अर्जुन बजाज

टीव्ही तंत्रज्ञानात गेल्या दहा वर्षांत प्रचंड प्रगती झाली आहे. एचडी, फुल एचडी, स्मार्ट टीव्ही, फोर के, एलईडी, ओएलईडी अशा विविध प्रकारच्या टीव्हींमुळे ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. दर्जा आणि कंपनीनुसार दहा हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यंतचे टीव्ही बाजारात मिळतात. त्यामुळे आपल्या खिशाला परवडण्यासोबतच चांगला दृश्यानुभव देणारा टीव्ही कसा निवडायचा हा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडतोच. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पुढील गोष्टी नेहमी विचारात घ्या.

कनेक्टिव्हिटी

या वैशिष्टय़ाकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो, पण टीव्ही सेटमध्ये किती ‘एचडीएमआय’ आहेत, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. साऊंड बार, लॅपटॉप किंवा गेमिंग कन्सोल टीव्हीशी जोडण्यासाठी एचडीएमआर पोर्टची गरज लागते. त्यामुळे टीव्ही खरेदी करण्यापूर्वी तुम्ही किती गॅझेट टीव्हीशी जोडणार आहात, यांचाही विचार करा. तुमच्या टीव्हीला किमान दोन एचडीएमआय पोर्ट असलेच पाहिजेत. अलीकडच्या टीव्हींमध्ये तीन एचडीएमआय पोर्ट असतातच. पण या पोर्टची जागा कुठे आहे, हेही तपासून पाहा. आणखी एक ध्यानात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे या पोर्ट्सची जागा. काही पोर्ट्स भिंतीसमोर असल्यास तेथे गॅजेझट्स लावणे कठीण होऊन जाते. अशा टीव्हीची निवड करा, ज्याचे पोर्ट्स टीव्हीच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला असतील.

ध्वनीचा दर्जा

सर्वात चांगल्या, आकर्षक व मन वेधून घेणाऱ्या टीव्हींचा ध्वनी दर्जा कमी असतो. ‘स्लिम टीव्ही’च्या बाबतीत ध्वनी ही सर्वात लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. कारण याचे बिल्ट-इन स्पिकर्स खरे तर लहान असतात. टीव्हीच्या आवाजाचा दर्जा वेगवेगळा असू शकतो आणि म्हणूनच टीव्हीची खरेदी करताना ही बाब ध्यानात घेणे गरजेचे असते. टीव्हीची खरेदी करताना तुम्हाला वॅटची संख्या सांगण्यात येते, जे तुमच्या स्पीकरला ऊर्जा देतात. पण ते तितकेसे महत्त्वाचे नसते, कारण त्यामुळे तुमच्या टीव्हीचा ध्वनी कसा आहे ते कळत नाही. तर, त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्पीकर्सची संख्या, स्पीकर्सची जागा आणि त्यांचे कन्फिगरेशन पाहावे लागेल. टीव्हीची बॉडी सडपातळ असल्याने ऑडिओवर त्याचा निश्चितच परिणाम होऊ  शकतो. नवीन आधुनिक टीव्हींमध्ये सामान्यत: स्पीकर्स खालच्या बाजूस लावलेले असतात, ज्यामुळे अधिक स्पष्ट, उंच व खोलवर आवाज मिळतो. सबवूफर नेहमीच लावलेले असावेत, कारण स्पीकर्स साऊंड स्पेक्ट्रमबाबतीत इतक्या खालपर्यंत पोहोचत नाहीत.

