अ‍ॅसूसचा विवोबुक

अ‍ॅसूस इंडियाने इंटेल ऑप्टेन मेमरीयुक्त विवोबुक १५ एक्स५१० या लॅपटॉपची भारतात घोषणा केली आहे.  इंटेल कोर आय५ प्रोसेसर, विण्डोज १०, चार जीबी रॅम, १६ जीबी इंटेल ऑप्टेन, एन्व्हीडिया जिफोर्स ग्राफिक्स कार्ड आणि एक टीबी स्टोअरेज क्षमता अशी या लॅपटॉपची वैशिष्टय़े आहेत. इंटेल ऑप्टेनमेमरी एक जलद, सहज आणि आश्चर्यकारकपणे प्रतिसादयुक्त कम्प्युटिंग अनुभवाचा आनंद देते. एक स्मार्ट, अनुकूलनीय प्रणाली प्रवेगक मल्टि टास्किंगची गती सुसह्य़ आणि सीमलेस लोड पातळीसह मल्टि टास्किंगची गती वाढवते आणि यामुळे हार्ड डिस्कची कार्यक्षमता वाढते, असे कंपनीने म्हटले आहे.

* किंमत : ४५९९९ रुपये.

आयबॉलचे ‘फ्रेम स्पीकर’

घरात स्पीकर हवेत पण जागेची अडचण आहे? किंवा दिवाणखान्याच्या सजावटीला स्पीकरमुळे बाधा पोहोचण्याची भीती वाटते? तसे असेल तर आयबॉलने तुमच्यासाठी उत्तर शोधले आहे. दिवाणखान्याची शोभा कमी करण्याऐवजी वाढवणाऱ्या आकर्षक चित्रांमागे दडलेले ‘फ्रेम स्पीकर’ आयबॉलने भारतात आणले आहेत. सुंदर पॅनेल कॅनव्हासमध्ये सजवण्यात आलेला हा स्पीकर ‘मेटल अलॉय सर्फेस अकॉस्टिक टेक्नॉलॉजी’मुळे उत्कृष्ट दर्जाचा आवाज निर्माण करतो. लाकडी चौकटीत असलेल्या आणि बास रिफ्लेक्स व डीएसपी (डिजिटल सिग्नल प्रोसेसर)करिता बनवण्यात आलेल्या या फ्रेम स्पीकरद्वारे घरभर ध्वनी दुमदुमून जातो. हा आयबॉल फ्रेम स्पीकर संपूर्णपणे वायरलेस आहे आणि विविध प्लेबॅक ऑप्शन्सना सपोर्ट करतो. यामध्ये ब्लूटूथ, यूएसबी, मायक्रो एसडी आणि एफएम रेडिओचा समावेश आहे. तुमचे व्यत्ययरहित मनोरंजन करण्यासाठी स्पीकरचे सादरीकरण एका बिल्ट-इन रिचार्जेबल बॅटरीसह करण्यात आले आहे आणि हा सतत १२ तासांपर्यंत सुरू राहतो.

* किंमत : ११९९९ रुपये

जगातील सर्वात महाग हेडफोन

जगातील सर्वात महागडे हेडफोन बनवणाऱ्या ‘सेनहाइझर’ या कंपनीने ‘एचई१’ आणि ऑन्फिओफिल्ससाठी सेनहाईझेरच्या प्रीमियम श्रेणीचा भाग पुण्यात सुरू केला आहे. सनहायझर एचई-१ हेडफोनचा आवाज पूर्णपणे नैसर्गिक आहे. कोणताही बारीक आवाजही स्पष्ट आणि व्यवस्थित ऐकू येईल, अशी त्याची रचना आहे. आपल्या इंद्रियांना पूर्णपणे सुखावेल, असा यातील सुंदर आवाज जगातील इतर कोणताही हेडफोन देऊ  शकणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. या हेडफोनच्या अ‍ॅम्प्लिफायरमध्ये आठ व्हॅक्यूम टय़ूब्स आहेत. इनकमिंग सिग्नलवर हा अ‍ॅम्प्लिफायर प्रक्रिया करतो. हवेतून येणाऱ्या अनावश्यक आवाजाचा या अ‍ॅम्प्लिफायरवर परिणाम होऊ  नये, म्हणून त्यात खास तांत्रिक व्यवस्था करण्यात आली आहे.

* किंमत : ४५ लाख रुपये