X

कोकणचा गणरंग

गावी जाण्याचे अप्रूप असतेच, पण कोकणात जायचं तर त्यासाठी दुप्पट उत्साह आणि प्रवास सोसायची तयारी ठेवणं आलं.

दिशा खातू

‘गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा..’ या ओळी कोणाला तरी, म्हणजे घाटावरच्या अर्थात ज्यांनी कोणी अद्याप कोकण पाहिलेलं अशांना संबोधून आहेत. कोकण हे दाखवण्यासारखं आहेच, पण ते अनुभवण्यासारखंसुद्धा आहे. साधीभोळी, काळजात शहाळी भरून घेऊन उभी असलेली माणसं अनुभवण्यासाठी घाटय़ांना कोकणात न्या रे.. असा लाघवी सूर या गाण्यात आहे.. पण जे अंगभर कोकणपण लेवून ‘दूर देशा’ नोकरीला आहेत, अशांचा तर कोकणात जाण्याचा एक सोहळाच असतो.  हा सोहळा आता नव्याने सुरू झाला आहे. इंटरनेट, स्मार्ट फोनमध्ये गुंतून पडलेली तंत्रस्नेही तरुणाई गणरंगी रंगण्यासाठी स्वत:च्या गावाकडे तुडुंब उत्साहाने धाव घेत आहे.. त्याविषयी.

गावी जाण्याचे अप्रूप असतेच, पण कोकणात जायचं तर त्यासाठी दुप्पट उत्साह आणि प्रवास सोसायची तयारी ठेवणं आलं. अगदी १५ ते २० वर्षांपूर्वी कोकणात सणासुदीला जाणं तसं जिकिरीचंच होतं. वाहतुकीची साधनं तोकडी. अरुंद रस्ते आणि इतर गैरसोयींमुळे कोकण गाठताना हाल हे आलेच. कोकण रेल्वे सुरू झाली आणि रस्ते वाहतुकीवरील हा भार थोडा सैलावला.

आज तर दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात निर्माण झालीच आहेत, पण गावागावांत मोबाइल नेटवर्क पोहोचले आहे. त्यात महामार्गावरील खाद्यसुविधांमुळे तरुणाईची पावले गावाकडे वळू लागली आहेत. सुट्टीत गावी जाणे हा ‘आऊटिंग’साठीचा नवा पर्याय निर्माण झाला आहे. कोकणातील निसर्गाचा आनंद लुटणे हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा.

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांचा परमसुखसोहळा. गावात मूलभूत सुविधांची वानवा असतानाच्या काळातही दरवर्षी गावाकडच्या घरातील मखरात गणपती पूजणारे कोकणवासीय आजही तितक्याच उत्साहाने कोकणात जातात. त्यात आता तरुणाईची भर पडली आहे.

गावं बदलली आहेत. अनेक सुविधा खेडय़ांपर्यंत पोहोचल्या आहेत. स्मार्टफोनसाठीची ‘रेंज’ हा त्यातील सर्वात वरचा घटक. रेंज पोहोचली तशी तरुणाईही गावापर्यंत पोहोचली आहे.

पटकथा लेखक सुमेध किर्लोस्कर सांगतो, ‘भौतिक जगात राहणं आता अनेकांना सोसवत नाहीय. जगण्यात एक प्रकारचा साचेबद्धपणा आलाय. तसे फिरण्यासाठीचे अनेक पर्याय आहेतच, पण गाव काही केल्या सुटत नाही. तशी कोकणवासीयांची अवस्था आहे. कृषी पर्यटनस्थळी जाण्यापेक्षा स्वत:च्याच गावी जाण्यात हल्ली अनेक जण रस घेऊ लागले आहेत. गावागावांत दुकानं आली आहेत. रस्ते बांधले गेलेत. घरात थेट नळाद्वारे पाण्याची सोय आहे. याशिवाय घरगुती शौचालये आहेत. त्यामुळे गावी जाणं म्हणजे अज्ञातवासात जाणं, ही भावना मनावरून पुसून टाकली गेली आहे. निसर्गाची ओढ शहरात फार काळ स्वस्थ बसू देत नाही.’

