मकरंद जोशी

दर वर्षी ऑक्टोबर सरत आला आणि थंडीची चाहूल लागते आणि पक्षीमित्रांची पावलं हमखास परिसरातल्या तलावांकडे, खाडय़ांकडे, नदीकिनारी आणि जलाशयांकडे वळतात. दर आठवडय़ाला कोण कोण आलंय याची उजळणी समान आवडीच्या मित्रांबरोबर होऊ  लागते, कारण हा हिवाळी पाहुण्यांचा काळ असतो. हे पाहुणे तरी येतात कुठून? कुणी लडाखमधून, कुणी चीनमधून, कुणी मध्य युरोपातून तर कुणी उत्तर आशियातून. हे पाहुणे म्हणजेच दर वर्षी न चुकता ठरावीक ठिकाणी हजेरी लावणारे स्थलांतरित पक्षी.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

हजारो, लाखो मैलांचे अंतर न थकता, न चुकता कापून येणारे स्थलांतरित पक्षी निसर्गाच्या अचूकतेचं आणि नियमिततेचं जिवंत उदाहरणच आहेत. हिवाळा सुरू होण्याआधी शीत कटिबंधातील पक्ष्यांना स्थलांतराचे वेध लागतात. ऋतुचक्राचा फेरा फिरणार आहे हे त्यांना आपोआप कळतं आणि मग वारकरी ज्या भक्तिभावाने पंढरीची वाट चालतात त्याहून एकाग्रतेनं हे पक्षी उष्ण कटिबंधातील आपल्या हिवाळी निवासस्थानांच्या मार्गावर चालू लागतात, कारण इथे प्रश्न अस्तित्वाचा, जगण्याचा आणि नवी पिढी जन्माला घालण्याचा असतो.

दूरदेशांतून येणारे हे पाहुणे पक्षी अगदी बिनचूक आपल्या इच्छित ठिकाणापर्यंत येतात तरी कसे? (आपण गुगल मॅप वापरूनही रस्ता चुकवून दाखवतोच की!) या प्रवासात त्यांना नेमकी दिशा कशामुळे कळते या प्रश्नांची नेमकी उत्तरं आजही सापडलेली नाहीत. तसं तर १२ व्या शतकापासून पक्षी स्थलांतरांचा अभ्यास केला जात आहे. आता आधुनिक साधनांमुळे या अभ्यासातही अधिक नेमकेपणा आला आहे. पक्ष्यांच्या पायात कडी/वाळे अडकवून त्यांना ‘रिगिंग’ करण्यामुळे या पक्ष्यांच्या प्रवासाचा मार्ग कळू शकतो. भारतात हे काम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेतर्फे केले जाते.

स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांमधली विविधता थक्क करणारी आहे. धोबी म्हणजे वॅगटेलचे अनेक प्रकार, गळ्यावरचा निळा रंग मिरवणारा ब्लू थ्रोट, ब्लू चिक्ड बी इटर असे आकाराने जरा लहान पक्षी जसे उबदार वातावरणाच्या शोधात येतात तसेच आकाराने मोठे असलेले क्रौंचचे (क्रेन्स) अनेक प्रकार जसे कॉमन क्रेन, दिमॉइझल क्रेन, हिवाळ्यात विशिष्ट पाणथळींवर आलेले पाहायला मिळतात. स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांमध्ये सगळ्यात मोठा गट डक्स अर्थात बदक वर्गातील पक्ष्यांचा असतो असं म्हणता येईल. थापटय़ा म्हणजे नॉर्दर्न शॉवेलर, भिवई म्हणजे गार्गनी, चक्रवाक म्हणजे रुडी शेलडक, पट्टकादंब म्हणजे बार हेडेड गूज, चक्रांग म्हणजे कॉमन टील, गडवाल बदक, शाही चक्रवाक म्हणजे कॉमन शेलडक अशी अनेक प्रकारची बदके हिवाळ्यात भारतातील नद्या आणि जलाशयांचा आश्रय घेताना दिसतात.

हिवाळी पाहुण्यांमधील सर्वात लक्षवेधी म्हणजे अग्निपंख अर्थात फ्लेमिंगो. आपल्या पंखांवरची गुलाबी रेषा मिरवत उडणारे अग्निपंख म्हणजेच रोहित पक्षी कोणत्याही जलाशयावरचे ‘शो स्टॉपर’ ठरतात. थोरले फ्लेमिंगो अर्थात ग्रेटर फ्लेमिंगो आणि धाकले अर्थात लेसर फ्लेमिंगो यातील सर्वात सुंदर कोण दिसतं हे ठरवणं जरा कठीणच असतं, पण त्यांची कितीही छायाचित्रे टिपली, तरी मन भरत नाही हेच खरं. या शिवाय गल्सचे अनेक प्रकार, टर्न्‍सचे प्रकार, मोर शराटी म्हणजे ग्लॉसी आयबिस, सँडर्लिग, कल्र्यु सँडपायपर, लेसर सँड प्लोवर, युरेशियन कल्र्यु असे कितीतरी पाहुणे आपल्याकडे येतात.

पक्षीनिरीक्षकांची ‘तीर्थस्थाने’

* जगाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या या पाहुण्यांना भेटायचं कुठे? तर महाराष्ट्रातील पक्षीतीर्थ म्हणता येईल अशा कुंभारगावात. पुणे-सोलापूर रस्त्यावर उजनी धरणाच्या जलाशयाकाठी, भिगवणच्या जवळ. इथे नौकाविहार करत पक्षी बघण्याची, फोटो काढण्याची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. याखेरीज भुसावळजवळ जे हतनूर धरण आहे, त्याच्या जलाशयातही प्रचंड संख्येनं स्थलांतरीत पक्षी येतात. सोलापूरमधील हिप्परगा तलाव, होटगी तलाव तसेच पुण्याजवळचा वीर धरणाचा जलाशय, कवडी पाट या ठिकाणीही परदेशी पाहुणे पाहायला मिळतात.

*  नाशिकजवळचे नांदूर मधमेश्वर धरण, अलिबागपासून मालवणपर्यंतची किनारपट्टी, मुंबईतील विक्रोळी ते वाशीदरम्यानची खाडी, वसई-विरार परिसरातील जलाशय ही सारी ठिकाणे नोव्हेंबरपासून स्थलांतरित पाहुण्यांनी फुलून जातात. – अहमदाबादजवळचे नल सरोवरही या काळात पक्षी मित्रांना खूश करते. सकाळी लवकर या ठिकाणी पोहोचून, गडबड-गोंगाट न करता बसून राहिल्यास अनेक हिवाळी पाहुणे जवळून पाहायला मिळतात. सोबत पक्षी निरीक्षणासाठी दुर्बीण मात्र न विसरता न्यावी आणि कोणी माहितगार, जाणकार पक्षिमित्र बरोबर नसेल तर सालिम अली यांचं पक्ष्यांची ओळख करून देणारं पुस्तकही न्यावं. आता तर हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गगनाला लाभणारे हे नवे पंख तुम्हाला नक्कीच आनंद देतील यात शंका नाही.

makarandvj@gmail.com