किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी.. काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी.. आजवर अनेक दर्यावर्दीना वाट दाखवणाऱ्या दीपगृहांचे कुसुमाग्रजांनी अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. जीपीएसमुळे सागरी प्रवास आता सुकर झाला असला तरीही त्याआधी वर्षांनुवर्षे ऊन, वारा, पावसात, उधाणलेल्या सागराला सामोरे जात, पाय रोवून आल्या-गेल्या जाहजांना मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ पाहणे, त्यांची कार्यपद्धती जाणून घेणे हा अनोखा अनुभव ठरतो. कोकण किनारपट्टीवरील भटकंतीदरम्यान या दीपगृहांना भेट द्यायलाच हवी..

एकविसावे शतक हे पर्यटनाचे शतक मानले जाते. जगभरच्या पर्यटनाला वेगवेगळे आयाम मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. पर्यटनामुळे अनेकविध क्षेत्रे विकसित होत आहेत. नुसत्या महाराष्ट्राचा विचार केला तरीसुद्धा धार्मिक पर्यटन, किल्ले पर्यटन, वारसा पर्यटन, साहसी पर्यटन असे विविध पैलू विकसित होताना दिसतात. महाराष्ट्रात समुद्र म्हटले की ओघानेच कोकण प्रांत डोळ्यासमोर येतो. सागरी महामार्ग, कोकण रेल्वे, कोकणातल्या सडय़ावर दिसणारी कातळ खोद-चित्रे, सुंदर समुद्रकिनारे आणि तिथे होणारे साहसी खेळ यामुळे कोकणात पर्यटनाच्या विविध संधी आणि सुविधा निर्माण झालेल्या आहेत.

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

कोकणच्या पर्यटनाचा अजून एक आयाम विकसित होऊ  शकतो तो म्हणजे कोकणात असलेल्या दीपगृहांचे पर्यटन. समुद्रामुळे अगदी प्राचीन काळापासून कोकणात विविध लहान-मोठी बंदरे निर्माण झाली. त्याद्वारे मोठय़ा प्रमाणात व्यापार होत असे. बंदरांमुळे दीपगृहांची निर्मितीसुद्धा अनिवार्य होती. समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी ही दीपगृहे बांधली गेली. ही दीपगृहे कायम पर्यटकांच्या दृष्टीने लांबच राहिली. कदाचित पूर्वी काटेकोर नियमांमुळे यांचे दर्शन फक्त लांबूनच होत असेल. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. ही दीपगृहे सर्वसामान्य लोकांना ठरावीक वेळेत पाहता येतात. अगदी आतमध्ये वपर्यंत जाऊन पाहता येतात. त्यांचे कामकाज असे चालते हेदेखील आपल्याला सांगितले जाते.

