येत्या रविवारी रक्षाबंधनाचा सण आहे. अनेक तरुण बहिणीला ओवाळणी काय द्यावी, याचा विचार करत असतील. काही तरुणी भावासाठी खास राखी शोधण्यासाठी बाजाराचा फेरफटका मारत असतील. पण काही तरुणांची रक्षाबंधनाची विशेष संकल्पना ठरली आहे. या सणाच्या माध्यमातून वर्षभर मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या बहिणीचा अभिमान, तिच्या आरोग्याचे रक्षण म्हणजेच नव्या नात्याची रुजवात मांडलीय शलाका सरफरे यांनी..

बहीणच माझी रक्षणकर्ती..

आजच्या आधुनिक काळातही समाजात महिलांची समानता आभासीच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जी काही समता आणि स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळेच स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. मी सामजसेवा विषयात पदवीचे शिक्षण घेतले असून समाजातील लिंगभेद पुसण्यासाठी जनजागृतीपर कार्य करतो. लहानपणापासून माझं नाक पुसण्यापासून ते अभ्यास घेण्यापर्यंत सर्वच माझ्या बहिणीने केले. एवढय़ा कणखर माझ्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी मी घेण्याऐवजी तीच माझी रक्षणकर्ती व्हावी. या भावनेने आम्ही दर वर्षी एकमेकांना राखी बांधतो. एकमेकांची प्रत्येक अडचणीत साथ देण्याची शपथ घेतो, असे ओनिल कुलकर्णी सांगतो.

‘सीड’  राखीची रुजवण

अवर निसर्ग फाऊंडेशनच्या वतीने यंदा ‘सीड’ राखीचा उपक्रम राबवला आहे. शाळा, महाविद्यालयात या राख्यांविषयी जागृती करण्यात येत असून समाजमाध्यमांवर याची प्रसिद्धी करण्यात येत आहे. विघटन होणाऱ्या कागदात तुळशीच्या बिया टाकून बनवलेली राखी यंदा बहिणीला बांधता येणार आहे. एरवी विकत मिळणाऱ्या राखीचे विघटन होत नाही. ती टाकाऊ असते. यासाठी पर्यावरणाला पोषक ठरणारी सीड राखी तरुणांच्या पसंतीस पडत आहे. रक्षाबंधन झाल्यावर या राखीतील तुळशीच्या बिया असलेला भाग कुंडीत लावून त्यातून तुळशीचे रोप जगवता येणार आहे. डोंबिवलीतील शाळांमध्ये जागृती करण्यात येत असून विद्यार्थी, तरुणांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. लीना केळशीकर म्हणाल्या.

तिच्या ‘त्या’ दिवसांच्या  आरोग्याची रक्षा करणार..

मी म्युज या उपक्रमाच्या माध्यमातून देशभर मासिक पाळी याविषयी जनजागृतीचे काम करतो. मासिक पाळीविषयीच्या सामाजिक गैरसमजांमधून अनेक वाईट रूढी-परंपरा वाढीस लागल्या आहेत. त्याचा त्रास महिलांना होत असून लज्जेमुळे याविषयी कोणीही स्पष्टपणे बोलत नाही. याविषयी महिलांनी मोकळेपणाने बोलून मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, या उद्देशाने रक्षाबंधनच्या निमित्ताने मी माझ्या बहिणीला कापडी पॅड तसेच मेन्स्ट्रअल कप भेट म्हणून देणार आहे. जेणेकरून तिच्या त्या पाच दिवसांच्या आरोग्याची मी काळजी घेऊ  शकेन. तसेच बाजारात मिळणाऱ्या अविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्समुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होण्यास मदत मिळू शकेल, असे निशांत बंगेरा याने नमूद केले.

गवसलेही.. हरवलेही..

आजचं युग हे धावपळीचं आहे. त्यामुळेच प्रत्येक जण आपापल्या परीने सण साजरा करत असतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही सणाचं महत्त्व कमी झाल्याची बोंब ऐकू येते. मात्र परदेशातूनही स्काईपवरून जेव्हा भाऊ-बहीण रक्षाबंधन साजरा करतात तेव्हा याच तंत्रज्ञानाचा आधार वाटतो. सण प्रत्यक्ष साजरा करण्यापेक्षा सध्या ती समाजमाध्यमांवर ऑनलाइन जास्त साजरे होतात. पण हेच सण पारंपरिक पद्धतीने साजरे करायला कोणाला आवडत नाही. पूर्वी सणांना खूप महत्त्व होतं. आपली माणसं एकत्र यायची. सणांमुळे कुटुंबातील तो जिव्हाळा अनुभवायला मिळायचा. पण आता हे सगळं हरवतंय अशीही भावना व्यक्त होते.