तुम्ही नुकतीच गाडी चालवायला शिकला असाल किंवा अनुभवी चालक असाल, काही वेळा गाडी चालवताना चालक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे गाडीचे नुकसान होते. या चुकांमुळे गाडीच्या क्षमतेवर तर परिणाम होतोच, पण वारंवार दुरुस्तीचा भुर्दंडदेखील सोसावा लागतो. जास्त र्वष गाडी चालवण्याचा अनुभव असल्यास ड्रायव्हिंगच्या अनेक सवयी अंगवळणी पडतात. या सर्वच सवयी गाडीसाठी फायदेशीर असतातच असे नाही. जेवढा गाडी चालवण्याचा अनुभव अधिक तेवढेच या चुकीच्या सवयी सोडणे कठीण. म्हणून गाडीची काळजी घेण्यासाठी गाडी चालवण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणे योग्य.

प्रत्येकाची गाडी चालवण्याची ठरावीक शैली असते. त्यानुसारच चांगल्या किंवा वाईट सवयी पडतात. या सवयी गाडी शिकवणारा, आपली पहिली गाडी किंवा आपण जास्त काळ कुठली गाडी वापरलेली आहे? यासारख्या बाबींवर अवलंबून असतात; परंतु आपण गाडी चालवताना नेमक्या काय चुका करतोय हे एकदा कळल्यावर त्या टाळणे सोपे होऊन जाते. गाडी चालवताना बहुतांश लोकांना एक हात स्टेरिंगवर आणि एक हात गियर स्टिकवर ठेवण्याची सवय असते. यामुळे तुम्ही तुमच्या गिअरबॉक्सला हानी पोहोचवीत आहात. गियर लिव्हर हे शिफ्टिंग गिअर्सच्या वर असते. शिफ्टिंग फोर्क हे गिअर बदलण्यासाठी सदैव तयार असतात. गिअर स्टिकवर सतत हात ठेवल्यामुळे शिफ्टिंग व्हीलवर वजन पडून त्या दबल्या जातात. यामुळे सतत घर्षण निर्माण होऊन गिअरच्या दातांचे घर्षण वेगाने होते. म्हणून गिअर स्टिकवर हात ठेवून गाडी चालवणे टाळा. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील एका हाताने स्टेअरिंगवर हाताळणे योग्य नसल्याने नेहमी दोन्ही हात स्टेअरिंगवर ठेवा.

आजकाल बऱ्याच गाडय़ांमध्ये टबरे चार्जरचा पर्याय असतो. या गाडय़ांची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. जर तुम्ही लांबचा प्रवास केला असेल किंवा वेगाने गाडी चालवली असेल तर टबरे चार्जर असणारी गाडी प्रवासानंतर लगेच बंद करणे चुकीचे आहे, टबरे चार्जर इंजिनपेक्षा अधिक आरपीएमवर फिरत असते  यामुळे त्यांचे तापमान भरपूर वाढते. अशामुळे गाडी थांबवल्यावर लगेच इंजिन बंद केल्यामुळे हा टबरे चार्जर खराब होण्याची आणि कालांतराने त्याची क्षमता ढासळण्याची शक्यता वाढते. म्हणून गाडी थांबवल्यावर १५-२० सेकण्ड गाडीचे इंजिन बंद करू नका; परंतु कमी अंतराचा प्रवास केला असल्यास किंवा जास्त वेगाने गाडी चालवली नसेल तर लगेच इंजिन बंद केले तरी चालते.

रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे आणि स्पीडब्रेकर्समुळे नेहमी गाडीचा वेग कमी करावा लागतो; परंतु बरेच चालक स्पीडब्रेकर किंवा खड्डा पार केल्यावर त्याच गिअरमध्ये गाडीचा वेग वाढवतात. अशामुळे गाडीला पुन्हा वेग मिळवण्यासाठी अधिक ताकद खर्च करावी लागते आणि सिलेंडर हेड, गिअरबॉक्स, क्लचमध्ये बिघाड होऊ शकतो. म्हणून अशा वेळी वेग वाढवताना गिअर डाऊन करायला विसरू नका. प्रत्येक गिअरची कमाल आणि किमान वेगमर्यादा असते. त्यानुसारच गाडी चालवा. वरच्या गिअरवर गाडी हळू चालवणे आणि खालच्या गेटवर गाडी वेगाने चालवणे अशामुळे गाडीत बिघाड होण्याचा संभव आहे. म्हणून गिअरनुरूप योग्य वेगात गाडी चालवणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे गाडी चालवताना क्लचवर किंवा ब्रेकवर सतत पाय ठेवून असतात. यामुळे ब्रेक पॅड आणि क्लचचे लवकर घर्षण होते.

