संतोष बडे

महाराष्ट्रातल्या माथेरानची आठवण करून देणारं एक ठिकाण मेलबर्नमध्येही आहे. तिथेही आपल्या माथेरानच्या राणीसारखी एक छोटेखानी ट्रेन आहे. विशेष म्हणजे १०० वर्षांपूर्वीच्याच लाकडी ट्रेनमधून आजही प्रवास घडवला जातो. वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या आणि बिनकाचांच्या खुल्या खिडक्या असलेल्या या झुकझुक गाडीतून प्रवास करण्यासाठी एक दिवस राखून ठेवायलाच हवा.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, ग्रांप्री रेसचा ट्रॅक, सीबीडी एरिया, रॉड लेवर अरीना, हुतात्मा स्मारक ऊर्फ श्राईन ऑफ रिमेंबरन्स, स्टेट लायब्ररी, चर्चगेटसारखे दिसणारे फ्लिंडर्स रेल्वे स्टेशन, कॅसिनो असं सारं पाहून झाल्यानंतर अजून काय या प्रश्नाचं उत्तर म्हणजे दोंडेनोंग रेंजेसमधील पफिंग बिली या मिनी रेल्वेचा प्रवास.

मेलबर्न ते बेलग्रेव्ह हा प्रवास आपण मेट्रो रेल्वेने करू शकता. बेलग्रेव्हला मात्र आपल्याला अचानक १०० वर्षांपूर्वीचे रेल्वे स्थानक दिसते. आपण तशाच जुन्या पद्धतीच्या रेल्वे फलाटावर पोहोचतो. तिथे गेल्यावर माथेरान स्थानकाची तीव्रतेने आठवण होते. इथला नॅरोगेज रेल्वे ट्रॅक अगदी आपल्या माथेरानसारखाच आहे आणि हो, रेल्वेच्या बोगीसुद्धा जुन्या माथेरान रेल्वेप्रमाणेच आहेत.

आता आपण नवीन चकचकीत कोचेसमध्ये बसून माथेरानला जातो. पफिंग बिलीमध्ये मात्र तसे नाही. आपल्याला चक्क १०० वर्षांपूर्वीच्या कोचेसमधून प्रवास घडवला जातो. या ट्रेनमध्ये लाकडी बाकं आणि उघडय़ा खिडक्या आहेत. प्रत्येक डब्यात एक सेवक (अटेंडंट) असतोच.

१९२० च्या आसपास बेलग्रेव्ह ते गेमब्रूक या गावांदरम्यान जंगलातल्या लाकडांची, जनावरांची ने-आण करण्यासाठी या रेल्वेची आखणी झाली. हळूहळू प्रवासी वाहतूकदेखील सुरू झाली. अतिशय घनदाट अशा दोंडेनोंग रेंजेसच्या जंगलातून, दुतर्फा असलेल्या निलगिरीच्या उंचच उंच झाडांमधून हा रेल्वेचा प्रवास सुरू असतो. हा संपूर्ण प्रवास वाफेच्या इंजिनातून होतो. पांढऱ्या वाफा सोडत ही झुकझुक गाडी सुरू होते. पफिंग बिली हे या गाडीला लाडाने ठेवलेलं नाव आहे. पफिंग म्हणजे धूर सोडणारी आणि बिली हे त्या गाडीचे नाव आहे.

गाडीच्या खिडक्यांना काचा नसल्यामुळे कानात शिरणारा गार वारा अनुभवता येतो. मध्येच काही झाडांवर कोआला प्राणी आपल्याकडे एकटक पाहताना दिसतात. बघता बघता आपण ट्रेस्टल या लाकडी पुलावरून जाऊ लागतो. या पुलाला १०० हून अधिक र्वष झाली आहेत. त्यावरून रोज किमान १० वेळा तरी ही छोटीशी ट्रेन ये-जा करते.

या प्रवासात वाफेच्या इंजिनाचा आवाज, शिट्टीचा आवाज ऐकू येत राहतो. प्रवासादरम्यान ‘गाडी बुला रही है, सिटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है’ या गाण्याची नक्कीच आठवण येत राहते. या प्रवासात लागणाऱ्या स्थानकांवरील अनुभव औरच असतो. स्टेशन मास्तर स्वत: गाडीला झेंडा दाखवतात, त्याआधी खणखणीत आवाजात ‘ऑल ऑन द बोर्ड’ अशी जोरदार आरोळी ठोकतात आणि नंतरच इंजिन सुरू होते.

गंमत म्हणजे या सर्व प्रवासात, रेल्वेचे पगारी नोकर फक्त १० असून बाकी स्वयंसेवक आहेत. केवळ या पफिंग बिलीच्या प्रेमाखातर ते स्टेशन मास्तर, तिकीट क्लार्क, कोच अटेंडंट, फायर पेट्रोल अशी कामे विनामोबदला करतात.

एकंदरीतच या गाडीचा जंगलातील प्रवास रोमांचकारी आहे व आपल्याला एकदम एका शतकापूर्वीचा झक्कास अनुभव देऊन जातो. मेलबर्नला जाणार असाल तर पफिंग बिलीसाठी एक दिवस नक्कीच राखून ठेवा. एकदम ताजातवाना करणारा अनुभव नक्की मिळेल याची खात्री.

मागोमाग अग्निशमन गाडी

प्रत्येक गाडीच्या मागून अग्निशमन दलाची एक छोटेखानी गाडी पाणी घेऊन फिरत असते. या अग्निशमन वाहनाने ‘ऑल वेल’ सांगितल्याशिवाय नंतरच्या गाडीला सिग्नल मिळत नाही. येथील जंगलामध्ये सुका पालापाचोळा सारखा पडत असतो. तर वाफेच्या इंजिनातून निघणाऱ्या ठिणग्यांमुळे आग लागण्याची शक्यता असते. गाडीचे डबे पूर्णपणे लाकडी असल्याने प्रत्येक गाडीच्या मागे फायर पेट्रोलिंगची छोटेखानी गाडी पाणी घेऊन फिरत असते. कुठे आग लागलीच, तर त्वरित विझवली जाते.

badess@gmail.com