01 March 2021

News Flash

रानफुलांच्या गावा जावे..

सरत्या पावसातली गिरीभ्रमंती नेहमीच नेत्रसुखद आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद जोशी

‘केवळ माझा सकडा’ म्हणून कवी वसंत बापटांनी गौरवलेला आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक जडणघडणीचा कणा असलेला आपला राकट, रांगडा सह्य़ाद्री सर्वात सुंदर दिसतो ते श्रावण-भाद्रपदातल्या सरत्या पावसात. इतिहासाची मानचिन्हे बनलेले गिरी दुर्ग असोत, मोकळी पठारे असोत किंवा आकाशाकडे झेपावलेल्या गिरी शिखरांचे उतार या सगळ्यावर वर्षां राणी हिरवागार शेला अंथरते. या शेल्यावर बुट्टी असते ती नाजूक, रंगीबेरंगी रानफुलांची. कुठे गुलाबी तर कुठे निळ्या, कुठे पिवळ्या तर कुठे जांभळ्या रानफुलांची आरास सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर पाहायला मिळते.

सरत्या पावसातली गिरीभ्रमंती नेहमीच नेत्रसुखद आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. जमिनीलगत पसरलेल्या गवतापासून ते शेजारच्या बळकट झाडाचा आधार घेत वाढणाऱ्या वेलीपर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पतींवर ही रानफुले पाहायला मिळतात. पावसाळ्यात हिरवाई असल्याने, त्यावरच्या फुलांचे अस्तित्व लगेच कळते. त्यातही ऊन पावसाची लपाछपी सुरू होतो तेव्हा रानफुलांचा खरा मौसम सुरू होतो.

या काळात सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात ती कवळ्याची लाल टिका लावलेली पिवळी फुले. या फुलांच्या आकारामुळे त्यांना ‘डोनाल्ड डक फ्लॉवर’ असे टोपण नावही मिळाले आहे. या कवळ्याच्या म्हणजे स्मिथिया जिनसमधले आणखी काही प्रकार जसे स्मिथिया सेन्सिटिवा (लाजाळू कवळा), स्मिथिया सेतुलोसा(मोठा कवळा) देखील पाहायला मिळतात. पिवळ्या कवळ्याची गुलाबी आवृत्ती म्हणजे स्मिथिया पुरपुरीया अर्थात बरका. या गुलाबी फुलावर पांढरा टिका असतो. पिवळ्या रंगाची आणखी काही रानफुले म्हणजे सोनकी, सोनतारा, पिवळी अबई, पान लवंग. गुलाबी तेरडय़ापासून ते गुलाबी बाभळीपर्यंत विविध छटा पाहायला मिळतात. तेरडय़ातही पुन्हा जांभळा तेरडा, पिवळा तेरडा असे प्रकार आहेतच. जरतारी, बोरपुडी, सुपली, फुलझडी या गडद रंगाच्या फुलांप्रमाणेच नावाप्रमाणेच फिक्या अबोली रंगाचे चिमुकले अबोलिमा देखील लक्ष वेधल्याशिवाय राहात नाही.

या रानफुलांमधील एक अनोखा प्रकार म्हणजे टेरिस्ट्रियल ऑर्किड्स. सर्वसाधारणत: ऑर्किड्स नेहमी झाडावर वाढतात, पण हबेनारिया जीनसमधील ऑर्किड्स मात्र जमिनीवर उगवतात आणि बहरतात. पांढराशुभ्र रंग आणि नजाकतदार पाकळ्या ही यांची ओळख म्हणता येईल. बाहुली हबे आमरी, आषाढ हबे आमरी, उग्र हबे आमरी, पांचगणी हबे आमरी, चिरे हबे आमरी असे जमिनीवरच्या ऑर्किड्सचे अनेक प्रकार गवतावर झुलताना पाहायला मिळतात. रानफुलांच्या जगातील आणखी एक अनोखा प्रकार म्हणजे ‘कंदील पुष्प’. पोसिनेशिया कुळातील सेरोपेजिया जीनसचे जे अनेक प्रकार पाहायला मिळतात, त्यांच्या फुलांच्या आकारावरून कंदील पुष्प असे समर्पक नाव मिळाले आहे. सगळ्याच वनस्पती परागीभवनासाठी कीटकांचा उपयोग करतात पण सेरोपिजिया चक्क कीटकांना ओलीस धरून, सक्तीने हे काम करायला लावते आणि मगच त्या कीटकाला सोडते. सेरोपेजियाच्या फुलांची रचनाच तशी असते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या फुलांना खरचुडी म्हटले जाते. सेरोपेजिया जैनी, व्हिन्साफोलिया, हिरसुटा, ऑक्युलेटा, सह्य़ाद्रिका असे कंदील पुष्पाचे प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळतात.

रानफुलांमध्ये आभाळी, नभाळी, चिरे पापणी, पंद अशी नाजूक फुले पाहायला मिळतात त्याचप्रमाणे चक्क कीटकांचा फराळ करणारी दवबिंदू म्हणजे ड्रोसेरासारखी कीटकभक्षी वनस्पतीही पाहायला मिळते. या दवबिंदूच्या देठावरचे दवबिंदूंसारखे दिसणारे चिकट थेंबच कीटकांचा घात करणारे असतात, फुलांकडे आरक्षित झालेले कीटक त्यात फसतात आणि मग ही वनस्पती त्या कीटकाची शिकार करते. मग चला ‘जाईन विचारत रानफुला..’ म्हणून सह्य़ाद्रीच्या डोंगरवाटांवरून भटकंती करायला.

कुठे जाल?

साताऱ्याजवळचे कासचे पठार तर सर्वाना माहीत आहेच, मात्र अतिपर्यटनामुळे या पठारावरील फुलांचा खजिना जरा धोक्यातच आलाय, त्यामुळे तिकडे जाणे टाळता आले तर उत्तम. साताऱ्याजवळचे, ठोसेघरच्या पुढे असलेले चाळकेवाडीचे पठार देखील या बाबतीत समृद्ध आहे. तसेच भीमाशंकरचा परिसर, खंडाळा-लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आणि पाचगणीतील पठारे, आंबोली या ठिकाणी रानफुलांच्या विविध जाती पाहायला मिळतात. शिवनेरी, सिंहगड, राजगड, पुरंदर या किल्लय़ांवरही रानफुलांचा गालीचा अंथरला जातो. जिथे लॅटराइट म्हणजे जांभ्या दगडाचे सडे आहेत, उंचावर मोकळी पठारे आहेत तिथे रानफुलांचे गाव वसलेलं पाहायला मिळतं.

जबाबदारीचं भान आवश्यक

या रानफुलांच्या गावी जाताना थोडी खबरदारी अवश्य घ्यावी. अशा परिसरात प्लास्टिक, कागद, अन्नपदार्थ असा कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. पायाखाली रानफुले आणि वनस्पती तुडवल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. या वनस्पती बागेत वा कुंडीत जगणार नाहीत, त्यामुळे तोडून आणू नयेत. रानफुलांचे सौंदर्य जवळून न्याहाळायला सोबत मोठे भिंग अवश्य ठेवा.

makarandvj@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 3:46 am

Web Title: article about rainy season flowers
Next Stories
1 दोन दिवस भटकंतीचे : कराड
2 खाद्यवारसा : बांबूची भाजी
3 शहरशेती : बियाणे पेरताना..
Just Now!
X