ट्रॅफिक सिग्नलला थांबले असताना किंवा गाडी बाजूला घेऊन कोणाशी बोलताना गाडीचे इंजिन सुरू ठेवून क्लचवर पाय ठेवू नका. याऐवजी गिअरला न्यूट्रलला आणून हँडब्रेक लावून घ्या.

उतारावरून गाडी खाली आणताना वेग नियंत्रणात आणण्यासाठी पाय ब्रेकवर ठेवण्याची सवय अनेकांना असते, तर काही जण गंमत म्हणून सरळ इंजिन बंद करून उतारावरून गाडी चालवतात. इंजिन बंद करून उतारावरून प्रवास केल्यास पॉवर स्टिअरिंग व्यवस्थित काम करणार नाही आणि योग्यरीत्या प्रतिसाद देणार नाही. गाडीतील अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, एअरबॅग्स यांसारख्या सुरक्षा सुविधा काम करणार नाहीत. त्याचप्रमाणे ब्रेकदेखील व्यवस्थित काम न करण्याची शक्यता आहे. उतारावर गाडी पहिल्या किंवा दुसऱ्या अशा खालच्या गिअरवर ठेवा. यामुळे गाडीचा वेग नियंत्रणात ठेवता येईल.

चढणावर गाडी नेताना काही वेळा गाडी थांबवावी लागते. अशा वेळी गाडी पुन्हा चढवताना हाफ क्लच आणि अ‍ॅक्सिलेटरवर पाय ठेवतात; पण असे करणे चुकीचे असून अशा परिस्थितीत प्रथम ब्रेक दाबून हँडब्रेक लावून घ्या. गाडी न्यूट्रलवर आणा आणि गाडी सुरू करताना पहिल्या गिअरवर आणून क्लचला सोडायला सुरुवात करा आणि अ‍ॅक्सिलेटरवर पाय ठेवा. यासोबत हँडब्रेकलादेखील सोडायला सुरुवात करा. असे करण्यासाठी एक-दोन वेळा रिकाम्या रस्त्यावर याचा सराव करा.

काही लोक गाडी चालवताना रस्त्यावर व्यवस्थित लक्ष देत नाही. रस्त्यावर एकच खड्डा असला तरी नेमक्या त्याच खड्डय़ावरून हे लोक गाडी घेऊन जातात. सतत खड्डय़ावरून गाडी चालवल्यामुळे गाडीचे टायर आणि सस्पेन्शन खराब होतात. गाडी चालवताना २०००-३००० आरपीएमच्या दरम्यान ती गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास तुम्ही योग्य प्रकारे गाडी नियंत्रणातही ठेवू शकता आणि तुम्हाला अव्हरेजदेखील चांगला मिळेल.

हे टाळा

* गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गाडी पूर्ण रिकामी होण्याची वाट पाहत बसू नका. गाडी वापरात नसल्यावर गाडीचा कचरा फ्युएल टँकमध्ये जमा होतो. हा कचरा फिल्टर आणि पंपमध्ये जाऊन बिघाड होण्याची शक्यता असते.

*  वारंवार ब्रेक दाबणे: गाडी चालवताना इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवणे हे गरजेचे आहे; परंतु यासाठी विनाकारण वारंवार ब्रेक दाबल्यास गाडीचे ब्रेक पॅड आणि डिस्क बदलावी लागेल. गाडीचा ब्रेक लावणे हेदेखील कौशल्य आहे. योग्य प्रकारे ब्रेक दाबल्यास गाडीवरचा ताण कमी होईल.

*  गाडीतून काही अपरिचित आवाज येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. बरेच लोक अशा प्रकारे गाडीतून काही आवाज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे वारंवार गाडी बंद पडते आणि दुरुस्तीचा खर्च करावा लागतो.

* गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गाडी पूर्ण रिकामी होण्याची वाट पाहत बसू नका. गाडी वापरात नसल्यावर गाडीचा कचरा फ्युएल टँकमध्ये जमा होतो. हा कचरा फिल्टर आणि पंपमध्ये जाऊन बिघाड होण्याची शक्यता असते.

*  वारंवार ब्रेक दाबणे: गाडी चालवताना इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवणे हे गरजेचे आहे; परंतु यासाठी विनाकारण वारंवार ब्रेक दाबल्यास गाडीचे ब्रेक पॅड आणि डिस्क बदलावी लागेल. गाडीचा ब्रेक लावणे हेदेखील कौशल्य आहे. योग्य प्रकारे ब्रेक दाबल्यास गाडीवरचा ताण कमी होईल.

*  गाडीतून काही अपरिचित आवाज येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. बरेच लोक अशा प्रकारे गाडीतून काही आवाज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे वारंवार गाडी बंद पडते आणि दुरुस्तीचा खर्च करावा लागतो.