१५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन बाजाराकडे भारतीय ग्राहकांचा ओढा असल्याने या श्रेणीत दर्जेदार फोन उपलब्ध करून देण्याची मोठी स्पर्धा मोबाइल कंपन्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या स्पर्धेत ‘शाओमि’सारख्या ब्रॅण्डने विश्वासार्हता आणि लोकप्रियता निर्माण केली आहे. ‘शाओमि’च्या प्रत्येक स्मार्टफोनला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे पाहूनच मोठमोठय़ा कंपन्यांनीदेखील या किंमत श्रेणीतील स्मार्टफोनकडे आपला मोर्चा वळवला. ‘ओप्पो’ ही अशीच एक कंपनी. साधारण २० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोन बाजारात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओप्पो’ने ही ओळख कायम ठेवण्यासाठी वेगळ्याच नावाने कमी किंमत श्रेणीतील बाजारात प्रवेश केला. तो ब्रॅण्ड म्हणजे ‘रीअलमी’.

‘रीअलमी’ने गेल्या वर्षभरात तीन स्मार्टफोन बाजारात आणले. हे तिन्ही स्मार्टफोन १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील आहेत. मात्र त्यातील वैशिष्टय़े चांगल्या कंपनीच्या नावाजलेल्या स्मार्टफोनच्या तोडीस तोड अशी ठरली आहेत. हाच फॉम्र्युला कायम ठेवत ‘रीअलमी’ने ‘रीअलमीयू१’ नावाचा नवीन स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात बाजारात आणला. ३जीबी आणि ४जीबी अशा रॅम असलेल्या दोन प्रकारांत दाखल झालेला हा स्मार्टफोन सध्या ईकॉमर्स संकेतस्थळांवर चांगली मागणी खेचत आहे. या फोनची एकूण वैशिष्टय़े पाहिली तर, ‘शाओमि’च्या स्मार्टफोनना एक चांगला स्पर्धक निर्माण झाल्याचे म्हणता येईल.

डिझाइन

बऱ्याचदा कमी किमतीत जास्त रॅम वा स्टोअरेज किंवा अन्य वैशिष्टय़े असलेले फोन आणताना त्यातील डिझाइन किंवा मजबुतीशी तडजोड केल्याचे पाहायला मिळते. ‘रिअलमी’ने मात्र अशी कोणतीही तडजोड केली नसल्याचे ‘यू१’कडे पाहताच दिसून येते. हा फोन हातात घेतल्यास खूपच हलका वाटतो. याचे प्रमुख कारण याची संपूर्ण बॉडी पॉलीकाबरेनेटने बनवण्यात आली असून मागील बाजूसही काचेचे बाह्य़ावरण बसवण्यात आले आहे. मागील बाजू अतिशय आकर्षक असून कॅमेरा, फ्लॅशलाइट आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांनी अतिशय कमी जागा त्यात व्यापली आहे. मागील बाजू दिसायला अतिशय आकर्षक आहे. मात्र काचेचे आवरण असल्याने त्यावर लगेच ओरखडे उमटण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने फोनच्या बॉक्समध्ये बॅक कव्हरही पुरवले असल्याने ही समस्या जाणवणार नाही. उजव्या बाजूला पॉवर बटण आणि डाव्या बाजूला आवाजाची बटणे आणि सिमकार्ड ट्रे अशी व्यवस्था या फोनमध्ये आहे. खालच्या बाजूस हेडफोनसाठी जॅक, चार्जिगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट आणि स्पीकर या गोष्टी पाहायला मिळतात. एकूणच अन्य फोनपेक्षा ‘रिअलमी यू१’ फारसा वेगळा दिसत नाही.

डिस्प्ले

या फोनमध्ये ६.३ इंचाचा  ‘कव्‍‌र्हड’ डिस्प्ले असून तो फुल एचडी+आयपीएस असल्यामुळे स्मार्टफोनवर व्हिडीओ अतिशय उत्तम दिसतात. ‘यू१’चा ब्राइटनेस अतिशय प्रखर असल्याने थेट सूर्यप्रकाशातही स्क्रीनवरील गोष्टी व्यवस्थित पाहता येतात. १०८० बाय २३४० पिक्सेलच्या रेझोल्यूशनमुळे फोनवरील छायाचित्रे अतिशय सुस्पष्ट दिसतात. या फोनमध्ये केवळ फ्रंट कॅमेरा आणि स्पीकरपुरती जागा सोडून डिस्प्लेचा उर्वरीत भाग स्क्रीनने व्यापला आहे. त्यामुळे स्क्रीन मोठी दिसते.

