मिलिंद गांगल

भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. मोटारसायकल म्हणजे काय याचे प्रमाण असलेली जावा जनमनात रुजली. जावाच्या या वैभवशाली इतिहासाचा घेतलेला हा आढावा.

काफी रागात रागातली ही चीज, गुरूपुढे तालीम घेत बसलेली दीप्ती नवल, पुढे तीच चीज डोक्यात ठेवून बस स्टॉपवर आलेली, तिचे तानेगणिक चाललेले हातवारे पाहून बस स्टॉपवरील बाकीचे लोक तिला हसत आहेत. इतक्यात समोरून हेल्मेट घातलेला देखणा फारुख शेख काळ्या मोटारसायकलवरून तिला न्यायला येतो. तीन मित्र एक नायिका अन् एक मोटारसायकल, अर्थातच जावा सिनेमा- सई परांजपे यांचा ‘चष्मेबहादूर’. त्या चित्रकथेची नायिका होती, साधी सोज्वळ दीप्ती नवल, पण जी काली घोडी म्हणून सिनेमात वापरली आहे ती जावा मोटारसायकल. मूळच्या झेकोस्लोवाकियामधील प्रागमध्ये तिची सुरुवात झाली.

जावाची व्युत्पत्ती म्हणजे जेनेसेक आणि वांडरर (JANECECK, WANDERER) या दोन शब्दांची आद्याक्षरे वापरून बनला शब्द जावा. जेनेसेक याने पहिलं महायुद्ध संपल्यानंतर मोटारसायकल निर्मिती करण्याचे ठरवले. स्वत:चे इंजिन बनवण्याइतपत ते वेळ खर्च करू इच्छित नव्हते मग मोटारसायकलला आवश्यक इंजिन शोधताना बीएमडब्ल्यू या प्रतिस्पर्धी कंपनीच्या स्पर्धेला तोंड देऊ  न शकलेल्या वांडरर या कंपनीच्या दोन पिस्टनच्या इंजिनाची निवड केली. त्यातून तयार झालेल्या जावा दुचाकीने इतिहास घडवला. तेव्हा जावा मोटारसायकल १०६ देशांत निर्यात केली जात होती.

त्याकाळी भारतात रुस्तम अन् फारुख या दोन इराणी बंधूंनी आयडिअल जावा नावाची कंपनी स्थापन करून त्याद्वारे प्रथमत: जावा मोटारसायकल आयात करायला सुरुवात केली. पुढे १९५० दरम्यान भारत सरकारच्या बदललेल्या धोरणामुळे परदेशी गाडय़ा व दुचाकी यांची आयात बंद झाली. बाजारातील जावा मोटारसायकलची वाढती मागणी लक्षात घेऊन पुढे इराणी बंधूंनी म्हैसूरचे महाराजा जयचमाराजेंद्र वाडियार यांच्या साहाय्याने जावा मोटारसायकल बनवण्याचा कारखाना सुरू केला. जावा कंपनीचा चांगलाच विस्तार झाला. म्हैसूरच्या यादवगिरी भागात इराणी बंधूंनी पंचवीस एकर जागेवर जावाचा कारखाना उभा केला. मूळ जावा कंपनीकडून परवाना मिळवून वर्षांकाठी ४२००० मोटारसायकलचे उत्पादन सुरू केले. तेव्हा जावाच्या कारखान्यांत २२०० कामगार काम करत होते. दिवसाला १३० मोटारसायकल ते बनवत असत.

मूळ जावा कंपनी आणि इराणी बंधू यांच्यातील करार १९७३-७४ दरम्यान  संपुष्टात आला, त्यातून जावाच्या धर्तीवर आधारलेल्या येझदी या मोटारसायकलची निर्मिती इराणी बंधूंनी सुरू केली. येझदी ही जावाचे गुणसूत्र असलेली मोटारसायकल होती. तिची विविध मॉडेल्स त्या काळी फारच लोकप्रिय झाली.

येझदीने अनेक मोटारसायकलच्या शर्यती जिंकल्या. अनेक हिंदी चित्रपटातील मोटारसायकलसहित असलेली सिनेनायकांची दृष्ये चित्रित करताना येझदी वापरली गेली आहे.

