या आयोजन आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेवरच प्रश्न उपस्थित केले होते. सकाळी १०ला सुरू होणाऱ्या सामन्यांपासून ते रात्री १२-१ पर्यंत रंगणाऱ्या मुकाबल्यांवर त्याने उघड नाराजी प्रकट केली होती. या टीकेनंतर आयोजकांनी यंदा विशिष्ट तापमानवाढीनंतर खेळाडूंना विश्रांतीसाठी दहा मिनिटे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यानंतरही स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना तापमानाचे आव्हान पेलावे लागत आहे. दोन सेटदरम्यान खेळाडू पाण्याचा मारा अंगावर करून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न करतानाही दिसून येत आहे.

गोष्ट रॅकेटतोडय़ाची!

खेळात हार-जीत तर चालूच असते मात्र पराभूत झाल्यामुळे एखाद्या खेळाडूने मैदानावरच त्याचा राग व्यक्त करत चक्क टेनिस रॅकेट तोडल्याचे तुम्हाला आठवते का?

जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला मिलोस रावनिकविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र सामना संपण्यासाठी काही अवधी असतानाच आपला पराभव डोळ्यासमोर पाहणाऱ्या झ्वेरेव्हने त्याचे रॅकेट मैदानावर आठ वेळा जोरात आपटले. त्यामुळे त्याला उर्वरित सामना दुसऱ्या रॅकेटने खेळावा लागला. सामन्यात मी क्षुल्लक चुका केल्यामुळेच संताप व्यक्त करण्यासाठी रॅकेट तोडली, असे त्याने सामन्यानंतर सांगितले.

फेडररला अडवले जाते तेव्हा..

टेनिसमधील सचिन तेंडुलकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेडररला उपउपांत्यपूर्व फेरीपूवी विश्रांतीच्या दिवशी एका वेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागले. सराव क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्याकडे त्याचे ओळखपत्र नसल्याने प्रवेशद्वाराबाहेरील कर्मचाऱ्याने त्याला थांबवले. मात्र फेडररनेदेखील उगाच त्याला दोन शब्द सुनावण्याऐवजी आपल्या साहाय्यकाला ओळखपत्र घेऊन येण्यास सांगितले. मारिया शारापोवालासुद्धा अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला. यावरून स्पर्धेचे कर्मचारी निदान त्यांच्या कामाशी किती प्रामाणिक आहेत, याची प्रचीती आली.

सेरेनाचा निळा सूट

विम्बल्डनप्रमाणे ऑस्ट्रेलियन ओपन फॅशनसाठी विशेष ओळखली जात नसली तरी, तो ट्रेंड या स्पर्धेतही दिसून येत आहे. ‘सुपरमॉम’ म्हणून ओळखली जाणारी सेरेना विल्यम्स फॅशन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन ओपनमध्ये मुलीच्या सांगण्यावरून कॅटसूट परिधान करणाऱ्या सेरेनाने या वेळीही स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात निळ्या रंगाचा पूर्ण शरीर झाकणारा वेश परिधान केला होता. प्रेक्षकांमध्येही आपापल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठीसुद्धा विविध वेशभूषा परिधान केल्या. ब्रिटनच्या अँडी मरेच्या सामन्यात चाहत्यांनी त्याला त्याच्यासारख्याच टोप्या घालत मानवंदना दिली.