मायक्रोसॉफ्टचा ‘सरफेस प्रो’ हा लॅपटॉप आहे, टॅब्लेट आहे, चित्रकाराचं ‘ड्राइंग पॅड’ आहे आणि एखाद्या लेखकाचं ‘नोटबुक’ही आहे. लॅपटॉपच्या संपूर्ण क्षमतांचे प्रत्यंतर देणारा ‘सरफेस प्रो’ हातात घेतल्यानंतर त्याची एकेक रूपे अशी उलगडत जातात. वापरकर्त्यांना संपूर्ण समाधान देणारा लॅपटॉप असे याचे वर्णन करता येईल. पण चांगल्या गोष्टीसाठी किंमतही मोठी चुकवावी लागते. तेच ‘प्रो’च्या बाबतीत म्हणावे लागेल.

पाच वर्षांपूर्वी गुगल, अ‍ॅपल यांनी निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे चाचपडत असलेल्या मायक्रोसॉफ्टने पहिला ‘सरफेस’ लॅपटॉप बाजारात आणला तेव्हा त्याची दखल अवघ्या जगाने घेतली. लॅपटॉपमधील गुणवैशिष्टय़ांना वरच्या पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या ‘सरफेस’चे कौतुक झाले. पण मध्यंतरी मायक्रोसॉफ्टने या लॅपटॉपचे उत्पादन बंद केले आणि आता नवीन काय येणार याची प्रतीक्षा सारेच करू लागले. ‘सरफेस प्रो’ या प्रतीक्षेचे उत्तर आहे.

वेगवान कार्यप्रणाली, सहज हाताळणी, आकर्षक रूपडे, सोबत बाळगण्याइतका हलका ही आधीच्या ‘सरफेस’ची सर्व गुणवैशिष्टय़े ‘सरफेस प्रो’ आपल्यासोबत वारशाने घेऊन आला आहे. लॅपटॉप आणि टॅब्लेट अशा दोन्ही भूमिका सारख्याच ताकदीने सांभाळण्याची कुवत ‘सरफेस प्रो’मध्ये आहे.

डिझाइन

‘सरफेस प्रो’ पाहताक्षणी हा वेगळ्याच श्रेणीतील लॅपटॉप आहे, याची खात्री पटते. लॅपटॉपचे दिसणे त्याच्या कार्यकुशलतेइतकेच महत्त्वाचे आहे, याचा पुरेपूर विचार मायक्रोसॉफ्टने ‘सरफेस प्रो’च्या निर्मितीदरम्यान केला आहे. अतिशय हलक्या वजनाच्या पण मजबूत धातूने घडवलेली ‘बॉडी’ या लॅपटॉपला लाभली आहे. लॅपटॉपची पातळ किनार आणि वक्राकार कोपरे त्याचा प्रतिष्ठितपणा मिरवतात. नजरेपासूनच्या १६५ अंशांच्या कोनातूनही हा लॅपटॉप व्यवस्थितपणे पाहता येतो, त्यावरील क्रिया पार पाडता येतात. त्यामुळे एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवून हा लॅपटॉप हाताळताना त्याचा डिस्प्ले सुस्पष्ट दिसतो. टॅब्लेट स्क्रीन आणि कीबोर्ड अशा दोन भागांत हा लॅपटॉप विभागला गेला आहे. यांपैकी टॅब्लेटची जाडी अवघी ८.३ मिमी असून वजन साडेसातशे ग्रॅमच्या आसपास आहे. सध्या लॅपटॉप आणि टॅब्लेट अशी दुहेरी सुविधा देणारे अनेक लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ‘सरफेस प्रो’चा टॅब्लेट म्हणून वापर करताना हा लॅपटॉप आहे, याची अजिबात जाणीव होत नाही. याचा कीबोर्ड (टाइप कव्हर) साधारणपणे पाच मिमी जाडीचा आणि तीनशे ग्रॅम वजनाचा आहे. त्यामुळे एकूण लॅपटॉपही जेमतेम एक किलो वजनाचा असल्याने तो हाताळतानाही भार जाणवत नाही.