सॉफ्टवेअर आणि कामगिरी

‘रीअलमी यू१’मध्ये मीडियाटेक हेलिओ पी७० प्रोसेसर बसवण्यात आला आहे. या प्रोसेसरने युक्त असलेला हा पहिलाच फोन आहे. या प्रोसेसरमुळे फोनचा वेग १३ टक्क्यांनी वाढल्याचा कंपनीचा दावा आहे. आम्ही जेव्हा फोन हाताळला तेव्हा आम्हाला हे प्रमाण मोजता येणे शक्य नव्हते. परंतु फोनचा वेग चांगला असल्याचे आढळून आले. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा फोन ३जीबी आणि ४जीबी रॅम अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे. आमच्याकडे आलेल्या फोनमध्ये ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोअरेज होती. पण यापैकी प्रत्यक्षात ४८.१ जीबी स्टोअरेज जागाच वापरकर्त्यांना उपलब्ध होते. बाकीची जागा काही प्री-इन्स्टॉल अ‍ॅपनी घेतली आहे. फेसबुक, अ‍ॅमेझॉन शॉपिंग, पेटीएम, गेम स्पेस, डेलीहंट, ओपेरा ब्राऊजर, यूसी ब्राऊजर यांनी फोनची जागा व्यापली आहे. आता अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोनमध्ये गुगल क्रोमसारखे ब्राऊजर आधीच उपलब्ध असताना अन्य दोन ‘थर्ड पार्टी’ ब्राऊजर अ‍ॅप पुरवण्याची गरज नव्हती. परंतु, मोबाइल कंपन्या अ‍ॅप कंपन्यांशी करार करून हे ब्रॅण्डींग करत असल्याने त्याला ईलाज नाही. परंतु, हे अ‍ॅप तुम्ही अनइन्स्टॉल किंवा डिसेबल करू शकता. त्यामुळे चिंता नसावी. या फोनमध्ये ‘स्मार्ट स्कॅन’ नावाचे एक अ‍ॅप पुरवण्यात आले आहे. हे अ‍ॅप कॅमेऱ्याने स्कॅन केलेला मजकूर लगेच अनुवादित करतो. हे अ‍ॅप अतिशय व्यवस्थितपणे काम करत असल्याचे आम्हाला आढळले.

कॅमेरा आणि बॅटरी

‘रीअलमी यू१’मध्ये २५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून मागील बाजूस १३+२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. मध्यंतरी वापरकर्त्यांमध्ये सेल्फीची मोठी हौस असताना जास्त क्षमतेचे फ्रंट कॅमेरे काढण्याचा सपाटा कंपन्यांनी चालवला होता. मात्र नंतर डय़ुअल कॅमेरा तंत्रज्ञानाचा अवलंब झाल्यानंतर पुन्हा मागील बाजूच्या कॅमेऱ्याला महत्त्व आले. असे असताना ‘रीअलमी’ने ‘यू१’मध्ये २५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पुरवला आहे. अर्थात दोन्ही कॅमेरे अतिशय चांगल्याप्रकारे व आपल्या क्षमतेच्या तुलनेत चांगली छायाचित्रे टिपतात. अंधुक प्रकाशात छायाचित्रण तितकेसे सुखावह नाही. ‘यू१’मध्ये ३५०० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली असून ती अतिशय चांगली काम करते. मात्र फोनचे चार्जिग जलद नाही, ही एक उणीव वाटते.

अन्य वैशिष्टय़े

* ऑपरेटिंग सिस्टीम – अ‍ॅण्ड्रॉइड ८.०

*  डिस्प्ले – ६.३ इंच

*  सिम – डय़ुअल

*  प्रोसेसर – २.१ गिगा हार्ट्झ

*  रॅम – ४ जीबी

*  स्टोअरेज – ६४ जीबी

*  कॅमेरा –  २५मे. फ्रंट, १३+२ मागील बाजूस

*  किंमत  – १४९९९ रुपये (तीन जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत ११९९९ रुपये)