स्मार्टफोनने आपल्याला एकमेकांशी घट्ट जोडले आहे. इंटरनेट, फोनकॉल, मेसेज, चॅटिंग, ब्लूटुथ अशा वेगवेगळय़ा माध्यमांतून स्मार्टफोनधारक एकमेकांशी जोडले जातात. मात्र, या दुव्यांच्या भाऊगर्दीत मोबइलमधील तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा दुवा गेल्या दशकभरापासून कार्यरत असूनही दुर्लक्षित आहे. तो म्हणजे ‘एनएफसी’ अर्थात ‘नीअर फील्ड कम्युनिकेशन’.

दोन स्मार्टफोनधारकांना एकमेकांशी फोटो, कॉन्टॅक्ट किंवा एखादी डॉक्युमेंट फाइल शेअर करायची असेल तर व्हॉट्सअ‍ॅपपासून ईमेलपर्यंत आणि ब्लूटुथपासून शेअरइटपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, याहूनही सहज सोपा शेअरिंगचा पर्याय ‘एनएफसी’च्या माध्यमातून उपलब्ध होतो. परंतु, याबाबत फारच कमी जणांना माहिती असते. ‘नीअर फील्ड कम्युनिकेशन’(एनएफसी) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन फोन एकमेकांच्या अगदी जवळ आणताच शेअरिंग करणे शक्य होते. सर्वसाधारणपणे एकमेकांपासून चार सेमीच्या अंतरावर असलेल्या दोन फोनमध्ये कोणत्याही प्रकारची जोडणी न करता तुम्ही असे शेअरिंग करू शकता.

विशेष म्हणजे, ‘एनएफसी’चा वापर करण्यासाठी तुम्हाला वायफाय, ब्लुटुथ, इंटरनेट किंवा कोणत्याही वायरचीही आवश्यकता नसते. ‘ब्लुटुथ’मध्ये तुम्ही जेव्हा एकमेकांना जोडले जाता तेव्हा त्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करावीच लागते. परंतु, ‘एनएफसी’मध्ये त्या प्रक्रियेचीही गरज नसते. केवळ तुमच्या आणि समोरच्या फोनमध्ये ‘एनएफसी’ तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. ‘एनएफसी’ तंत्रज्ञान गेल्या दशकभरापासून अस्तित्वात असले तरी फारच कमी स्मार्टफोनमध्ये त्याचा अंतर्भाव होत होता. मात्र, आता जवळपास प्रत्येक फोनमध्ये ‘एनएफसी’ उपलब्ध आहे.

आपल्या मोबाइलमध्ये ‘एनएफसी’ आहे की नाही, हे पाहण्यासाठी स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा. तेथे ‘वायरलेस अ‍ॅण्ड नेटवर्क्‍स’ हा पर्याय निवडा. तेथे ‘एनएफसी’ या नावाने पर्याय असेल. तो पर्याय तुम्हाला सक्रिय करावा लागेल. तुमच्या मोबाइलच्या नोटिफिकेशन बारमध्येही तुम्हाला ‘एनएफसी’चा इंग्रजी ‘एन’ आकाराचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करूनही तुम्ही ‘एनएफसी’ सुरू करू शकता.

आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त

‘एनएफसी’ तंत्रज्ञानाचा आजघडीला सर्वाधिक वापर मोबाइल पेमेंटसाठी होऊ शकतो. सध्या स्मार्टफोनवर अनेक पेमेंट अ‍ॅप्स उपलब्ध असून प्रत्येक जण यातल्या कोणत्या ना कोणत्या अ‍ॅपचा वापर करून खरेदी वा पैसे पाठवत असतात. ‘एनएफसी’च्या साह्याने तुम्ही केवळ फोन जवळ नेऊन आर्थिक व्यवहार करू शकता. एनएफसी तंत्रज्ञानामध्ये ठरावीक अंतरावरून एनएफसी असलेला मोबाइल फिरवून क्रेडिट/डेबिट कार्डसारखेच पेमेंट भरता येते. मोबाइल ‘स्वाइप’ करण्यासाठी एक वेगळे यंत्र असते. हे यंत्र अलिकडे सर्वच दुकानांत उपलब्ध असते. या यंत्रात ‘एनएफसी’युक्त मोबाइल ‘रीड’ होतो. त्यामुळे एखाद्या दुकानात कार्डद्वारे पेमेंट करण्याऐवजी तुम्ही केवळ मोबाइल ‘स्वाइप’ करून पैसे भरू शकता.

लेखक : प्रा. योगेश हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)