२१व्या शतकातील दुसऱ्या दशकाच्या शेवटाकडे वाटचाल करत असताना भारतात होणारी तंत्रज्ञान प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. या दशकाच्या सुरुवातीला तुरळकपणे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणारे भारतीय आता मोठय़ा संख्येने ‘स्मार्ट’ उपकरणांवर भर द्यायला लागले आहेत. फोन, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही किंवा अन्य गॅझेटप्रमाणे आता ‘स्मार्ट होम’ ही संकल्पना भारतात रूढ होऊ लागली आहे. या तंत्रज्ञानाचा भारतीय दृष्टिकोनातून घेतलेला आढावा..

स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस पटीने वाढ होत आहे. आज भारत देशातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्ट फोन बाजारपेठ बनला आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढत आहे. इंटरनेटचा वापर सेवासुविधांकरिता होऊ लागला आहे. डिजिटल क्रांतीचे अनुकरणीय उदाहरण म्हणून भारताचे नाव घेतले जात आहे. मात्र तंत्रज्ञानातील ही प्रगती इथपर्यंतच सीमित राहिलेली नाही. परदेशात आता माणसांप्रमाणे त्यांची घरेही स्मार्ट झाली आहेत. घरातील बहुतांश वस्तू वा उपकरणे इंटरनेट किंवा ‘कृत्रिम प्रज्ञे’ने (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) कार्यरत झाली आहेत. अशा वेळी भारतही फारसा मागे नाही. अनेक भारतीय घरांत स्मार्ट उपकरणे दैनंदिन जीवनाचा घटक बनवू लागली आहेत. कॉपरेरेट जगतातील असामींपासून अगदी रिक्षाचालकापर्यंत प्रत्येक जण ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाला आपलेसे करत आहे.

तंत्रज्ञानाशी अधिक जवळीक साधण्याचा हा दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. व्यापक नेटवर्कच्या साह्य़ाने एकमेकांना जोडून घेण्याची क्षमता असलेली डिजिटल साधने म्हणजे स्मार्ट उपकरणे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’ तंत्रज्ञानावर आधारित ही उपकरणे केवळ माहितीचे वहन करत नाहीत तर, एकमेकांशी संवादही साधतात आणि आपले कामही चोख बजावतात. अशी उपकरणे ‘स्मार्ट’ घरांचे आधारस्तंभ असतात. स्मार्टफोन, टॅब, संगणक, लॅपटॉप यांच्या मदतीने आपण ही उपकरणे बसल्या जागी किंवा घरापासून दूर असतानाही नियंत्रित करू शकतो. आता तर, ‘व्हर्च्युअल होम असिस्टंट’ ही उपकरणे नियंत्रित करण्याचेही काम करत आहेत.

संपूर्णपणे सुसज्ज, अद्ययावत स्मार्ट घर ही आता भारतातील दूरचे वास्तव राहिलेले नाही. अनेक तंत्रस्नेही भारतीयांच्या घरांत ‘आयओटी’ तंत्रज्ञानाच्या मदतीने घरातील विविध उपकरणे संचलित करत आहेत. त्यात दरवाजासाठी ‘स्मार्ट डोअर लॉक’, विद्युत उपकरणे, होम असिस्टंट, होम क्लिनिंग अशा अनेक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. आधुनिक भारतीयाच्या रोजच्या जीवनशैलीला अनुसरून स्मार्ट उपकरणे आज त्यांच्या आयुष्यात सोय आणि आरामशीर सुविधा पुरवत आहे. तुम्ही जर कधी घर साफ करण्याचे काम केलेले असेल तर कोचाच्या खालचा पोहोचता न येणारा डाग पुसणे किती कठीण असते हे तुम्हाला बरोबर ठाऊक असेल. या आव्हानाचा मुकाबला उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा भारतीय ग्राहक स्मार्ट रोबो व्हॅक्युम क्लीनरच्या मदतीने करतो. वायफायने जोडलेल्या या स्मार्ट उपकरणांना तुमच्या घराची लांबी-रुंदी माहीत असते. विविधस्तरीय सक्षम स्वच्छता यंत्रणा त्यांच्यामध्ये बसवलेली असते आणि योग्य दिशादर्शन तंत्रज्ञानही अद्ययावत असते. त्यांच्यामध्ये अत्याधुनिक ऑप्टिकल आणि ‘अकोस्टिक सेन्सर्स’ बसवलेले असतात. त्यामुळे धूळ, मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या अगदी १० मायक्रॉनपेक्षा बारीक गोष्टी, कचरा, अ‍ॅलर्जी निर्माण करणारे पदार्थ ते ओळखू शकतात. सर्वाधिक आव्हानात्मक फरशी पुसणे, लाकडी फर्निचर, प्रवेशद्वार या गोष्टी स्वच्छ पुसल्या जातात. काही वैशिष्टय़पूर्ण उपकरणांमध्ये भिंती आणि दाराचे कोपरे साफ करण्यासाठी वेगळे ब्रशही असतात. रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर सतत क्लिनिंग अहवाल वापर करणाऱ्यांना देतो. त्यांना सहजपणे दिशादर्शन करता येऊ  शकते. त्यामुळे त्यांच्या वाटेत मध्ये येणारे फर्निचर, पायऱ्या यांना ते धडकत नाहीत. आणि त्यांच्या बाजूने, खालून सफाईचे काम कुठेही करू शकतात.

इतर लोकप्रिय स्मार्ट होम उपकरणांमध्ये स्मार्ट डोअर लॉक्स, स्मार्ट एसी, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फ्रीज आणि अशा इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो. पण जेव्हा तुमच्या घरामध्ये संपूर्ण स्मार्ट उपकरणांची यंत्रणा असते तेव्हा तुम्ही ते सगळे नियंत्रित कसे करणार? अर्थातच, तुमचा स्मार्ट फोन वापरून. पण तरीही ते थोडेसे त्रासदायकच नाही का? म्हणजे बघा तुमचा स्मार्ट फोन बऱ्याचदा तुमच्या पलंगापासून, स्वयंपाकघरापासून, अभ्यासिकेपासून लांब असतो. किंवा ज्या सोफ्यावर तुम्ही आरामात बसलेले असता त्याच्या कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो. मग त्या स्मार्ट फोनवरून उपकरण सुरू कसे करणार? पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सासारखे व्हर्च्युअल होम असिस्टंट तुमचे हे कामही पूर्ण करतात. ‘अ‍ॅलेक्सा, मी ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडल्यावर दिवे बंद कर आणि सगळे घर स्वच्छ करून ठेव,’ अशी केवळ तोंडी सूचना देऊन तुम्ही ही कामे करून घेऊ शकता. तुम्ही बाहेर पडल्यावर तुमचे स्मार्ट लॉक लागलेले त्याला कळते आणि ते तुमच्या सूचनांचे पालन करते. तुमचा दूरवरचा सहकारी म्हणून हे उपकरण कार्यरत राहते आणि तुमच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाते.

जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आता आपल्याला तंत्रज्ञान हवेहवेसे वाटत आहे. यातील सगळ्याच नाही तरी बऱ्याचशा गोष्टींत तंत्रज्ञानाने आपल्याला मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपले कामाचे ओझे कमी झाले आहेच, पण एका वेळी अनेक कामे करण्याची सुविधाही आपल्याला मिळाली आहे.

– पुलक सतीश कुमार

(लेखक प्योरसाइट सिस्टीम्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)