कामगिरी

‘सरफेस प्रो’ हा वेगवेगळ्या हार्डवेअर वैशिष्टय़ांमध्ये उपलब्ध आहे. इंटेल कोअर एम३पासून इंटेल कोअर आय७पर्यंतची प्रोसेसर श्रेणी, १२८ पासून ५१२ जीबी हार्डडिस्कपर्यंतची साठवण क्षमता, चार जीबी ते १६ जीबी रॅमपर्यंतची मेमरी आणि वेगवेगळी ग्राफिक्स कार्ड अशा सुसंगतीत ‘सरफेस प्रो’ पाच किंमत श्रेणीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, यातील कमीत कमी क्षमतेच्या गुणवैशिष्टय़ांसह हा लॅपटॉप अतिशय उत्तमपणे काम करतो. विशेष म्हणजे एम३ आणि आय५ प्रोसेसर असलेल्या लॅपटॉपमध्ये ‘फॅन’ बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे लॅपटॉपचा अजिबात आवाज होत नाही.

या लॅपटॉपचा स्क्रीन १२.३ इंचांचा असून त्याचे रेझोल्युशन अतिशय सुस्पष्ट आहे. ‘विंडोज १०’च्या संपूर्ण क्षमतांचा वापर करण्याची सुविधा हा स्क्रीन देतो. यातील ध्वनीयंत्रणाही डॉल्बी ऑडिओची असल्याने लॅपटॉप पातळ असला तरी त्यातील ध्वनीचा दर्जा उत्तम आहे. या लॅपटॉपमध्ये केवळ एकच यूएसबी ३.० पोर्ट देण्यात आला आहे. ही बाब सध्याच्या ‘कनेक्टिव्हिटी’च्या काळात काहीशी निराश करणारी आहे. या लॅपटॉपची बॅटरी चांगली असून ती व्हिडीओ प्लेबॅकवरही सलग १३.५ तास काम करून शकते, असा कंपनीचा दावा आहे. लॅपटॉपमध्ये मागील बाजूस आठ मेगापिक्सेलचा व पुढील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे.

किंमत

वरील सर्व गुणवैशिष्टय़े पाहत असताना, ‘सरफेस प्रो’ हा महागडा लॅपटॉप असेल, हे कुणीही सांगू शकेल. साधारण ६४९९९ रुपयांपासून १८२९९९ रुपयांपर्यंतच्या श्रेणीत ‘सरफेस प्रो’ मिळतो. भारतीय ग्राहकांसाठी लॅपटॉपकरिता इतके पैसे मोजण्याची तयारी कितपत असेल, याबद्दल शंकाच आहे. पण त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला या लॅपटॉपच्या टाइप कव्हर आणि पेनसाठी स्वतंत्र पैसे मोजावे लागतात. या लॅपटॉपचे ‘टाइप कव्हर’ १०,९९९ आणि १२,९९९ रुपये अशा दोन श्रेणीत उपलब्ध आहे. तर पेन ७,९९९ आणि माऊस ६,३९९ रुपयांना मिळतो. त्यामुळे अगदी प्राथमिक श्रेणीतील लॅपटॉप घ्यायचा झाला तरी त्याची किंमत साधारण ८० हजार रुपयांवर जाते. इतकी किंमत भारतीय ग्राहक मोजतील की नाही, हे येणारा काळच सांगेल. पण मोजलेल्या किमतीचे मूल्य देण्याची ताकद ‘सरफेस प्रो’मध्ये आहे, हे निश्चित.

आणखी काय?

या लॅपटॉपसोबत ‘सरफेस पेन’ देण्यात आले आहे. अर्थात या पेनसाठी स्वतंत्र किंमत मोजावी लागते, परंतु ‘सरफेस प्रो’च्या क्षमतांचा पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर हे ‘पेन’ आवश्यक आहे, असे म्हणावे लागेल. हे पेन केवळ चित्र काढण्यासाठीच नव्हे तर लिहिण्यासाठी, मिटवण्यासाठी, मजकूर संपादित करण्यासाठीही वापरता येते.

asif. bagwan@expressindia. Com