25 April 2019

News Flash

जीवन रक्षक

तरुणांच्या वागण्या बोलण्यात सामाजिक जाणिवा दिसून येत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पाटर्य़ा, पब्ज यामध्ये गुंतणारी, कोणत्याही गोष्टीचे फारसे गांभीर्य नसणारी.. अशा प्रकारची ओरड तरुण पिढीविषयी होत असते. मात्र आता काळ बदलत चालला आहे. तरुणांच्या वागण्या बोलण्यात सामाजिक जाणिवा दिसून येत आहेत. त्याचे अनेक दाखलेही मिळू लागले आहेत. स्वत:चे करिअर सांभाळून काही तरुण संकटात सापडलेल्या निराधारांना मदत करण्यात गुंतलेत. कुणी स्वत:चा पॉकेटमनी खर्च करतोय, तर कुणी अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी निधी संकलीत करीत आहेत. नुकत्याच झालेल्या केरळच्या प्रलयात त्याचा अनुभव आला. अनेक हात या ठिकाणी मदत करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्या कामाची अक्षय मांडवकर यांनी घेतलेली दखल..

डोंगरदऱ्यांमधील बचाव कार्य

पनवेल येथील ‘निसर्गमित्र पनवेल’ ही संस्था गेली ३३ वर्षे गिर्यारोहणाच्या सहलींचे आयोजन करते. विश्वेश महाजन हा तरुण या संस्थेचा सदस्य आहे. भटकंतीसाठी उत्सुक असणाऱ्या भटक्यांसाठी डोंगरदऱ्यांमध्ये सहलींचे आयोजन करणे, हे या संस्थेचे मुख्य काम. मात्र डोंगरदऱ्यांमध्ये गिर्यारोहण करत असताना निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी या संस्थेच्या सदस्यांनी बचाव कार्याची सुरुवात केली. नवखे गिर्यारोहक वाट चुकतात वा काही जण दऱ्यांमध्ये अडकले जातात, अशा परिस्थितीत ‘निसर्गमित्र’ कार्यकर्ते कोणत्याही मानधनाशिवाय त्यांची मदत करतात. अनेकदा डोंगरदऱ्यांमध्ये पडून मृत पावलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम आणि धबधब्यांच्या ठिकाणी अडकून राहिलेल्या पर्यटकांच्या बचावाचे कामही या संस्थेतील तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने केले जाते. धबधबा, नदी आणि ओहोळ अशा ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचे काम सोपे असते. मात्र डोंगरकपाऱ्यांमधील बचाव कार्य करताना मोठी जोखीम उचलावी लागते. १६ ऑगस्टला संस्थेतील दहा तरुण कार्यकर्त्यांनी पनवेल येथील बडी कुंडीतील धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्याचे जिकिरीचे काम केले.

केरळ पूरग्रस्तांना मदत

मुंबईच्या नागरी समस्यांवर काम करणाऱ्या ‘म्यूस’ या संस्थेतील तरुण कार्यकर्त्यांनी नुकतीच केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली. यावेळी मुंबईकरांनी सढळ हस्ते केलेल्या मदतीबरोबरीनेच घरातील नकोशा झालेल्या वस्तू पूरग्रस्तांसाठी दान केल्याची बाब या तरुणांच्या लक्षात आली. बंगळूरु आणि कोची येथील एका संस्थेशी समन्वय साधून ‘म्यूस’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतून सुमारे १८ टन आवश्यक असणारे साहित्य केरळला पाठविले. औषधे, रेडी फूड, डायपर अशा काही सामानाची यादी केरळमध्ये काम करणाऱ्या संस्थेकडून आम्हाला मिळाल्याची माहिती निशांत बंगेरा याने दिली. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रात १८ संकलन केंद्रे निर्माण करून या वस्तू गोळा करण्यात आल्या. १८ टनापैकी १५ टनाचे साहित्य हे महाराष्ट्र शासनाने पाठविलेल्या साहित्याच्या बरोबर पाठविण्यात आले. तसेच उर्वरित साहित्य हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे पाठविण्यात आले. मात्र गोळा करण्यात आलेल्या साहित्यापैकी किमान एक टन साहित्य हे उपयोगात न येण्याच्या परिस्थितीत असल्याचे निशांत याने सांगितले. मदत केलेल्या कित्येक मुंबईकरांनी जुनी अंतर्वस्त्रे, वापरलेले टूथब्रश, फाटलेले कपडे दिले होते. त्यामुळे मदत करताना नेमक्या कोणत्या भावनेने मदत करत आहोत, याची जाणीव ठेवणेही आवश्यक असल्याचे मत निशांत याने व्यक्त केले.

‘गार्ड ऑफ लाइफ’

ग्रँट रोड येथे राहणारा विशाल चव्हाण हा तरुण मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकाचे काम करतो. लहानपणापासून पोहण्याची आवड असणाऱ्या विशालने जलतरणाचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने जलतरणाचे शिक्षण देणाऱ्या आणि सागरी खेळांचे आयोजन करणाऱ्या एका खासगी संस्थेत काम केले. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक सेल्फी घेताना वा फेरफटका मारताना समुद्रात बुडतात. या पर्यटकांना वाचविण्याचे काम विशाल करतो. सध्या विशाल पालिकेच्या जीवरक्षकांच्या गटामध्ये गिरगाव चौपाटीवर कार्यरत आहे. गिरगाव चौपाटी विस्तृत असल्याने पर्यटक बुडण्याचे प्रमाण फार कमी असल्याचे सांगतो. मात्र जुहू यासारख्या लांबीने मोठय़ा परंतु अरुंद असलेल्या चौपाटीवर पर्यटक बुडण्याचे प्रमाण जास्त आहे. जुहूसारख्या चौपाटीवर भरतीच्या वेळी रस्त्यावर पाणी येते. शिवाय शाळेतून सुटल्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेली अनेक मुले येथील समुद्रात अपघाताने बुडतात. अशा परिस्थितीत लोकांवर नजर ठेवून बुडालेल्यांना बाहेर काढण्याचे काम करावे लागत असल्याचे विशाल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गिरगाव चौपाटीवर ब्लू बॉटल या विषारी जेलीफिशचा दंश झालेल्या नागरिकांवर प्रथमोपचार करण्याचे काम विशालने केले. लाइफ गार्ड असे म्हणवून न घेता गार्ड ऑफ लाइफ असे म्हणवून घेण्यास विशाल अधिक पसंती देतो.

First Published on August 29, 2018 3:50 am

Web Title: article about life guard