शामल भंडारे

काळाच्या प्रवाहानुसार व्यक्ती अनेक गोष्टी आत्मसात करत असतो. आजूबाजूला घडणारे बदल तरुण पिढी त्वरित आत्मसात करत असते. नियमानुसार तरुण पिढीही अनेक नवनवीन शिकत असते. सध्या तरुणांमध्ये ऑनलाइन गेम्सचे गारूड दिसू लागले आहे. तरुण मोठय़ा प्रमाणात गेमिंगच्या दुनियेत जगताना दिसत आहेत. विशेषत: मुलीही या ऑनलाइन गेम्सचा आनंद घेताना दिसत आहेत.

काही वर्षांपासून जीटीए व्हॉइस सीटी नावाचा ऑडिओ व्हिज्युअल खेळ मोठय़ा प्रमाणात खेळला जायचा. मात्र अलीकडे या गेमची जागा काही वेगळ्या गेम्सने घेतलेली  आहे. सध्या पब्जी आणि फ्री फायर या ऑनलाइन गेम्सची चलती आहे. निव्वळ भारतातच नव्हे तर जगभर सर्वत्र लोकप्रिय असणाऱ्या ऑनलाइन खेळातील पब्जी सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. पब्जीबरोबरच फ्री फायर गेमची तरुणांमध्ये उत्सुकता आहे.

सतत आपल्या मित्राला ‘ए ऑनलाइन येतो का?’ असे विचारले जाते. हे नेमके कशासाठी तर खेळण्यासाठी मित्रांना ऑनलाइन बोलावले जाते. ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीत आणि इंटरनेटची जोडणी घेऊन आपल्या मोबाइलवर खेळला जाणारा एक खेळ. ज्यात आपल्यासोबत अनेक लोक समाविष्ट करून घेता येतात. यात खेळाडूंचा एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क होतो. आपल्या खेळात समाविष्ट असणारे खेळाडू आपल्या मित्रमंडळींपैकीच असतील असे नाही. जगभरातील कोणत्याही खेळाडूला आपण आपल्या खेळात समाविष्ट करून घेऊ  शकतो. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पब्जीसारख्या खेळात आपले फेसबुकमधील मित्रमंडळी आपल्याला आपोआप मोबाइल स्क्रीनवर दिसतात. ज्यामुळे आपण त्यांना आपल्या खेळात समाविष्ट करून घेऊ  शकतो. बहुतेकदा या ऑनलाइन खेळांमध्ये असे अनेक खेळाडू असतात, जे एकमेकांना व्यक्तिश: ओळखत नसतात. मात्र या ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून त्यांची ओळख होते. कोणत्याही प्रकारे संपर्क क्रमांक एकमेकांना दिला जात नसला तरी एकमेकांशी संवाद साधता येतो. फक्त खेळासाठीचा हा बंध असतो. या खेळात खेळाडू एकमेकांसोबत संवाद साधत असतात आणि एकमेकांच्या साहाय्याने खेळात मदत करत असतात. या ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मैत्री वाढते आहे आणि या मैत्री समूहाला ‘पब्जीप्रेमी’ असे नाव देण्यात येत आहे.

पब्जींशी प्रेमी बोलणे झाले असता आणखी काही गोष्टी समोर आल्या. इतर काही गेम्सच्या तुलनेत पब्जीचे ग्राफिक्स अनोखे आणि उत्तम आहेत जे खेळाडूंना आकर्षित करतात, असे पुण्याच्या  मिहीर कुलकर्णी याने सांगितले. त्याचबरोबर फर्स्ट प्लेअर शूटिंग  या प्रकारासाठी पब्जी गेम हा सर्वाधिक लोकप्रिय आहे असे मुंबईमध्ये राहणाऱ्या साहिल बावकर याने सांगितले. मिहीर अनेक वर्षांपासून गेमिंगमध्ये असणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर तो गेमिंग संदर्भातील सगळे अपडेट्स घेत असतो. ऑनलाइन गेम्स खेळणारे खेळाडू हे प्राधान्याने शहरात राहणारे आहेत. गेम संपूर्ण झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून तो स्टोरीवर पोस्ट करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. त्यात शक्यतो चिकन डिनर नावाचा प्रकार बघण्यात येतो. गेममधील काही विशेष पातळी गाठल्यावर चिकन डिनर नावाचे बक्षीस मिळते. याच गोष्टीत पुन्हा मोबाइलच्या माध्यमातून समाज माध्यमांवर पोस्ट करण्यात येतात.

कोणत्याही गोष्टीत ‘अति तिथे माती’ असते. या संदर्भात माइंड गुरू डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, मुलांची बिघडणारी मानसिकता  आणि ढासळत्या आरोग्याला ऑनलाइन गेम कारणीभूत ठरतात. या गेममुळे मुलांचा हट्टीपणा वाढत चालला आहे. सतत एकाच  ठिकाणी मोबाइल हातात घेऊन बसण्याने मुलांमध्ये स्थूलता आणि लठ्ठपणा वाढत चालला आहे. बौद्धिक क्षमतेवर परिणाम होत असल्याने मुलांच्या हालचालींवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. असा त्रास भेडसाविणाऱ्या मुलांना डॉक्टरांकडे घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही घातक बाब आहे.

इतर खेळांचीही धमाल

पब्जीच्या व्यतिरिक्त इतर आणखी काही खेळ आहेत, फोरनाइट,  काऊंटर स्ट्राइक असे काही ऑनलाइन खेळले जाणारे शूटिंग या प्रकारासाठी विशेष समजले जाणारे गेम आहेत. त्यापैकी कॉऊंटर स्ट्राइक या खेळात गेममधील व्हर्जन बदलत जाते. ते हल्ली सुधारित होत चालले आहे. ज्यात खेळामधील ग्राफिक्स आणि पर्याय अधिक चांगले होत जातात.

नेमका कसा खेळतात हा खेळ

हा खेळ मोबाइल डेटावर डाऊनलोड करण्याची सोय नाही. यासाठी वायफायची आवश्यकता असते. खेळाच्या सर्वात पहिल्या पायरीमध्ये आपल्यासाठी असलेल्या कॅरेक्टरचा वेश ठरवून मिळालेले क्रेडिट्स घेऊन खेळ सुरू करावा लागतो. त्यानंतर सोलो, ग्रुप  आणि स्कॉड अशा पर्यायांमधील एक पर्याय निवडण्याची मुभा  असते. यात सोलोची निवड केल्यावर खेळ स्वत:लाच एकटय़ाने  खेळायचा असतो आणि ग्रुपमध्ये आणखी दोन खेळाडू सोबत खेळात असतात, ज्यात त्यांना क्रेडिट्सही विभागून दिले जातात. यामधील स्कॉड हा पर्याय सर्वाधिक लोकप्रिय समजला जातो. ज्यात चार खेळाडू एकत्र खेळतात. यात मिशन सर्वाना मिळून पूर्ण  करायचे असते. आपण आपल्या प्रतिस्पध्र्याना मारत पुढे सरकतो तसे आपल्याला सुधारित शस्त्रे पुरवली जातात.