रत्नागिरी हे कोकणातील देखणे गाव आता पर्यटनाच्या नकाशावर अगदी ठसठशीतपणे उठून दिसते. रत्नदुर्ग, आजूबाजूचे देखणे समुद्रकिनारे, हापूस आंबा, स्कूबा डायव्हिंगसारखे साहसी खेळ यासाठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरीला भेट दिल्यावर तेथील दीपगृह अवश्य पाहावे. इ.स. १८६७ साली इंग्रजांनी या दीपगृहाची निर्मिती केली. याची उंची ९० फूट असून त्यावर १२ फुटांचा दिव्याचा प्रकाश पाडणारा मनोरा आहे. संध्याकाळी ४ ते ५ या वेळातच हे दीपगृह सर्वसामान्यांना पाहता येते. प्रवेश फी १० रुपये आणि कॅमेरासाठी २० रुपये आकारले जातात. काळ्या आणि पांढऱ्या आडव्या पट्टय़ांनी रंगवलेला हा मनोरा. याच्यावर जी दिव्याची बत्ती असते तिच्या डोक्यावर केशरी रंगाचीच टोपी असली पाहिजे असे संकेत आहेत. मनोऱ्यांची रंगसंगतीसुद्धा ठरलेली असते. काळा, पांढरा आणि केशरी हे रंगच प्रामुख्याने दीपगृहासाठी वापरले जातात. क्वचितप्रसंगी पूर्ण पांढरे दीपगृह पाहायला मिळते. या रंगसंगतीमुळे समुद्रात दूरवरूनही दीपगृह ओळखता येते. रात्री या दीपगृहातून लांबवर पडणारा प्रकाशाचा झोत फारच आकर्षक दिसतो. त्यासाठी फक्त १५० वॅटचे २ दिवे काम करतात. परंतु त्यांच्या चारही बाजूंनी लावलेल्या काचेच्या लोलकामुळे (ग्लास प्रीझम्स) प्रकाशाचा झोत तयार होतो आणि तो २५ ते ३० कि.मी. इतका लांबवर पडतो. रत्नागिरीच्या दीपगृहातून दर १० सेकंदांनी २ वेळा याचे आवर्तन होते. ही आवर्तने जागतिक नियमांनुसार ठरलेली असतात. अशा प्रत्येक दीपगृहातून पडणाऱ्या प्रकाशझोताची आवर्तने ठरलेली असतात. जहाजांवरील कर्मचाऱ्यांकडे या आवर्तनांचा तक्ता असतो. त्यावरून आपण सध्या कुठल्या बंदराच्या जवळून प्रवास करतो आहोत याचे ज्ञान दर्यावर्दी मंडळींना होते.

रत्नागिरीतील दीपगृहाप्रमाणेच जयगड इथे असलेले दीपगृहही देखणे आहे. त्याचा रंग पांढरा आणि लाल अशा पट्टय़ांचा आहे. त्यावर असलेली टोपी मात्र केशरी रंगाचीच आहे. अंदमान-निकोबार बेटांवर तब्बल २८ दीपगृहे आहेत.

जीपीएससारख्या अत्याधुनिक संपर्कयंत्रणा आता अस्तित्वात आल्या आहेत, मात्र या यंत्रणांचा शोध लागण्यापूर्वी या दीपगृहांनीच दर्यावर्दीना वाट दाखवली आहे. आपले पाय जमिनीवर रोवून वर्षांनुवर्षे दिशा दाखवणाऱ्या दीपगृहांचे पर्यटन आपल्या कोकण भेटीत अवश्य करावे.

कार्यप्रणाली

रात्री किती वाजता ही दीपगृहे कार्यरत होणार आणि सकाळी किती वाजता बंद होणार याचे प्रत्येक महिन्याचे वेळापत्रक ठरलेले असते. एकही दिवस सुट्टी न घेता वर्षांनुवर्षे ही दीपगृहे कार्यरत असतात. वीजपुरवठा बंद झाला तर डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि शिवाय सौरऊर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या अशी सर्व चोख व्यवस्था इथे असते. या दीपगृहांची सर्व माहिती देण्यासाठी एखाद्या व्यक्तीची इथे नेमणूक केलेली असते. गावापासून दूर एका टोकाला असलेल्या आणि सर्वसामान्य माणसांपासून अगदी लांब असलेल्या या दीपगृहात काम करणाऱ्यांच्या व्यथासुद्धा आपल्याला इथे ऐकायला मिळतात. ऊन, वारा, पाऊस कितीही असला तरी दीपगृहाच्या कामकाजात कधीही खंड पडत नाही.

महाराष्ट्रातील दीपगृहे

देवगड, माडबन/जैतापूर, मुसाकाझी, वेंगुर्ला, जयगड, दाभोळ, वेंगुर्ला (इथे दोन आहेत : एक वेंगुर्ला पॉइंट आणि दुसरे बान्र्ट आयलंड, मालवण, आचरा, कोर्लई, हर्णे, चौल, अलिबाग, कान्होजी आंग्रे दीपगृह (खांदेरी किल्ला.)

गोवा

अग्वाद किल्ला, रेष मागोस, पणजी आणि मडगाव.

ashutosh.treks@gmail.com