अल्पावधीतच साधी पण दणकट जावा लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली. दोन सायलेन्सर अन् किक आणि गिअर एकाच लिव्हरमध्ये असलेली जावा इंजिनाच्या विशिष्ट आवाजामुळे ‘फटफटी’ म्हणून भारतात लोकप्रिय होती. इतकेच नव्हे तर जावा त्या काळी आपल्या देशातून तुर्किस्तान, नायजेरिया, श्रीलंका, इजिप्त गुएटेमाला, व्हेनेझुएला अशा ६१ देशांत निर्यात केली जात होती.

त्या काळी जावा आणि रॉयल एनफिल्डची बुलेट या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या भारतात होत्या. मोटारसायकलचे चाहते आणि ग्राहक या दोन कंपन्यांत वाटले गेले होते. फोर स्ट्रोक इंजिन असलेली, आपला फौजी किंवा पोलिसी खाक्या मिरवणारी बुलेट. रेसिंगच्या दुनियेतसुद्धा दबदबा असलेली, टू स्ट्रोक इंजिनची, दोन्ही चाके सारख्या आकाराची असल्याने स्टेपनीसुद्धा लावणे शक्य असलेली दणकट जावा ही आपला वेगळा आब राखून होती. प्रत्यक्ष बुलेट आणि जावा या उत्पादकांची जितकी स्पर्धा एकमेकांशी नव्हती तितकी स्पर्धा अन् वाग्युद्ध दोन्ही मोटारसायकलच्या चाहत्यांमध्ये दिसून यायची. जावा श्रेष्ठ  की बुलेट यातून चहाच्या कपात वादळे निर्माण व्हायची.

जावा कणखर तर होती, सोपे इंजिनीअरिंग असल्याने साध्या हॅण्ड टूल्सच्या साहाय्याने घरातही रिपेअर करणे शक्य होत. तत्कालीन विक्रीपश्चात सेवा ही वाहनक्षेत्रात फार सुस्थापित नव्हती. पण सहसा बंद न पडणारी जावा त्यामुळे सुद्धा जनमनात लोकप्रिय होती. प्रसंगी चावीच्या जागी एक खिळा ठोकून पण ती चालू करता यायची. पुढे काळ बदलला. सरकारी ध्येयधोरणे बदलत गेली. सरकारने जपानी उत्पादकाच्या शेलटय़ा बांध्याच्या उत्तम अ‍ॅवरेज देणाऱ्या अन् जावाच्या तुलनेत कमी प्रदूषण करणाऱ्या होंडा, यामाहा, सुझूकी या मोटारसायकल्सना भारतात उत्पादन करण्याचे परवाने दिले.

दुचाकीस्वारांच्या मनात घर करून असलेली जावा, आता पुन्हा भारतात आली आहे. ‘जावा’ आता पुन्हा रसिकांसमोर नव्या ढंगात येत असली तरी तिचा पारंपरिक बाज राखून आहे. जावा, जावा ४२ आणि जावा परागचे भारतात आगमन झाले आहे. आता फोर स्ट्रोक इंजिन असलेली वॉटर कूल सिस्टीम घेऊन जावा येत आहेत. जावाचे पुनरागमन होत आहे हे ऐकून जावा चाहत्यांना अन् नवीन पिढीलासुद्धा हा एक सुखद धक्का आहे.

‘जावा’ चे जतन

जपानी उत्पादकाच्या स्पर्धेला जावाचे निर्माते तोंड देऊ  शकले नाहीत. १९८० सालापासून उतरती कळा लागलेल्या जावा मोटारसायकलचे उत्पादन १९९०च्या आसपास बंद करण्यात आले. दोन सायलेन्सर स्टायलिंग, फायरिंगची नजाकत निघून गेली अन् उरली ती ‘व्यवहार सुसंगत’ यांत्रिकता. गर्दी जरी जपानी दुचाकीकडे खेचली गेली तरी दर्दी मात्र जावा

बंद झाल्याने व्यथित झाले होते. आपल्याकडे असलेल्या जावा विण्टेज म्हणून सांभाळून जपून ठेवत होते. जावाचे अनेक क्लबही देशांतर्गत आहेत. आजही अनेक मोटारसायकल चाहते जावा सांभाळून आहेत. अनेक जुन्या जावा मोटारसायकल आजही अनेक जणांनी जतन करून ठेवलेल्या आहेत  दर वर्षी जुलै महिन्यातला दुसरा रविवार येझदी दिवस म्हणून साजरा केला जातो.