नमिता धुरी

नाटय़ाच्या प्रत्येक रंगात रंगण्याची संधी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील  कलासाधकांना मिळते. रंग, वेशभूषा, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजनेचा नवा आविष्कार या अवकाशात पाहायला मिळतो.

नाटक म्हणजे अभिनय असा सर्वसाधारण समज असतो. पण असेही काही असतात ज्यांना अभिनयापेक्षाही इतर कामे करण्यात अधिक रस असतो. एखादे पात्र जिवंत वाटावे यासाठी नट त्यात जीव ओततो. पण ते पात्र उठून दिसावे यासाठी रंगभूषाकार अभिनेत्याच्या चेहऱ्यावर रंगकाम करतो. महाविद्यालयीन एकांकिका करताना व्यावसायिक रंगभूषाकार परवडत नाहीत. मग विद्यार्थ्यांमधूनच रंगभूषाकार जाणीवपूर्वक घडवले जातात किंवा कधी कधी ते आपसूकच येतात. एखादे पात्र कसे घडत आहे, त्याच्या मनात काय संवेदना आहेत, मग त्याच्या चेहऱ्यावर कसे भाव उमटतील त्यानुसार रंगभूषा गडद करायची की फिकट याचा निर्णय घेतला जातो. रंगभूषा केली म्हणजे त्यांचे काम संपत नाही. प्रयोग संपल्यानंतर चेहऱ्याचे रंग काढण्यासाठी कलाकारांना मदतही करावी लागते.

वेशभूषाकारही आम्हीच..

वेशभूषाकारांचेही काम असेच असते. एखाद्या अभिनेत्याचे पूर्ण निरीक्षण करून, त्याच्या पात्राचा अभ्यास करून वेशभूषा ठरवली जाते. एकांकिकेचा विषय समजून घ्यावा लागतो. विषय ज्या काळातला आहे त्या काळाचा अभ्यास वेशभूषाकार करतात. त्या प्रकारचे सिनेमे, त्यांचा पेहेराव यांच्यावर चर्चा केली जाते. वेशभूषा अशी निवडायची असते जी त्या पात्राला शोभूनही दिसेल आणि कलाकाराला रंगमंचावर वावरताना त्रासही होणार नाही. याशिवाय काही सेकंदाच्या ब्लॅकआऊटमध्ये वेशभूषा बदलावी लागते. या वेळी विंगेत काळोख असतो. त्यामुळे वेशभूषा सोपी, आकर्षक, योग्य, आरामदायी अशीच असावी लागते. काहीवेळा कलाकारांकडून कपडे जमवले जातात, काहीवेळा विकत वा भाडय़ाने आणले जातात. पण हे सगळे कमीत कमी खर्चात भागवता येईल याची काळजी घेतली जाते.

प्रसंगलक्ष्यी नेपथ्य

नाटकाची वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी नेपथ्यकारांवर असते. संहिता वाचन झाल्यापासूनच नेपथ्यकारांच्या डोक्यात चक्रे फिरू लागतात. काहीवेळा पूर्ण फ्लेक्स लावले जातात, तर काहीवेळा फक्त लाकडी चौकटी उभ्या केल्या जातात. कलाकारांच्या घरून साहित्य आणण्यावर पहिला भर असतो, जेणेकरून खर्च कमीत कमी व्हावा. एकांकिकेतील पात्रांचा स्वभाव कसा आहे, त्यानुसारही नेपथ्य ठरते. एखादे पात्र फारच सर्जनशील वृत्तीचे असेल तर त्याच्या घराच्या भिंतींमधून ती सर्जनशीलता उमटावी असेच नेपथ्य उभे केले जाते. एखादे पात्र मानसिक रुग्ण, उदास किंवा स्वत:त हरवले असेल, त्याचे स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याचे घर अस्ताव्यस्त दाखवले जाते. काहीवेळा नेपथ्य स्थिर असते. पण काहीवेळा प्रसंगानुरूप बदलावे लागते. मग अशा वेळी नेपथ्य फार गुंतागुंतीचे होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ते वजनाने हलके आकाराने शक्य तितके लहान, सहज हलवता येण्याजोगे आणि प्रसंगाची गरज भागवेल असे असावे याची काळजी या सगळ्याचा विचार करून नेपथ्यकार घडत असतो.

