रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

माणूस आणि प्राण्यांच्या परस्पर जिव्हाळ्याची साक्ष अगदी बाराव्या शतकाच्याही आधीपासून मिळते. उदयाला आलेल्या कोणत्याही संस्कृती, धर्म याला अपवाद नाहीत.

इजिप्तमधील थडगी, फ्रान्समधील गुहा यांवर मांजरे आणि श्वानांच्या आकृत्या कोरलेल्या आढळून आल्या आहेत. शिकारीच्या पवित्र्यातले, अगदी ससाण्याची शिकार करणारे मांजर, दबा धरून बसलेले मांजर.. अशी मांजराची थोडीशी उग्र प्रतिमा त्या चित्रांतून दिसते. सतराव्या शतकापासून मात्र हळूहळू मांजर लाडिकपणा, सौंदर्य, राजसपणा, श्रीमंती आणि त्याचवेळी निरागसपणा अशा वेगवेगळ्या छबी चित्रांतून उमटलेल्या दिसतात. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात समर्थघराच्या माणसांप्रमाणेच मांजरे आणि श्वानांची चित्रे (पोट्रेटस) रेखाटली गेली. एकोणिसाव्या शतकात मांजर हीच संकल्पना घेऊन शंभरहून अधिक चित्रे रेखाटली गेल्याचे उल्लेख आहेत. ही चित्रे आज जगभरातील गॅलऱ्यांमध्ये विसावली आहेत.

बदललेल्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीत प्राणी पालनाचा हा छंद हा ‘गरजेचा’ होऊ  पाहात आहे. माणसाचे पूर्वापार चालत आलेले हे प्रणिवेड एका मोठय़ा बाजारपेठेचे रूप घेऊन उभे आहे. फक्त भारताचा विचार करायचा झाल्यास बाराशे कोटी रुपयांची बाजारपेठ पसरली आहे. प्राण्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या गरजा भागवणारी आणि काहीवेळा कृत्रिम गरजा तयार करणारी उत्पादने हररोज बाजारात दाखल होतात. मात्र या पलीकडे जाऊन प्राणी पळताना अनेक बाबींचा सजगपणे विचार व्हायला हवा. मिळवणे आणि छंद जोपासण्यापलीकडे जाऊन प्राणी हे दीर्घकालीन जबाबदारी आहे याची जाण असायला हवी.

प्राण्यांची काळजी, बाजारपेठेतील उत्पादने, त्यांची निवड, नवे ट्रेंड्स अशा बाबींची ओळख या सदरातून वर्षभर करून देण्याचा हा प्रयत्न.. अर्थातच तज्ज्ञांशी बोलून.

बाजारपेठेची व्याप्ती

बाजारपेठेचे सर्वेक्षण करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी नमूद केलेल्या आकडेवारीनुसार भारतात साधारण ३१० कोटी रुपयांची उलाढाल पशुखाद्य आणि इतर उत्पादनांची आहे. गेल्या दशकभरात झपाटय़ाने वाढलेल्या अमेरिका आणि युरोपीय देशांमधील पशुउत्पादनांची बाजारपेठ आता संपृक्त अवस्था गाठण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे भारताकडे यातील मोठी बाजारपेठ म्हणून जगाचे लक्ष आहे. भारतात दरवर्षी ६ लाख प्राणी नव्याने पाळले जातात. दरवर्षी १३.९ टक्के दराने ही बाजारपेठ वाढते आहे.

नुसताच छंद नाही, तर जबाबदारी

कोणत्याची प्राण्याचे पालकत्व स्विकारण्यापूर्वी आपली गरज, घरातील परिस्थित, आर्थिक क्षमता, अशा अनेक बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. प्राणी पाळणे हे दहा-पंधरा वर्षांचे व्रत असते. प्राण्यांना नुसतेच खाऊ-पिऊ घालणे पुरेसे नाही तर त्यांना वेळही द्यावा लागतो.