नमिता धुरी

परदेशी शिक्षण पद्धतीत काय शिकतो, यापेक्षा कसं शिकतो याला महत्त्व आहे. म्हणजे प्रश्न, सिद्धांत फार कठीण आहेत आणि ते समजून घ्यायचे आहेत. आता हे सारं एका शिक्षकाने समजून सांगणं म्हणजे फारच झालं. काय त्या एका शिक्षकालाच सारं माहीत असा आविर्भाव आणून तिथले विद्यार्थी हात बांधून डेस्कवर बसत नाहीत. समजून घ्यायचं आहे, या एकाच उमेदीतून ते प्रयोगशाळा गाठतात. ग्रंथालयात बसून पुस्तकांत माना घालतात नि मग दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन आदल्या दिवशी वाचलेलं, त्यातून उमजलेलं आणि गोंधळ घालणारं सारं शिक्षक आणि वर्गमित्रांसमोर ठासून मांडतात. यातूनच त्यांना शिक्षण म्हणजे काय ते आकळत जातं. शिकून देशसेवेसाठी बाहेर पडल्यानंतर त्यांना वेगळं शिक्षण घ्यावं लागत नाही. हेच तिथल्या शिक्षणपद्धतीचं यश आहे. हे असं भारतात घडलं तर?

भारतीय तरुणांना सुरुवातीपासूनच टक्क्यांच्या मागे धावावे लागते. येथील लोकसंख्या जास्त असल्यामुळेही स्पर्धा जास्त असते. विविध प्रकारची आरक्षणे पार करून आणि भरपूर आर्थिक भार सोसून एखाद्या विद्यपीठात प्रवेश मिळवला जातो. मात्र तेथून मिळणारे शिक्षण पुढे रोजगारासाठी कामी येत नाही. त्यासाठी पुन्हा काही महिने नव्याने प्रशिक्षण घ्यावे लागते.

याउलट परदेशातील विषय निवडीचे स्वातंत्र्य, शिक्षणातील स्वस्ताई, पाठांतरापेक्षा कृतिशील शिक्षणावर भर इत्यादी गोष्टी तरुण मुला-मुलींना खुणावत आहेत. तेथील शिक्षणपद्धती अधिक तंत्रस्नेही आहे. एखाद्य विषयाच्या तासिकेचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी दिले जाते. त्यांनी ते वाचून येणे अपेक्षित असते. दुसऱ्या दिवशी त्यावर फक्त चर्चा होते. या चर्चेत सक्रिय राहण्यासाठी भरपूर वाचन करण्यावाचून पर्याय नसतो. यामुळे विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करायला शिकतात.

परदेशात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागत असले तरीही त्यांचे सरकार मात्र शिक्षणासाठी पैसे खर्च करण्यात कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे तेथे प्रत्येक विषयासाठी संशोधन केंद्र असते. गटचर्चा, प्रकल्प, संशोधन इत्यादींमधून घडलेले विद्यर्थी मग करिअरमध्ये कुठेच मागे राहत नाहीत. बऱ्याचदा शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते वा ते स्वत:चा उद्योग सुरू करतात. त्यामुळे भारतीय शिक्षणपद्धतीनेही आता बदलायला हवे अशी तरुण भारतीयांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात अभ्यासक्रमातील बदलांपासून व्हायला हवी. अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपये उच्च शिक्षणासाठी मंजूर झाले. मात्र ते प्रत्यक्षात योग्य वेळी योग्य गोष्टींवर खर्च झाले तरच भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावू शकेल. परिणामी भारतीय तरुणांवर देश सोडून जाण्याची वेळ येणार नाही. ते इथेच शिकतील आणि ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी करू शकतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

अमेरिकेत उच्च शिक्षणावर मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च केला जातो. त्यामुळे स्थानिक तसेच परदेशी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण स्वस्त आहे. येथील खासगी विद्यापीठांपेक्षा सरकारी विद्यापीठांत कमी खर्चात शिक्षण मिळते. लोकसंख्या कमी असल्यामुळे इथल्या विद्यापीठांमध्ये ग्रंथालये, प्रयोगशाळा, कॅम्पस इत्यादींसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. माझे विद्यार्थी ओळखपत्र वापरून मी बस आणि रेल्वेने मोफत प्रवास करू शकत होते. इथे आपल्या आवडीनुसार विषय निवडता येतात. दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर अभियांत्रिकीचे विद्यार्थी काम करतात. विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊनही बरेच काही शिकता येते. तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या टक्क्यांइतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व तुमच्या इंटर्नशिप्स, प्रकल्प आणि इतर कलागुणांना असते. याउलट भारतात पाठांतरावर अधिक भर असल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे रोजगारकौशल्य नसते. त्यामुळे भारतातील अभ्यासक्रम हा अधिक कौशल्याधारित व्हायला हवा.

– स्वरूपा वैशंपायन, इन्फर्मेशन/डेटा सायन्स,

पिट्सबर्ग विद्यापीठ, पेनसिल्व्हेनिया

ओहायो विद्यपीठातून मास कम्युनिकेशन रिसर्च हा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिथे पुस्तकी शिक्षणापेक्षा असाइनमेंट, प्रकल्प, संशोधन यांवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून नोकरीला सुरुवात केल्यावर नव्याने काही शिकण्याची गरज भासत नाही. तिथे जाण्यापूर्वी मी भारतातच औषधनिर्माणशास्त्राची पदवी घेतली. पण त्यात मला करिअर करायचे असेल तर पुन्हा काही महिने प्रशिक्षण घ्यावे लागेल. कारण आपला अभ्यासक्रम काळानुरूप नाही. मी जिथे शिकलो ते फार लहान विद्यपीठ होते. तरीसुद्धा त्यांच्या ग्रंथालयात ३० लाख पुस्तके होती. तिथे विषयनिवडीचे स्वातंत्र्य असते. तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतानाच कला शाखेचे विषयही निवडू शकता. तिथल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी शिकवणी शुल्क माफ असते. अगदी पीएचडी स्तरावरही कमीत कमी खर्च करावा लागतो.

– सागर अत्रे, मास कम्युनिकेशन रिसर्च (पदव्युत्तर पदवी), ओहयो विद्यापीठ

परदेशात पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर भर दिला जातो. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात आम्ही सहावेळा औद्योगिक भेटी दिल्या आणि अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. मूल्यांकनाची पद्धत काय असावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना असते. त्यामुळे काही शिक्षक फक्त प्रकल्पांवर आधारित मूल्यांकन करतात, तर काही लेखी परीक्षा आणि प्रकल्प यांना सारखेच महत्त्व देतात. प्रत्येक विद्यापीठात किती पायाभूत सुविधा असाव्यात या विषयीचे निर्देश राज्य सरकारने ठरवून दिलेले असतात. संशोधनाला अधिकाधिक प्रोत्साहन देणाऱ्या सुसज्ज प्रयोगशाळा असतात. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते. तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न लक्षात घेऊन त्यानुसार शिष्यवृत्ती दिली जाते, अथवा विद्यापीठात काम करूनही तुम्ही शिष्यवृत्ती मिळवू शकता. या सर्व गोष्टी भारतीय उच्च शिक्षणात येणे नक्कीच गरजेचे आहे.

– वेद कुलकर्णी, क्वांट फायनान्स आणि रिस्क मॅनेजमेंट (पदव्युत्तर पदवी), टेम्पल विद्यपीठ, फिलाडेल्फिया