देशी-पाश्चिमात्य वाद्यांचा मेळ

एकांकिकेचे संगीत ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक हाताळावी लागते. यातून विषयाचा खरा भाव प्रकट होतो. बऱ्याचदा संगीतकार हे शेवटच्या क्षणी कामाला सुरुवात करतात, तर काही संगीतकार मात्र पहिल्या तालमीपासून अभ्यास करायला सुरुवात करतात. प्रत्येक प्रसंगाला अनुरूप असेच संगीत निवडावे लागते, काहीवेळा तयार करावे लागते. संगीतकार व्हायचे असेल तर वर्षभर विविध प्रकारचे संगीत ऐकावे लागते, तेव्हा कुठे एका एकांकिकेचे संगीत तयार होते. काहीवेळा विषयाच्या गरजेनुसार गाणी स्वत: लिहिली जातात, त्यांना चाल दिली जाते. यासाठी पारंपरिक आणि पाश्चिमात्य अशा विविध वाद्यांचाही वापर के ला जातो. एकांकिकेचा विषय ज्या सिनेमात हाताळला गेला असेल त्यातील संगीत, एकांकिकेत दाखवली जाणारी दृश्ये ज्या ठिकाणी दाखवली जातात त्या ठिकाणी आजूबाजूला असणारा गोंधळ, त्यातून निर्माण होणारे आवाज या सगळ्याचा अभ्यास करून संगीतकार एकांकिकेचे अंतिम संगीत तयार करतो.

प्रकाशयोजनेचे कसब गवसते

एकांकिकेचे नेपथ्य रंगमंचावर लागण्यापूर्वी प्रकाशयोजना केली जाते. पण त्यासाठी आधी तालमीला हजर राहून पूर्ण एकांकिका पाहावी लागते. कोणते पात्र कुठे उभे राहणार आहे, प्रसंग काय आहे, कोणत्या कलाकारावर लक्ष वेधून घ्यायचे आहे यानुसार प्रकाशयोजना केली जाते. आयत्या वेळी प्रकाशयोजना चुकली तर कलाकार अंधारात जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव प्रेक्षकांना दिसत नाहीत.

कष्टाचे फळ मिळेल..

लोकसत्ता लोकांकिकाच्या मंचावर अशा तरुणांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. लोकांकिकाची महाअंतिम फेरी १५ डिसेंबरला मुंबईत पार पडणार आहे. या व्यासपीठावर प्रत्येक तरुण निश्चितच कला सादर करून दाखवणार आहेत. त्यांच्या कष्टाला यानिमित्ताने नक्कीच फळ मिळणार आहे.

एखादे पात्र कोणत्या काळातील आहे याचा आम्ही अभ्यास करतो. त्या काळातील सिनेमे पाहतो. त्यातील पात्रांच्या पोशाखाचे निरीक्षण करतो. त्यानुसार रेखाचित्र तयार करतो. मी स्वत: कॉस्च्युम डिझाइनचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे काही ओळखीचे टेलर असतात. त्यांच्याकडून आम्ही कपडे शिवून घेतो. काहीवेळा कलाकार स्वत:च्या घरून कपडे आणतात.

– सृष्टी अवधूतकर, वेशभूषाकार, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे</p>

एखादे संगीत तयार करताना प्रसंगातील भाव समजून घेण्याचा प्रयत्न करतो. लॅपटॉपने संगीत देण्यापेक्षा लाइव्ह म्युझिक मला जास्त आवडते. यासाठी आम्ही विविध वाद्यांचा वापर करतो. प्रसंग उठावदार करण्यासाठी संगीताची मदत होते. एखादे संगीत तयार केल्यावर त्यावर आम्ही संवाद म्हणून बघतो, मगच एकांकिकेला संगीत दिले जाते.

– इशान चौधरी, संगीतकार, श्री संत गजानन महाराज महाविद्यालय, वर्धा</p>

समूहभावना

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेऱ्या महाराष्ट्राच्या केंद्रांवर सुरू आहेत. काही केंद्रावर विभागीय स्तरावर सुरू आहेत. यानंतर सुरू होईल महाअंतिम फेरीसाठीची धडपड. आता उत्सुकता आहे ती महाअंतिम फेरीची. पहिल्या फेरीत जिंकलेल्या आणि काही गुणांच्या फरकांमुळे अंतिम फेरीत दाखल होत नसलेल्या सर्वच एकांकिकांमध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे समूहाने एकत्र काम करणे.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.