‘अ‍ॅनिमेटर’ कौस्तुभ चव्हाणचे मूळ गाव कणकवली आहे. तो  गेली चार वर्षे न चुकता वर्षांतून एकदा गावी जातो. कौस्तुभ म्हणतो की, मी गावी जात असल्याचं पाहून माझ्या चुलत भावंडांनाही गावाकडच्या गणेशोत्सवाची ओढ लागली आहे. गावात परंपरा आहे. ती अनुभवणं अधिकच सुखदायी असतं. गणेशाचं मनापासून पूजन. मग मूर्ती किती उंच आणि आकर्षक अशी ईर्षां तिथे नसते. रोजच्या आरत्या, पूजा, नैवेद्य यांची तयारी करायची म्हणजे अख्खा दिवस पुरत नाही. या साऱ्या सुखसोहळ्यात ‘मोबाइल-मीडिया-मेल’ची आठवणसुद्धा होत नाही.

‘जमिनीतून करांदे काढणार’

मूळचा महाडचा क्षितिज पटवर्धन मुंबईत इकोनोमॅट्रिस्ट म्हणून काम करतो. क्षितिजला निसर्ग अधिक भावतो. धुवांधार पावसानंतर सर्वत्र भरगच्च हिरवाई पसरलेली असते. ती पाहिली की मन प्रसन्न होतं, असं तो सांगतो. कोकणात गणपतीसाठी फुलं विकत घ्यावी लागत नाहीत, की दुर्वा केळींसाठी विक्रेत्यांशी घासाघीस करावी लागते. घराबाहेर पडलं की डवरलेली फुलंच फुलं बघायची आणि ती काढून दुर्वासोबत त्यांचा हार बनवायचा. आजोबांकडून मी हार करायला शिकलो. जागोजागी तगर, कोरांठी, संकासूर, वेगवेगळ्या जातींची जास्वंदे, तिरडा, तिळाची फुले उगवलेली असतात. यंदा मी जमिनीतून करांदे काढायला शिकणार आहे. मी गावी गेल्यावर शेताच्या बांधावर भाजी लावतो, लावलेल्या भाज्यांची कापणी करतो, असंही त्यानं आवर्जून सांगितलं.

कुठे चूल.. कुठे बार्बेक्यू!

कायद्याचे शिक्षण घेणारी तिर्था गांधीही गावाला नियमित जाते. ती म्हणते, मला पूर्वी चुलीवरचं जेवण काय असतं हे माहीत नव्हतं. लाकडे वापरून चुलीवर जेवण बनवतात, त्याचा स्मोक शिजणाऱ्या पदार्थाला मिळतो आणि ते पदार्थ अत्यंत चविष्ट बनतात. त्यामुळे शहरातील बार्बेक्यूमधील पदार्थाची चव फिकी पडते. निखाऱ्यांवरची भाकरी, ऋषीची भाजी (नुसत्या पाण्यात शिजवलेली भाजी), मोदक, नारळाच्या दुधातल्या शेवया, कोळ पोहे, आंबोळी, नारळी भात पाहून भल्याभल्यांचा संयम सुटलेला असतो. रोजचा गणेशाचा नैवेद्य केळीच्या पानावर जेवून तृप्त ढेकर देणे काय ते गणेशोत्सवातच कळते.

जंगलातील सफर अनोखी

व्यावसायिक राजू संसारे याचे गाव रत्नागिरी आहे. गेली सहा वर्षे राजू गावी जात आहे. मागच्या वर्षी त्याने त्याच्या काही इतर धर्माच्या मित्र-मैत्रिणींना गणपतीला गावी नेले होते आणि त्यांना कोकण फिरवून आणले. मी गणपती उत्सवाबरोबरच तिकडे गावातल्या मुलांबरोबर नदीत पोहायला जातो, गावच्या पद्धतीने काटय़ांनी मासे पकडतो. गावकऱ्यांसोबत जंगलात भटकंतीला जातो. मागच्याच वर्षी तिथे मी बिबटय़ाची छोटी छोटी पिल्लं पाहिली होती आणि त्याच्या आदल्या वर्षी तिथे मोर थुईथुई नाचताना पाहिले होते.

चिबुडचे ‘डेझर्ट’

कॉम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम करत असलेला प्रशांत काळोखे हा मुंबईत स्थायिक झालेला आहे, मात्र गणेशोत्सवानिमित्त तो आता गावी येतो. तो म्हणतो की, आमच्या काजू, आंबा, नारळीच्या बागा आहेत. इथे जाऊन आम्ही काजूची बोंडे तोडतो. कधी पाऊस नसेल तर शेकोटीची चूल बनवून त्यावर काजू मसाला भात बनवून पार्टी करतो. चिबुडाचा गर, दही, मीठ आणि साखर एकत्र करून अप्रतिम ‘डेझर्ट’ तयार होतं.