वैभव भाकरे

जगातील सर्वोत्तम स्पोर्ट्स कार उत्पादकांमध्ये स्पर्धा असणे हे काही नवीन नाही. मुळातच या कार कंपन्यांचे असे स्पर्धात्मक संबंध नैसर्गिकच म्हणायला हवेत. फेरारी आणि पोर्श या दोन कंपन्यांचेदेखील अशाच प्रकारचे संबंध आहेत. कोणत्याही देशाची संस्कृती ज्याप्रमाणे खानपान, संगीत, कला, भाषा यातून झळकते तशी ती तेथील गाडय़ांमधूनदेखील दिसते. या दोन्ही गाडय़ांमध्ये त्यांच्या देशाच्या विशिष्ट संस्कृतीची झलक त्यांच्या रेसिंग आणि गाडी उत्पादन करण्याच्या धोरणात दिसून येते.

फेरारी ही इटालियन कंपनी आहे, तर पोर्शे ही जर्मन कंपनी. सध्या पोर्शे वोल्क्सवोगनच्या मालकीत आहे. दोन्ही कंपन्या धोरणात्मक पातळीवर एकमेकांशी अगदी वेगळ्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर फेरारीच्या जगातील सर्वात यशस्वी टीम रीझि कंपेटिझिऑनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, आम्ही एक इटालियन रेसिंग टीम आहोत, म्हणजे स्पर्धेसाठी भावनात्मक होणे हे ओघाने आलेच असा त्यांचा बोलण्यामागचा स्पष्ट संकेत होता. गाडय़ांबद्दल, रेसिंगबद्दल भावनात्मक होणे हा फेरारी कंपनीच्या संस्कृतीतच आहे, तर पोर्श थोडय़ा वेगळ्या प्रकारे काम करते. रेसिंगबाबत पोर्शेची गणिते कमालीची व्यावहारिक आहेत.

पोर्शेच्या चाहत्यांना ही कंपनी बाजारात ज्या प्रकारच्या आधुनिक गाडय़ा उत्पादन करते त्यामुळे जास्त प्रिय आहे. रेसिंग हे पोर्शच्या संशोधन आणि विकास या विभागाखाली येते. त्यांच्यासाठी रेसिंग हे संशोधन आणि विकासाच्या अखत्यारीत येते. बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या गाडय़ांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी रेसिंगचा उपयोग पोर्शला होतो. त्याचप्रमाणे यामुळे त्यांना मोटार रेस आणि स्ट्रीट कार यावर काम करण्यासाठी नवे इंजिनीअर घेण्यासाठीदेखील होतो. दोघांचे रेसिंगमागचे धोरण जरी भिन्न असले तरी त्या दोन्ही कंपन्यांनी रेसिंगच्या क्षेत्रातही यश मिळवले आहे. जगभरातील अनेक शर्यतींमध्ये या दोन्ही कंपन्यांनी भाग घेतला असून अमेरिकेतील ले मांस शर्यतीतदेखील त्या एकमेकांना विरुद्ध आल्या आहेत. १९६०च्या आधी फेरारी मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये जिंकण्यासाठी उतरत होती, तर पोर्शेही क्लास विनसाठी प्रयत्न करीत असे. या शर्यतींमध्ये मोठा ठसा पोर्शेल उमटवता आला नाही; परंतु १९६० मध्ये ही परिस्थिती बदलली. कारण या वर्षी पोर्शेने सेबरिंग येथे मोठा विजय नोंदवला. एकूण १८ खिताब जिंकले. लेमॅन्समधील एकूण १६ खिताब जिंकण्याचा मानदेखील पोर्शेच्या नावावर आहे.

फेरारीच्या सर्वात स्वस्त कारहूनदेखील पोर्शेची किंमत बहुतेक वेळा निम्मी असायची. आतासुद्धा या दोन्ही कंपन्यांच्या गाडय़ांच्या किमतींमध्ये कमालीचा फरक आहे. असे असूनदेखील पोर्शेने रेस ट्रॅकवर कुठल्याही प्रकारे आपली कमतरता जाणवू दिली नाही. आज या दोन्ही कंपन्या शर्यतीसाठी विशेष गाडय़ा तयार करतात. १९९९ ते २००६ पर्यंत पोर्शेने २१ मोठे विजय मिळवले. लेमॅन्स, सेबरिंग, पेटिट ले मांस यांचा समावेश आहे. फेरारीनेदेखील नजीकच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. २००७ पासून त्यांनी ९ खिताब जिंकले आहेत. यात ले मांस येथील जीटीई प्रो क्लास होनोर्स याचाही समावेश आहे. सध्या पोर्शे ९११ टबरे एस विरुद्ध फेरारी पोटरेफिनो, पोर्शे ९११ जीटी २ आर एस विरुद्ध फेरारी ८१२ सुपरफास्ट या गाडय़ांची तुलना केली जात आहे. पोर्शेची किंमत आधीपासूनच कमी असल्यामुळे या गाडय़ांची त्यांचा वेगळा चाहतावर्ग तयार केला. फेरारी ही नेहमीपासूनच त्याच्या उच्च दर्जाची इंजिनीअरिंग आणि उत्कृष्ट इंजिनसाठी प्रसिद्ध आहे. रेसिंग क्षेत्रात आलेल्या नियम बदलानंतरही या कंपन्यांचे स्पर्धात्मक वैर सुरू राहावे अशी चाहत्यांची इच्छा आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com