‘वन प्लस’ या कंपनीचे भारतात चांगलेच बस्तान बसू लागले आहे. मध्यंतरी आयफोन आणि सॅमसंगपेक्षाही वेगाने विक्रीचा आलेख उंचावत असल्याचे दावे या कंपनीने केले होते. याला प्रमुख कारण या कंपनीच्या स्मार्टफोनना ग्राहकांची मिळालेली पसंती होय. पसंतीच्या याच लाटेवर ‘वन प्लस ६’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे.

‘वन प्लस’ या कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाजारात दाखल केलेल्या ‘५टी’ या स्मार्टफोनचे परीक्षण काही महिन्यांपूर्वीच या पानावर प्रसिद्ध झाले होते. ‘वन प्लस’चे स्मार्टफोन अमेरिकेतील बाजारात लोकप्रिय आहेतच; पण भारतातही या कंपनीला चांगली ग्राहकसंख्या मिळत असल्याचे त्यात म्हटले होते. अलीकडेच कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीतही ही बाब अधोरेखित झाली. भारतीय बाजारपेठेत दररोज दाखल होणाऱ्या विविध स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक या दृष्टीने ‘वन प्लस’कडे पाहिले जात असले तरी, ही कंपनी सॅमसंग आणि अ‍ॅपल या कंपन्यांच्या स्मार्टफोनशी स्पर्धा करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तो खरा की खोटा हे कालांतराने उघड होईलच. पण ‘वन प्लस’कडून होणारी दर्जेदार स्मार्टफोनची निर्मिती आणि त्यांची किंमतश्रेणी पाहता नामांकित कंपन्यांशी स्पर्धा करून त्यांचा ग्राहक आपल्याकडे वळवणे हा या कंपनीचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते.

‘वन प्लस’ने अलीकडेच बाजारात दाखल केलेला ‘वन प्लस ६’ हा स्मार्टफोन या वर्गवारीत अचूकपणे बसतो. मोठा डिस्प्ले, डय़ुअल कॅमेरा, आकर्षक बाह्य़रचना, झटपट चार्ज होणारी बॅटरी आणि दमदार वेग या साऱ्यांमुळे ‘वन प्लस ६’ हा वैशिष्टय़पूर्ण ठरतो. या फोनच्या प्रमुख वैशिष्टय़ांवर नजर टाकल्यास अ‍ॅण्ड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या स्पर्धेत या फोनच्या माध्यमातून ‘वन प्लस’ने एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून येते.

डिस्प्ले : ‘वन प्लस’चा डिस्प्ले काठोकाठ म्हणजे अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेला आहे. ६.२८ इंचाच्या या स्क्रीनवर केवळ कॅमेरा आणि ‘इअर स्पीकर’पुरती जागा मोकळी सोडण्यात आली आहे. त्यामुळे अधिक मोठे दृश्य पाहण्यासाठी हा फोन अतिशय उपयुक्त आहे. या डिस्प्लेचे रेझोल्यूशन १०८० बाय २२८० इतके असून त्यामुळे चित्र अतिशय सुस्पष्ट दिसते.

कॅमेरा : 

या फोनमध्ये मागील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा असून त्याला २० मेगापिक्सेलच्या दुय्यम कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे अगदी अंधारात काढलेली छायाचित्रेही सुस्पष्ट आणि सुप्रकाशित येतात. या कॅमेऱ्यांमुळे ‘पोट्रेट मोड’ छायाचित्रणही सहज शक्य होते. फोनच्या पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा पुरवण्यात आला असून तोही अतिशय व्यवस्थित जबाबदारी पार पाडतो. दोन्ही कॅमेऱ्यांमधून काढलेल्या छायाचित्रांमध्ये रंग अतिशय सुस्पष्ट आणि अचूक दिसतात.

प्रोसेसर आणि स्टोअरेज :

या फोनमध्ये क्वालकॉमचे नवीन ‘स्नॅपड्रॅगन ८४५ एसओसी’ प्रोसेसर आहेत. हे प्रोसेसर असलेला ‘वन प्लस ६’ हा पहिलाच फोन आहे. या प्रोसेसरमध्ये ग्राफिक्ससाठीही स्वतंत्र व्यवस्था असल्याने फोन वेगाने काम करतो. अगदी व्हिडीओ पाहताना आलेले संदेश वाचणे किंवा अन्य कृती करणेही शक्य होते. सहा आणि आठ जीबी रॅम अशा दोन प्रकारांत हा फोन उपलब्ध आहे. तसेच त्याला अनुक्रमे ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोअरेजची जोड मिळाली आहे. त्यामुळे कोणतेही आणि कितीही अ‍ॅप सुरू असले तरी हा फोन क्षणाचाही विलंब न लावता सर्व प्रक्रिया पार पाडतो.

एकंदरीत पाहता, ‘वन प्लस ६’ हा ३० हजार रुपयांपेक्षा वरच्या श्रेणीतील फोनसाठी एक उत्तम पर्याय आहे. आयफोनच्या निम्म्या किमतीत त्यासारखीच वैशिष्टय़े असलेला हा फोन एक चांगला पर्याय आहेच पण सध्याच्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत एक पाऊल पुढेही आहे.

 ‘वन प्लस’ अन्य वैशिष्टय़े

  • आकार : ६.१३ बाय २.९७ बाय ०.३१ इंच
  • वजन : १७७ ग्रॅम
  • सिम : डय़ुअल सिम
  • ऑपरेटिंग सिस्टीम : अ‍ॅण्ड्रॉइड ८.१
  • अंतर्गत मेमरी : १२८/२५६ जीबी किंवा ६४ जीबी
  • रॅम : आठ जीबी किंवा सहा जीबी
  • किंमत : ३४९९९ रुपये.

बॅटरी :

‘वन प्लस’च्या फोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याची बॅटरी झटपट चार्ज होते आणि ती लवकर उतरतही नाही. ‘वन प्लस ६’मध्ये ३३०० एमएएच क्षमतेची बॅटरी असली तरी तेवढय़ा बॅटरीवर पूर्ण दिवस चालूनही रात्री फोनची बॅटरी शिल्लक राहात असल्याचे आम्हाला आढळून आले. विशेष म्हणजे, १५ टक्के बॅटरी शिल्लक असतानाही सुमारे तासभर व्हिडीओ पाहण्याचा अनुभव आम्ही घेतला. त्यानंतरही फोनची बॅटरी थोडय़ा प्रमाणात उपलब्ध होती, हे विशेष.

asif. bagwan@expressindia.com