17 January 2021

News Flash

इतिहासाच्या पाऊलखुणा

पश्चिम खान्देशातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेले पिंपळनेर मध्ययुगात पिपलाग्राम म्हणून प्रसिद्ध होते.

(संग्रहित छायाचित्र)

रोहित जाधव

महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रादेशिक भागात सांस्कृतिक वेगळेपणा दिसतो. खान्देश प्रांतसुद्धा त्याला अपवाद नाही. स्वत:ची एक वेगळी बोलीभाषा व संस्कृती जोपासणाऱ्या खान्देशची ओळख प्राचीन काळी खांडववन अशी होती. त्यानंतर अभिर राजवटीत तो कान्हरदेश म्हणून ओळखला गेला. येथे ठिकठिकाणी इतिहासाच्या खुणा विखुरलेल्या दिसतात. अनेक मंदिरे, समाधी आणि वाडे पाहता येतात.

पश्चिम खान्देशातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेले पिंपळनेर मध्ययुगात पिपलाग्राम म्हणून प्रसिद्ध होते. तेथे तेलाचा व्यापार फार मोठय़ा प्रमाणावर चालत असे. आजही त्या गावात अनेक ठिकाणी तेलाचे दगडी घाणे दिसतात. उत्तरेतील प्रतिहार राजवटीतील सोहाडदेवाने पिपलाग्राम जिंकून तिथे कापिलाकुंड खोदून महादेवाची स्थापना केली. आज ते ठिकाण लोनेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. गावातील दममडकेश्वर देवालयाने आधुनिक रूपडे घेतले असले तरी त्याच्या प्राचीन खाणाखुणा तिथे आजही आहेत. येथून जवळच असलेल्या पानखेडा गावात वाकी नदी शेजारी डोंगरावर त्रिंबकराव दाभाडे यांची गढी आहे. खाली पानखेडा गावात मुक्ताबाईंच्या परिवारातील नवनाथ संप्रदायातील रत्नाकर स्वामींची समाधी आहे. त्यांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे.

गावात राष्ट्रकुटकालीन जनार्दन विष्णू रुख्मिणी व उमामहेश्वर यांच्या प्राचीन मूर्तीचे मंदिर आहे. पुढे गुजरात सीमेवर सुबीर शबरीधाम हे शबरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. अलीकडे शेंदवड भवानी हे देवीचे मंदिर उत्तुंग शिखरावर आहे. या डोंगरातून पूर्णा, पांझरा, मोसम या गुजरात-खान्देश-बागलाणच्या नद्यांचा उगम होतो. जवळच आदिवासी बांधवांचे डोंगऱ्यादेवाचे प्राचीन स्थान आहे. एकंदरीतच येथील प्रत्येक डोंगरात गुहा असून त्यांना डोंगऱ्या देवाचा गड असे संबोधले जाते. आज येथील घाटमाथा-खड्डाकोंबडी वनभोजनासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

पिंपळनेरपासून ६.५ किमी अंतरावरील गांगेश्वर महादेव मंदिरसुद्धा त्याचे प्राचीनत्व दर्शवते. पश्चिम खान्देश हा डांग प्रांताचाच एक तुटलेला भाग आहे. डांग प्रांत हा प्राचीन काळी दंडकारण्य असल्याचे अनेक पुरावे येथे मिळतात त्यामुळे आर्षकाळापर्यंत या मंदिराचे प्राचीनत्व जाते. मंदिराची रचना एवढी सुंदर आहे की मंदिराशेजारी घटकळ, जामखेळी, पांझरा या तीन नद्यांचा संगम आहे. या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात व अशा ठिकाणी जर महादेवाचे मंदिर असेल तर ते एक तीर्थक्षेत्र असते असे म्हणतात. गांगेश्वराचे शिवलिंग १२ महिने पाण्यातच असते. पाण्याची एक धार शिवलिंगातूनसुद्धा बाहेर पडते. त्यामुळे त्यास गांगेश्वर महादेव म्हणतात. मंदिर संपूर्ण दगडात असून गाभाऱ्यात त्रिपुरा सुंदरी व श्री गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती आहे. हे मंदिर आधी हेमाडपंती स्वरूपातील असेल अशा खाणाखुणा आजही सापडतात. मंदिराबाहेर एक कुंड आहे त्याला रामकुंड म्हणतात. तेथेच बाहेर पूर्वी आणखी एक मंदिर होते त्याला नागेश्वर महादेव मंदिर म्हणत, पण १९४२ च्या महापुरात ते मंदिर, ऋषीमठ व धर्मशाळा वाहून गेली. मंदिर परिसरात अनेक प्राचीन वास्तूंचे अवशेष दिसतात. या ठिकाणी मुख्य बाजाराचे केंद्र  होते. त्यामुळे मंदिराशेजारील जागेस हाट म्हणतात.

मंदिराची आणखी दोन वैशिष्टय़े आहेत. पहिले असे की शिवलिंग ज्या ठिकाणी पाण्यात आहे तिथे हळद, कुंकू किंवा तांदूळ टाकले तर बाहेरील रामकुंडात त्या रंगाचे पाणी येते तसेच जेवढे तांदूळ टाकले तेवढे बाहेरील कुंडात पाण्यावर तरंगतात. दुसरे असे की महाशिवरात्रीला नदीत पाणी असो वा नसो शिवलिंग पाण्यावर तरंगते. श्रावणात येथे तीनही नद्यांचे वेगवेगळे रंग आणि प्रवाह दिसतात. मंदिरामागे स्मशान आहे. त्यामुळे रात्री तेथे सहसा कुणी थांबत नाही. मंदिराजवळील पांझरा नदीवर ७०० वर्षांपूर्वीचा बागूल-राठोड राजवटीचा पाट-फड पद्धतीचा बंधारा व गायमुख आहे.

जुने वाडे

गांगेश्वर महादेव मंदिरापासून पुढे गेल्यावर सामोडे हे गाव लागते. ते जुन्या घरंदाज वाडय़ांनी परिपूर्ण आहे. गावात गेल्यावर एक एक वाडा मनसोक्त बघावा असे वाटते. गावाने जुन्या परंपरा राखत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येथूनच जवळ  भामेर, बळसाने, धनेर-आमळी, शबरीधाम अशी सुंदर ठिकाणे आहेत. आजमितीला पिंपळनेरचा तांदूळ, तेल व सुगंधी अत्तरे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे एका दिवसाच्या सहलीत ही सर्व ठिकाणे बघता येतात आणि खरेदीही करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2018 4:47 am

Web Title: article about history footsteps
Next Stories
1 दोन दिवस भटकंतीचे : वाई
2 खाद्यवारसा : कोवळ्या तोंडल्याचे लोणचे
3 सुंदर माझं घर : वारलीला नवे रूप
Just Now!
X