राजेंद्र श्रीकृष्ण भट
आपण ज्या मातीत बियाणे पेरणार आहोत त्यात रांगोळी काढताना जसे ठरावीक अंतरावर ठिपके काढले जातात तसे दोन इंचांचे अंतर ठेवून लहान खड्डे तयार करावेत किंवा दर दोन इंचांवर बियाणे ठेवून त्यावर चाळलेले गांडूळ खत किंवा माती पसरवावी. म्हणजे बियाणे झाकले जाईल. त्यावर हलके पाणी द्यावे. दोन-तीन इंच खोलवर पोहोचेल एवढेच पाणी द्यावे. बियाणे पेरलेल्या कुंडीवर किंवा ट्रेवर वृत्तपत्र टाकून ती झाकून ठेवावी. हा कागद मातीला अगदी चिकटवून ठेवावा आणि दोन-तीन दिवसांनी काढून टाकावा. तेवढय़ा कालावधीत बीज अंकुरते. आता पाणी देताना एक लिटर पाण्यात एक छोटा चमचा ड्रायकोडर्मा पावडर (जैविक बुरशी) मिसळावी. त्यामुळे मातीतील हानीकारक बुरशी नियंत्रणात राहते. सर्वच झाडांना महिन्यातून एकदा ड्रायकोडर्मा पावडर द्यावी. पाणी कधीही जास्त देऊ नये. त्यामुळे रोपे मरण्याची शक्यता असते. नंतर चार-पाच दिवसांनी एक चमचा आंबट ताक एक लिटर पाण्यात मिसळून ते पाणी रोपांवर शिंपडावे किंवा स्प्रेने फवारावे. त्यामुळे रोपे कणखर होतात. त्यानंतर ४-५ दिवसांनी एक चमचाभर कच्चे दूध एक लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे रोपात विषाणू प्रतिकारक क्षमता निर्माण होते. रोपे तीन-चार आठवडय़ांची झाली की त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे मातीबाहेर काढण्याच्या आदल्या दिवशी भरपूर पाणी द्यावे, म्हणजे रोपे सहज मुळासकट बाहेर येतात. रोपे हाताने उपटून काढू नयेत. काटय़ा-चमच्याने मुळांलगतच्या मातीसहित रोपे अलगद काढावीत. ज्या कुंडीत लागवड करायची आहे, त्यात ठेवून माती अलगद दाबावी. त्यानंतर हलकेच पाणी द्यावे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 3:39 am