स्मार्ट टीव्ही

पारंपरिक टीव्हींची जागा आता स्मार्ट टीव्हींनी घेतली असून त्यांनी आता प्रत्येक घर व इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये मुख्य स्थान पटकावले आहे. स्मार्ट टीव्हींना इतर टीव्हींहून वेगळे ठरवणारे एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे इंटरनेट ब्राऊज करण्याकरिता यामध्ये इनबिल्ट क्षमता असते. आता तुम्ही तुमच्या सोफ्यावर आरामात बसून वेब पेजेसना भेट देऊ  शकता, होमवर्क करू शकता आणि हवामान अंदाज पाहू शकता किंवा ट्रेड बिटकॉइन्स तपासू शकता. सामान्यपणे, स्मार्ट टीव्हीवर सर्वाधिक वापरले जाणारे वैशिष्टय़ म्हणजे व्हिडीओ ऑन डिमांड सेवा होय. याद्वारे तुम्ही तुमचे आवडते गाणे पाहू शकाल किंवा सध्या टीव्हीवर प्रसारित होत नसलेले बराच काळ प्रतीक्षेतील ट्रेलर पाहू शकाल. बऱ्याच स्मार्ट टीव्हींमध्ये सोशल मीडिया अ‍ॅप्स प्री-लोडेड असतात, ज्यांमधील एक स्कायप हे आहे. काही सर्वोत्तम टीव्हींमध्ये वैकल्पिक वेबकॅम असतो. या वेबकॅममुळे तुमच्या मित्रमंडळी व कुटुंबासोबत व्हिडीओ कॉल करताना फुल स्क्रीन मिळतो.

रेझोल्यूशन

होय, हे आणखी एक वैशिष्टय़ आहे, जेथे बरेच टीव्ही कमी पडतात. रिझोल्यूशन टीव्ही चित्राची स्पष्टता दर्शवते, सामान्यपणे पिक्सेल्सच्या बाबतीत. वेगवेगळ्या आकारात टीव्ही ‘एचडी रेडी’ या टॅगसह उपलब्ध आहेत, म्हणजेच ते उच्च किंवा फुल एचडी रिझोल्यूशन सादर करतात. अल्ट्रा एचडी किंवा ४के टीव्हींची लोकप्रियता वाढतच आहे, जे अधिक रिझोल्यूशन सादर करतात, जे तुमच्या एचडी टीव्हीमध्ये आढळणाऱ्या पिक्सेलपेक्षा जवळपास चार पट अधिक आहे. 4के टीव्हीचा एक मोठा फायदा म्हणजे स्क्रीनवर छोटय़ा गोष्टीदेखील बारकाव्यांनी दिसून येतात, शिवाय अक्षरे देखील अगदी स्पष्ट दिसतात.

(लेखक ‘दाइवा’ टीव्ही कंपनीचे संस्थापक व सीईओ आहेत.)

योग्य आकार

टीव्हीची निवड करताना स्क्रीनचा आकार ही ध्यानात घेण्याची महत्त्वपूर्ण बाब आहे. टीव्हीचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत, अगदी १४ इंचांपासून ते १०० इंचांपर्यंत. आम्ही असे म्हणतो की, जितका टीव्ही मोठा तितके चांगले. पण, अंतर ही याबाबतीत ध्यानात घेण्याची बाब आहे. जर तुम्ही स्क्रीनवर ‘इंडिव्हिज्युअल पिक्सेल्स’ पाहू शकत असाल, तर तुमचा टीव्ही तुमच्या घराकरिता खूपच मोठा आहे. हे पाहण्याचा फॉम्र्यूला अगदी सोपा आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या रुंदीला ०.८४ ने भागा आणि इंचांमध्ये जे उत्तर येईल तेवढे अंतर तुमच्यामध्ये आणि टीव्हीमध्ये असायला हवे. या पद्धतीप्रमाणे, जर तुमचा टीव्ही ६५ इंचांचा असेल, तर तुम्ही त्याच्यापासून ६.५ फूट अंतरावर बसायला पाहिजे. अशा प्रकारे, अशा स्क्रीन आकाराच्या टीव्हीची निवड करा, जो तुमच्या जागेत आणि बजेटमध्येही बसेल.

लक्षात ठेवा!

कृपया अजाणतेपणी टीव्हीची खरेदी करू नका. ज्यांमध्ये वरील सर्व (किंवा काही) वैशिष्टय़े समाविष्ट असतील अशा टीव्हीची निवड करा. याव्यतिरिक्त, तुमच्या टीव्हीने तुमच्या गरजांची पूर्तता केली पाहिजे. केवळ सेल्समनच्या सांगण्यावरून टीव्हीची खरेदी करू नका. वेळ घ्या, संयम ठेवा आणि पाहा तुमच्या सर्व गरजांची पूर्तता करणाऱ्या सर्वगुणसंपन्न टीव्हीचे तुम्ही मालक असाल!